05 July 2020

News Flash

आरोग्य धनसंचय

भारतीय औषध निर्मितीची बाजारपेठ जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे.

| October 21, 2013 08:47 am

भारतीय औषध निर्मितीची बाजारपेठ जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. २०१५ मध्ये अनेक औषधांची पेटंट मुदत संपत असल्यामुळे भारतातील औषध निर्मीतीत मोठी वाढ होणे अपेक्षित आहे. अमेरिकेत आरोग्य विम्याशी संबंधीत ज्या गोष्टी घडत आहेत त्या गोष्टीचा जगभरातील व विशेषत: भारतातील औषध कंपन्यांवर सकारात्मक परिणाम अपेक्षित आहे.    
मकरंद जोशी हा माझा शाळासोबती सध्या एका औषध निर्मात्या कंपनीच्या विक्री विभागाचा प्रमुख आहे. नोकरीनिमित्ताने महिन्यातले १५-१६ दिवस दौऱ्यावर असतो. जर तो मुंबईत असेल तर रविवारी संध्याकाळी, ‘कल्पतरूखाली उभा राहा’ असा लघुसंदेश हमखास पाठवतो. आमच्या मागील भेटीत स्तंभ सुरू झाल्यापासून बायोकॉन वगळता एकही औषध निर्माण कंपनी लिहिली नाहीस, अशीही तक्रार त्याने केली. योजलेल्या आरोग्यपंचकातील पहिली कंपनी घेऊन आज भेटीला आलो आहे.
भारतात औषधनिर्मितीचा व्यवसाय ७१ हजार कोटींचा असून मागील १० वर्षांत १२% दराने त्यात वाढ झाली आहे. पुढील पाच वर्षांत हा उद्योग १२% ते १५% दराने वाढण्याची अपेक्षा आहे. वाढलेले आयुर्मान, आरोग्य विम्याचे पाठबळ व बदलती चंगळवादी जीवनशैलीमुळे होणारी आरोग्याची हेळसांड या गोष्टी या व्यवसाय वाढीच्या पथ्यावर पडत आहेत. जागतिक औषधनिर्मितीत चीन, रशिया, भारत व ब्राझील या देशांतून जगाला लागणाऱ्या औषधांपकी ४०% औषधांचा पुरवठा होतो. भारतीय औषधनिर्मितीची बाजारपेठ औषधांच्या संख्येच्या तुलनेत जगात तिसऱ्या क्रमांकावर, तर विक्रीच्या तुलनेत १४ व्या क्रमांकावर आहे. २०१५ मध्ये अनेक औषधांची पेटंट मुदत संपत असल्यामुळे भारतातील औषधनिर्मितीत मोठी वाढ होणे अपेक्षित आहे. अमेरिकेत आरोग्य विम्याशी संबंधित ज्या गोष्टी घडत आहेत, त्या गोष्टींचा जगभरातील व विशेषत: भारतातील औषध कंपन्यांवर सकारात्मक परिणाम अपेक्षित आहे. सरकारने मे महिन्यात जारी केलेल्या राष्ट्रीय औषध किंमत धोरणानुसार ३४८ औषधे या धोरणाच्या कक्षेत आणली आहेत. हे धोरण बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या नफेखोरीला आळा घालण्याच्या उद्देशाने जाहीर केले आहे. काही ‘जेनेरिक’ औषधांना या धोरणाच्या कक्षेत आणून त्यांच्या किमती कमी कराव्या लागल्या आहेत. या धोरणाचे चांगले-वाईट पडसाद औषध निर्माण क्षेत्रातील कंपन्यांच्या मूल्यांकनावर उमटले आहेत. मागील एका वर्षांत एस अ‍ॅण्ड पी बीएसई हेल्थकेअर निर्देशांकाने २८% परतावा दिलेला असून हा बीएसईच्या क्षेत्रीय निर्देशांकातील दुसऱ्या क्रमांकावर असलेला परतावा आहे.
भारतात औषध निर्माण क्षेत्रातील कंपन्यांमध्ये मोठी विविधता आढळते. भारतातील औषध निर्माण व्यवसायातील कंपन्यांची प्रामुख्याने तीन गटांत विभागणी होते. पहिल्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या भारतातील उपकंपन्या ज्यात फायझर, ग्लॅक्सो स्मिथक्लाइन, फ्रेसनियस कबीसारख्या कंपन्या, तर दुसऱ्या बाजूला भारतीय फार्मा उद्योगाच्या ब्रह्मा-विष्णू-महेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. रेड्डी, सिप्ला व ल्युपिनसारख्या भारतीय बहुराष्ट्रीय कंपन्या, तर तिसऱ्या गटात आकाराने लहान पण दर्जेदार आकर्षक मूल्य असलेल्या युनिकेम एफडीसी, इंडोगो रेमीडिज ज्या त्यांच्या उत्पादन गटात नेतृत्व करणाऱ्या कंपन्या आहेत. आजची सुरुवात याच महिन्यात शताब्दी साजरी करणाऱ्या एका बहुराष्ट्रीय कंपनीने..  
अ‍ॅस्ट्रा झेन्का फार्मा एबी ही स्वीडनची औषध निर्माण क्षेत्रातील सातव्या क्रमांकाची बहुराष्ट्रीय कंपनी आहे. अ‍ॅस्ट्रा झेन्का फार्मा इंडिया ही अ‍ॅस्ट्राझेन्का या बहुराष्ट्रीय कंपनीची भारतातील उपकंपनी आहे. ही कंपनी आपल्या औषध संशोधनासाठी प्रसिद्ध असून, अनेक यशस्वी औषधांची पेटंट या कंपनीकडे आहेत. कंपनीने भारतातील व्यवसाय सात उपगटांत विभागला असून औषध विपणन, औषधनिर्मिती, मातृकंपनीकडून आयात केलेल्या औषधांचे वितरण, संशोधन व विकास, ‘क्लिनिकल ट्रायल्स’ अर्थात औषध चाचणी व औषधांची निर्यात व त्याच्या अनुषंगाने संशोधन व औषध चाचण्या वगैरे कामे अ‍ॅस्ट्रा झेन्का इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या शंभर टक्के स्वत:च्या मालकीच्या शेअर बाजारात गर नोंदणीकृत कंपनीमार्फत करते. भारतातील कर्मचारी संख्या १९०० असून त्यापकी १५०० कर्मचारी प्रत्यक्ष औषध विक्री करणारे आहेत. २०० कर्मचारी औषधनिर्मितीत, तर १५० कर्मचारी संशोधन, विकास व चाचण्याशी संबंधित आहे, तर इतर कर्मचारी हिशेब, मनुष्यबळ आदी खात्यातील आहेत.   
काही महिन्यांपूर्वी भारतातील या उपकंपनीच्या ९०% शेअरची मालकी मातृकंपनीकडे होती. शेअर बाजारात नोंदणीच्या बदललेल्या निकषांनुसार गरप्रवर्तक मालकी २५% असावी याला अनुसरून कंपनीने प्रवर्तकांच्या हिश्श्यातील १५% शेअर्सची शेअर बाजारात विशेष खिडकीतून विक्री केली. २८ मे रोजी झालेल्या या बोलीसाठी ४९० हा दर ठरविला होता, परंतु एकूण उपलब्ध ३५ लाख शेअर विक्रीसाठी उपलब्ध असताना तब्बल पाचपट अधिक मागणी आल्याने १८.२% अधिक दराने म्हणजे ६२३ रुपये दराने झालेल्या या विक्रीत मेरिल िलच कॅपिटल मार्केट्स एसव्ही, बीएनपी पारिबा, आरइतराज फंड, मन्सफिल्ड (मॉरिशस), मॉर्गन स्टॅन्ले एशिया (सिंगापूर), साफोल्क (सिंगापूर) या गुंतवणूक सल्लागार कंपन्यानी बाजी मारली. परकीय अर्थसंस्थांनी इतक्या चढय़ा दराने सर्व शेअर खरेदी केले यावरून या कंपनीचे गुंतवणुकीतील स्थान लक्षात यावे.
अ‍ॅस्ट्राझेन्काची जागतिक स्तरावर सहा देशांत मिळून दहा संशोधन केंद्रे असून या सर्व केंद्रात मिळून ९८०० कर्मचारी संशोधनात व्यग्र असतात. डझनभर नोबेल पारितोषक प्राप्त संशोधक या कंपनीचे माजी कर्मचारी आहेत. या सहा संशोधन केंद्रांपकी एक केंद्र भारतात आहे. आशिया खंडातील हे एकमेव संशोधन केंद्र असून या केंद्रातून विकसित होत असलेल्या औषधांचे पेटंट या भारतीय कंपनीला मिळतात. मातृकंपनी २०१४-१६ या वर्षांत १४० कोटी भारतीय उपकंपनीला अनुदानाच्या रूपाने देणार असून, ही रक्कम मातृकंपनीला परत करायची नसून याचा पहिला हप्ता ७४ कोटी रुपयांचा या आíथक वर्षांत मिळाला आहे. या कंपनीने आपली काही उत्पादने बाजारात नव्याने उतरविली (Rebranding)  आहेत. या प्रयोजनानंतर आठही उत्पादनांना उत्तम प्रतिसाद लाभला असून आधीच्या विक्रीचे आकडे मोडत आपापल्या गटात ६५-७०% बाजारहिस्सा मिळविला आहे. या आठ उत्पादनांचा कंपनीच्या एकूण विक्रीत ५५%च्या आसपास वाटा असल्यामुळे तिसऱ्या तिमाहीचे आकडे जाहीर होतील तेव्हा या फक्त आठ उत्पादनांमुळे विक्री ५% ने वाढली असेल. मागील पाच तिमाहीत सतत तोटा सहन कराव्या लागलेल्या या कंपनीने मागील तिमाहीत नफ्याची नोंद केली. जानेवारी मार्च २०१४ या तिमाहीत विक्री ३७% वाढण्याचा अंदाज आहे.
कंपनी ६,००० कोटी रुपये खर्चून १२० दशलक्ष औषधी गोळ्यांची वार्षिक क्षमता असणारा प्रकल्प सध्याच्या कारखान्याच्या शेजारीच उभारीत आहे. ३१ मार्च २०१३ पर्यंत ३,५०० कोटी कंपनीने खर्च केले असून, उर्वरित रक्कम चालू आíथक वर्षांत खर्च होणे अपेक्षित आहे. चालू आíथक वर्षांच्या चौथ्या तिमाहीत उत्पादन चाचण्या सुरूहोऊन एप्रिल २०१४ पासून प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल. या प्रकल्पाची उत्पादन क्षमता अपेक्षित पातळीवर पोहोचताच मातृ कंपनी व भारतातील ही उपकंपनी यांच्यात वाणिज्यविषयक अटींची पूर्तता करणारा करार होईल व निर्यातीसाठीची औषधे या नव्या कारखान्यात तयार होतील. आíथक वर्ष २०१५ मध्ये ही उत्पादन क्षमता वाढल्यामुळे कंपनीची नफाक्षमता आजवरच्या सर्वोच्च स्थानी असेल. इतकी मोठी विस्तार योजना राबवूनही कंपनीवर एका नव्या पशाचे कर्ज नाही. विस्तार योजनेचा खर्च अंतर्गत स्रोतापासून भागविला आहे ही जमेची बाजू ध्यानात घ्यायला हवी.
संशोधन व पेटंट हा औषध निर्माण कंपनीचा कणा असतो. या कंपनीच्या मोठय़ा प्रमाणार बल्क ड्रगचा समावेश नाही. ही कंपनी जैव-तंत्रज्ञान क्षेत्रात संशोधन करून वेगवेगळ्या रोगांवर प्रभावशाली औषधे शोधून चाचण्या व त्यानंतर व्यावसायिक तत्त्वावर औषधे तयार करण्याचे काम करत असते. यातूनच चार प्रमुख औषधांचा जन्म झाला आहे. ही चार प्रकारची औषधे २००९ पर्यंत कंपनीच्या विक्रीचा ५०% भाग होता. नवीन संशोधन व विकास करण्याच्या सातत्यामुळे २०१४ मध्ये ही चार प्रकारची औषधे एकूण विक्रीच्या ३५%, तर २०१६ मध्ये २०% हून कमी असतील. २०१४चे उत्सर्जन सात, तर नवीन प्रकल्पातून उत्पादन सुरू झाल्यामुळे २०१५चे उत्सर्जन २२ असेल. निर्देशांक सर्वोच्च पातळीच्या जवळ असताना सध्याच्या भावात फारसा धोका नसलेला हा शेअर आपल्या गुंतवणुकीचा भाग असायला हरकत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2013 8:47 am

Web Title: health wealth accumulation
Next Stories
1 जय किसान
2 इन्फोसिसनंतर.. बाजारतेजीचे काय?
3 भविष्याबाबत आशादायी चित्र!
Just Now!
X