आपलेही करविषयक प्रश्न असतील तर ते आपण pravin3966@rediffmail.com या ई-मेलवर अथवा लोकसत्ता कार्यालय,   ‘अर्थ वृत्तान्त’, एक्स्प्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरिमन पॉइंट, मुंबई- ४०००२१ या पत्त्यावर पाठवू शकता. अथवा ई-मेल: arthmanas@expressindia.com
प्रश्न : मला घरासाठी ३० लाख रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे. प्रथम मी ६ लाख कर्ज घेतले. त्यावर मी व्याज द्यायला सुरुवात केली. त्यानंतर मी हप्त्यामध्ये बाकीचे कर्ज घेतले आणि त्यावर व्याज भरावयास सुरुवात केली. घराचे बांधकाम अजून चालू आहे. मला भरलेल्या व्याजावर प्राप्तीकर सवलत मिळेल का?
– गजानन कुलकर्णी
उत्तर : प्राप्तीकर कायद्यानुसार घराचा ताबा घेतल्यानंतरच घराच्या कर्जावर दिलेल्या व्याजाची वजावट मिळू शकते. आपल्या घराचे बांधकाम अजून चालू आहे आणि घराचा ताबा अजून घेतलेला नाही. त्यामुळे आपल्याला व्याजाची वजावट मिळू शकत नाही. घराचा ताबा घेतल्यानंतर ताबा घेण्यापूर्वी भरलेल्या व्याजाची १/५ इतकी वजावट ताबा घेतलेल्या वर्षी व पुढील ४ वर्षांत घेता येते. परंतु ही वजावट एकूण मर्यादेपेक्षा जास्त मिळत नाही. उदा. आपण ताबा घेतलेल्या वर्षांत त्या वर्षांसाठी १,३०,००० इतके व्याज भरले आहे. आणि ताबा घेण्यापूर्वी आपण एकूण २,००,००० इतके व्याज भरले असेल तर त्याच्या १/५ इतकी म्हणजे ४०,००० रुपये अतिरिक्त वजावट घेऊ शकता. आपल्या व्याजाची वजावट ही १,७०,००० रुपये (१,३०,००० अधिक ४०,००० रुपये) इतकी येते. परंतु एकूण व्याजाच्या वजावटीची मर्यादा १,५०,००० रुपये इतकी असल्यामुळे आपल्याला १,५०,००० रुपये इतकीच वजावट घेता येईल.
प्रश्न : मी मागील दोन वर्षांपासून अनिवासी भारतीय आहे. मला भारतात गुंतवणुकीतून उत्पन्न मिळते. मला प्राप्तीकर विवरण पत्र भरणे गरजेचे आहे का?
– कल्पिता
उत्तर : भारतात मिळणारे करपात्र उत्पन्न जर करपात्र उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त असेल तर प्राप्तीकर विवरण पत्र भरणे गरजेचे आहे. ही मर्यादा ज्येष्ठ नागरिकांसाठी (ज्यांचे वर ६० वर्षांपेक्षा जास्त आणि ८० वर्षांपेक्षा कमी आहे) २,५०,००० रुपये, अति ज्येष्ठ नागरिकांसाठी (ज्यांचे वर ८० वर्षांपेक्षा जास्त आहे) ५,००,००० रुपये आणि इतरांसाठी वार्षिक २,००,००० रुपये इतकी आहे.
प्रश्न : मला एका प्रतिष्ठीत सहकारी बँकेकडून ४५,००० रुपये लाभांश मिळाला. हा लाभांश करपात्र आहे का?
– मुग्धा वैद्य
उत्तर : प्राप्तीकर कायदा कलम १०(३४) प्रमाणे ज्या कंपन्यांनी कलम ११५ ओ खाली लाभांश वितरण कर भरला असेल त्या कंपन्यांनी दिलेला लाभांश हा करमुक्त असतो. ११५ ओ हे कलम फक्त देशी कंपन्यांना लागू आहे. सहकारी बँकेकडून मिळेल लाभांश हा ११५ ओ कलमांतर्गत येत नसल्यामुळे हा लाभांश करमुक्त नाही. हा लाभांश इतर उत्पन्नामध्ये दाखवावा लागेल.
प्रश्न : वडिल आपल्या मुलाला अमेरिकेत पसे पाठवू शकतात का? त्याला काही मर्यादा आहेत का? स्थावर मालमत्ता विकून आलेले पसे अमेरिकेत पाठवू शकतो का?
– रमेश सरवटे
उत्तर : वडील आपल्या मुलाला अमेरिकेत पसे पाठवू शकतात. भारतीय रिझव्र्ह बँकेच्या  Liberised Remittance Scheme खाली ७५,००० अमेरिकन डॉलर इतकी रक्कम एका आर्थिक वर्षांत (एप्रिल ते मार्च) पाठवू शकता. ताज्या निर्णयाप्रमाणे ही रक्कम वाढवून १,२५,००० डॉलर इतकी वाढविली गेली आहे. यासाठी काही अटींची पूर्तता करावी लागते. भारतात स्थावर मालमत्ता विक्री करून आलेले पसे आपण अमेरिकेत पाठवू शकता. जर का मालमत्ता ही वडिलोपार्जति असेल किंवा निवासी भारतीय असताना विकत घेतली असेल तर दर वर्षी १० लाख अमेरिकन डॉलर इतकी रक्कम आपण अमेरिकेत पाठवू शकता. त्यासाठी काही अटींची पूर्तता करावी लागते. या अटींमध्ये प्राप्तीकर कायद्याचे प्रमाणपत्र व इतर दस्तऐवज सादर करावे लागतात.
प्रश्न : आई – वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या भविष्य निधी (पी.पी.एफ.) खात्यातील ४,००,००० रुपयांची रक्कम मला मिळाली. ही रक्कम करपात्र आहे का?
– एक वाचक
उत्तर : ही रक्कम करपात्र नाही.
प्रश्न : मी एका खाजगी कंपनीत नोकरी करतो. मी अजून पाच वर्षांनंतर निवृत्त होणार आहे. माझ्या नावावर बरीच रजा शिल्लक आहे. मला पशांची गरज आहे. माझ्या रजेचे मी पसे घेतले तर त्यावर मला कर भरावा लागेल का?
– एक वाचक
उत्तर: निवृत्तीनंतर मिळालेले रजेचे पसे हे राज्य आणि केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पूर्णपणे करमुक्त आहेत. इतरांसाठी ठराविक रकम करमुक्त आहे. रजेचे पसे जर नोकरी करत असताना घेतले तर ते करपात्र असतात. त्यामुळे आपण शिल्लक रजेचे घेतलेले पसे नोकरीत असताना करपात्र उत्पन्नात गणले जातात.
प्रश्न : माझ्या मुलीने कर निर्धारण वर्ष २०१३-१४ (आíथक वर्ष २०१२-१३) साठी ३० जुल २०१३ रोजी विवरण पत्र संगणकाद्वारे भरले. तिचे उत्पन्न रु. ५,००,००० रुपयांपेक्षा कमी आहे. तिने ८७ अ कलमाखाली मिळणारे २,००० रुपयांची कर वजावट घेतली नाही. आता वजावट घेवून सुधारित विवरण पत्र भरू शकतो का?
– एस.एस. कोरडे
उत्तर : कलम ८७ अ प्रमाणे कर वजावट ही कर निर्धारण वर्ष २०१४-१५ (आíथक वर्ष २०१३-१४) साठी आहे. त्यामुळे सुधारित विवरण पत्र भरण्याची गरज नाही.
प्रश्न : माझ्या वडिलांनी १९६० मध्ये २२,५०० रुपयांना एक घर विकत घेतले होते. ते घर त्यांच्या निधनानंतर माझ्या आईच्या नावावर झाले. ते घर माझ्या आईने २०१३-१४ या आíथक वर्षांत ४७ लाख रुपयांना विकले. माझ्या आईचे दुसरे काहीच उत्पन्न नाही. माझ्या आईचे वय ६८ वष्रे आहे. आईला कर भरावा लागेल का? तो किती भरावा लागेल? कर वाचवण्यासाठी काही तरतुदी आहेत का?
– एक वाचक
उत्तर : घर विकल्यानंतर होणारा नफा हा दीर्घमुदतीचा भांडवली नफा आहे. हा नफा करपात्र आहे. आपल्याला करपात्र नफा काढण्यासाठी १ एप्रिल १९८१ चे बाजार मूल्य काढावे लागेल त्या मूल्यावर २०१३-१४ वर्षांचा महागाई सूचक मुल्यांकानुसार खरेदी किंमत काढून ती विक्री किमतीतून वजा केल्यास भांडवली नफा मिळेल. जर त्या घराचे १ एप्रिल १९८१ चे बाजार मूल्य २,५०,००० रुपये इतके आहे तर त्याची २०१३-१४ वर्षांच्या महागाई सूचक मुल्यांकानुसार खरेदी किंमत २३,४७,५०० रुपये इतके येईल. (१९८१ वर्षांचे महागाई सूचक मूल्य १०० आहे आणि २०१३-१४ वर्षांचे महागाई सूचक मूल्य ९३९ इतके आहे. त्या प्रमाणे २,५०,०००७९३९/१००). भांडवली नफा (४७,००,००० रुपये (विक्री किंमत) – २३,४७,५०० रुपये) २३,५२,५०० रुपये इतका असेल. आईचे दुसरे उत्पन्न नसल्यामुळे त्यांचा कर हा खालील प्रमाणे असेल :
दीर्घ मुदतीचा करपात्र भांडवली नफा     रु. २३,५२,५००
कर :
प्रथम रु. २,५०,००० वर         शून्य
उर्वरित रु. २१,०२,५०० वर (२०% प्रमाणे)    रु. ४,२०,५००
शैक्षणिक अधिभार  ३%         रु. १२,६१५
                ————
एकूण कर रु. ४,३३,११५
हा कर वाचवायचा असेल तर दोन पर्याय उपलब्ध आहेत. दुसऱ्या घरामध्ये भांडवली नफ्याइतकी गुंतवणूक केली किंवा कलम ५४ ई सी प्रमाणे रोख्यांमध्ये गुंतवणूक केल्यास कर भरावा लागणार नाही.
‘अर्थ वृत्तान्त’मध्ये प्रसिद्ध लेखांमध्ये चर्चिलेल्या, शिफारस केलेल्या योजना/समभागांमध्ये लेखकांची व्यक्तिगत गुंतवणूक अथवा अन्य स्वारस्य नाही. परंतु सदर लेखकांचा सल्ला घेणारे ग्राहक, निकटवर्तीयांची त्यात गुंतवणूक असण्याची शक्यता नाकारता येत नाही.