वसंत कुलकर्णी

फोकस्ड इक्विटी फंड या फंड प्रकारात गुंतवणुकीतील समभाग केंद्रित जोखीम आणि जोखमीमुळे मिळणारा लाभ पदरात पडण्यासाठी फंडाची काळजीपूर्वक निवड आवश्यक असते. फोकस्ड फंड या फंड प्रकारात ‘सेबी’च्या नियमानुसार कमाल ३० समभागांत गुंतवणूक करणे आवश्यक असल्याने निधी व्यवस्थापक काळजीपूर्वक समभागकेंद्रित पोर्टफोलिओ तयार करतात. फोकस्ड फंड या फंड प्रकाराच्या या वैशिष्टय़ामुळे समभाग एकाग्रतेचा धोका अधिक असतो. फंडाच्या पोर्टफोलिओत निवडक समभागांची मात्रा अधिक असल्याने एखाद्या समभागाच्या किमतीत घसरण झाल्यास पोर्टफोलिओची कामगिरी खालवण्याची शक्यता असते. त्यामुळे निवडलेल्या समभागांचे पोर्टफोलिओत प्रमाण निश्चित करतानाच जोखीम आणि परतावा यांच्यात समतोल साधावा लागतो.

म्युच्युअल फंडाच्या ‘सेबी’च्या वर्गीकरणानंतर ‘अल्फा’ तयार करण्याची (संदर्भ मानदंडाहून अधिक परतावा) क्षमता या फंड प्रकारात जास्त आहे. म्हणूनच परंपरावादी जोखीमांक असलेले गुंतवणूकदार वगळता, जोखीम आणि परताव्याचा समतोल साधू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांना तुलनेने अस्थिर, परंतु अधिक परताव्यासाठी या फंडाचा विचार करता येईल. अधिक जोखीम स्वीकारण्याची तयारी आणि क्षमता असलेल्या गुंतवणूकदारांची या फंड प्रकाराला म्हणूनच पसंती लाभल्याचे दिसून येते. एल अँड टी फोकस्ड इक्विटी फंडाच्या पहिल्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने या फंडाच्या मागील वर्षभरातील कामगिरीची दखल घेणे भाग आहे.

या फंडाची प्राथमिक विक्री १५ ते २९ ऑक्टोबर २०१८ दरम्यान होऊन ५ नोव्हेंबर रोजी फंड गुंतवणुकीस पुन्हा खुला झाला. एस. एन. लाहिरी हे फंडाचे व्यवस्थापक तर विहंग नाईक हे या योजनेचे सह-निधी व्यवस्थापक आहेत. फंडाच्या ऑफर डॉक्युमेंटमध्ये म्हटल्याप्रमाणे ही योजना दीर्घकालीन भांडवलवृद्धी करण्यासाठी असून फंडाची किमान ६५ टक्के गुंतवणूक समभाग आणि इक्विटी आणि इंडेक्स डेरिव्हेटिव्हमध्ये असेल. फंडाशी संबंधित ताज्या उपलब्ध आकडेवारीनुसार फंडाने ९४.४८ टक्के निधी समभागात गुंतविला आहे. मागील १२ महिन्यात फंडाची ‘रेग्युलर ग्रोथ एनएव्ही’ ९.७८ ते ११.४९ यादरम्यान राहिली आहे. या फंडाच्या प्राथमिक विक्री वेळी फंड घराण्याकडून प्रसिद्ध केलेल्या निवेदनात, ‘‘नव्या योजनेबाबत अधिक ‘अल्फा’ निर्मिती करण्याच्या उद्देशाने भारतीय भांडवली बाजारपेठेतील अस्थिरता लक्षात घेऊन समभाग गुंतवणुकीतून दीर्घकालीन भांडवली वृद्धीच्या उद्देशाने साहसी गुंतवणूकदारांसाठी नवीन योजना उपलब्ध करून देण्यात येत आहे,’’ असे नमूद केले गेले आहे. मागील वर्षभरात किरकोळ अपवाद वगळता निधी व्यवस्थापकांनी दिल्या वचनाला जागून फंडाचे सक्रिय व्यवस्थापन केले.

वर्षभराचा आढावा घेतल्यास एल अँड टी फोकस इक्विटी फंडाच्या गुंतवणुकीत सरासरी एकूण गुंतवणुकीपैकी ५० ते ६० टक्क्यांदरम्यान गुंतवणूक १२ ते १५ लार्जकॅप समभागातून, उर्वरित ३४ ते ४० टक्के गुंतवणूक आठ ते १० मिडकॅप समभागात होती. ‘स्टिक टू लेबल’ या निकषावर या फंडाची गुंतवणूक समाधानकारक म्हणायला हवी. मिडकॅप गुंतवणुकीचा मोह संयमित राखल्याने मागील वर्षभरातील मिडकॅप घसरणीची या फंडाला कमी झळ पोहचली. ‘निफ्टी ५०० टीआरआय’ हा कामगिरी मोजण्यासाठी फंडाचा मानदंड असला तरी फोकस्ड फंड गटातील असल्याने निधी व्यवस्थापकांवर मानदंडानुसार गुंतवणुकीत समभागांचे आणि उद्योग क्षेत्राचे प्रमाण राखण्याचे बंधन नाही. नोव्हेंबर २०१८ ते जुलै २०१९ दरम्यान संदर्भ निर्देशांकाला कामगिरीत मागे टाकण्याची किमया साधणाऱ्या फंडाची जुलै-ऑक्टोबरदरम्यान मानदंडाच्या तुलनेत कामगिरी समाधानकारक नाही.

निधी व्यवस्थापकांनी मागील वर्षभरात अज्ञेयवादी गुंतवणूक पद्धत चोखाळली असून विक्री आणि नफ्यात पुरेसा वृद्धिदर असणारे आणि वाजवी मूल्यांकनाला उपलब्ध असलेल्या समभागांची गुंतवणुकीसाठी निवड केली. ताज्या उपलब्ध आकडेवारीनुसार फंडाच्या गुंतवणुकीत सप्टेंबरअखेरीस ६.२९ टक्के रोकड समतुल्य गुंतवणुका होत्या. फोकस्ड फंडासाठी असा विचार करणे हे निधी व्यवस्थापकांचे वेगळेपण आहे. या वेगळेपणामुळे मिडकॅप पानगळीची गंभीर झळ फंडाच्या गुंतवणुकीला पोहोचली नाही. निधी व्यवस्थापकांच्या द्वयीचे सूत्र, भविष्यात वृद्धिदर राखणाऱ्या समभागांची निवड करताना अवास्तव अधिमूल्य असणाऱ्या समभागांना वगळल्याचे दिसून येते. बँकिंग, संगणक तंत्रज्ञान, वित्तीय सेवा, टिकाऊ विवेकाधीन वस्तू, आणि बांधकाम या पाच उद्योग क्षेत्रांना निधी व्यवस्थापकांनी गुंतवणुकीसाठी पसंती दिली आहे. सहसा म्युच्युअल फंडांच्या गुंतवणुकीत न आढळणाऱ्या एसबीआय लाईफ, पोलीकॅब इंडिया, जीआयसी आरई, तर व्यापार चक्राशी जवळीक साधणाऱ्या गोदरेज प्रॉपर्टीजसारख्या समभागांची निवड करत निधी व्यवस्थापकांनी फोकस्ड फंडात गुंतवणुकीचा उद्देश अंशत: साध्य केल्याचे दिसते.

समभाग गुंतवणुकीसाठी निवडलेल्या फंडापैकी फोकस्ड फंडांची मात्रा एकूण समभाग गुंतवणूक करणाऱ्या फंडांच्या १० टक्क्यांहून अधिक असू नये. जोखीम विकेंद्रीकरणाच्या आणि परताव्यात वाढ होण्याच्या उद्देशाने ही विविधता आणली पाहिजे.

फोकस्ड फंडातील गुंतवणूक एकदा तुम्ही गुंतवणूक केली की गुंतवणूक सुरू राहील असे नसून अधूनमधून फंडांची कामगिरी तपासावी लागते. वेळेअभावी किंवा अन्य कारणांनी गुंतवणूकदारांना हे शक्य नसल्यास फोकस्ड फंडात गुंतवणूक करणे टाळलेले बरे. एका वर्षांच्या कामगिरीच्या बळावर दीर्घकालीन वित्तीय ध्येये साध्य करणारे साधन म्हणून निवड करणे योग्य नव्हे. परंतु मागील वर्षभराचा आढावा घेतल्यास संदर्भ मानदंडाने ११.०९ टक्के नफा कमावला असताना, एल अँड टी फोकस्ड फंडाची एका वर्षांत १४.७० टक्के नफा देणारी कामगिरी समाधानकारक होती हे मान्य करण्यास कोणाची हरकत नसेल.

shreeyachebaba @gmail.com