18 October 2019

News Flash

होऊनि संन्यासी भगवीं लुगडीं। वासना न सोडी विषयांची ।।

अर्थ वल्लभ

|| वसंत कुलकर्णी

गुंतवणुकीतील जोखीम स्वीकारण्याची क्षमता अतिशय कमी असते त्यांना ‘फिक्स्ड मॅच्युरिटी प्लान – एफएमपी’ची शिफारस केली जाते. मात्र कोटक म्युच्युअल फंडाने एप्रिलमध्ये मुदतपूर्ती होणाऱ्या सहा ‘एफएमपी’मधील अंशत: रक्कम गुंतवणूकदारांना परत न देता सप्टेंबर २०१९ पर्यंत देण्याचे गुंतवणूकदारांना कळविले आहे. गुंतवणूकदारांच्या पैशांबाबत बेफिकिरीचे हे ताजे प्रकरण नेमके काय दर्शविते..

मुदतपूर्तीनंतर ठरलेले पैसे गुंतवणूकदाराला पूर्णपणे परत न देता अंशत: रक्कम सहा महिन्यांनी देण्याची बोली करणाऱ्या फंड घराण्याच्या आश्वासनावर विश्वास ठेवावा का, असा प्रश्न कोटक म्युच्युअल फंडांच्या ‘फिक्स्ड मॅच्युरिटी प्लान – एफएमपी’मध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना पडला आहे. कोटक म्युच्युअल फंडाच्या १० ते १७  एप्रिल दरम्यान मुदतपूर्ती होणाऱ्या सहा ‘एफएमपी’मधील अंशत: रक्कम गुंतवणूकदारांना परत न देता सप्टेंबर २०१९ पर्यंत देण्याचे फंड घराण्याने या ‘एफएमपी’च्या गुंतवणूकदारांना कळविले आहे. म्युच्युअल फंडांनी ८ ते ९ हजार कोटी कलंकित झी समूहाच्या वेगवेगळ्या कंपन्यांतून गुंतविले आहेत. यापकी १,७०० कोटी एफएमपी गुंतवणूकीतून आले आहेत.

निश्चित उत्पन्न देणाऱ्या रोखे गुंतवणुकीत दोन प्रकारची जोखीम असते. व्याजदर वाढण्याचा धोका आणि रोख्याची पत कमी होण्याचा धोका. ‘एफएमपी’सारख्या उत्पादनात मुळात ज्यांची गुंतवणुकीतील जोखीम स्वीकारण्याची क्षमता अतिशय कमी असते त्यांना ‘एफएमपी’ची उत्पादनाची शिफारस केली जाते. ओपन एण्डेड फंडातील गुंतवणुकांत व्याजदर वाढण्याच्या आणि पत कमी होण्याची जोखीम असल्याने ‘एफएमपी’त व्याजदर वाढण्याचा धोका टाळलेला असतो. सर्वसाधारणपणे ‘ट्रिपल ए’ आणि ‘डबल ए’ पत असलेले आणि एखाद्या ‘एफएमपी’च्या मुदतीइतक्याच मुदतीच्या रोख्यांत गुंतवणूक करणे अपेक्षित असते. एस्सेल समूहाच्या ज्या रोख्यांत कोटक म्युच्युअल फंडाने गुंतवणूक केली त्या रोख्यांची पत ‘ए (एसओ) ब्रिकवर्क’ अशी होती हे उघड झाले आहे. (संदर्भ : कोटक म्युच्युअल फंडाने ब्लूमबर्ग क्विंटच्या ई-मेलला दिलेले उत्तर). आज भारतात ‘डबल ए’पेक्षा कमी पत असणारे रोखे रोकडसुलभ नाहीत. या रोख्यांची पत क्रिसिल किंवा केअरसारख्या प्रतिष्ठित रेटिंग एजन्सीने निश्चित न करता ब्रिकवर्क या भारतात फारशा प्रसिद्ध नसलेल्या रेटिंग एजन्सीने निश्चित केली होती. रोख्यांना जेव्हा ‘स्ट्रक्चर्ड ऑब्लिगेशन (एसओ)’ असे रेटिंग दिले जाते तेव्हा त्या रोख्याची पत विशिष्ट प्रकारे उंचावण्याचा प्रयत्न असतो. या रोख्यांच्या बाबतीत ज्या रोख्यांत कोटक म्युच्युअल फंडाने गुंतवणूक केली त्या रोख्यांची पत प्रवर्तकांनी रोख्यांतील गुंतवणुकीच्या दीडपट रकमेइतके झी समूहाचे समभाग तारण ठेवून या रोख्यांची पत (स्ट्रक्चर्ड ऑब्लिगेशन) कृत्रिमरीत्या उंचावलेली होती. या रोख्यांच्या मुदतपूर्तीनंतर जेव्हा एस्सेल समूहाला पैसे कोटक म्युच्युअल फंडाला परत करता आले नाहीत, तेव्हा तारण असलेले समभाग विकून पैसे वसूल करणे अपेक्षित होते. इतक्या मोठय़ा प्रमाणावर झीच्या समभागांची विक्री झाली असती तर ४०० रुपयांचा झी समूहाचा समभाग १०० रुपयांवर आला असता. जसा अगोदर डीएचएफएलचा समभाग कोसळला. हे टाळण्यासाठी झी प्रवर्तकांनी म्युच्युअल फंडांना समभाग न विकण्याची केलेल्या विनंतीस फंडांनी मान्यता देऊन सप्टेंबर २०१९ पर्यंतची मुदत मान्य केली. ही विनंती मान्य केल्यामुळे काही प्रश्नांची उत्तरे मिळणे अपेक्षित आहे. सध्याच्या झी कम्युनिकेशनच्या तारण ठेवलेल्या समभागाचे मूल्य आजच्या बाजारभावानुसार रोख्यांतील गुंतवणुकीच्या दीडपट आहे. भविष्यात झी कम्युनिकेशनचा बाजारभाव कमी झाल्यास सध्या दीडपट असलेले सुरक्षा कवच कमी होईल. झीचे प्रवर्तक अतिरिक्त  समभाग तारण म्हणून देतील किंवा कसे या बाबत कोटक किंवा अन्य संबंधितांकडून स्पष्टता नाही.

कोटक म्युच्युअल फंडाकडून या ‘एसओ’ पत असलेल्या रोख्यांत गुंतवणूक करण्यामागे या फंडातील गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीवर अधिक नफा मिळावा हे सांगितले जाते. म्युच्युअल फंडातील सर्वच निर्णय मग खर्च कमी करणे असो किंवा ३६ फंड प्रकारांची निर्मिती असो गुंतवणूकदारांचे हित समोर ठेवून घेण्यात आल्याचे सांगण्यात येते. तसा हा निर्णयसुद्धा गुंतवणूकदारांच्या हितासाठीच घेतला गेल्याचे कोटक म्युच्युअल फंडाकडून प्रस्तुत केलेल्या निवेदनांत म्हटलेले आहे. संबंधित प्रश्न कोटक समूहाच्या प्रवक्त्यांना विचारण्यात आले. मात्र हे प्रश्न प्राप्त झाल्याची नोंद देताना प्रश्नाची उत्तरे वेळेत देण्याचे सौजन्य या प्रवक्त्यांनी दाखविले नाही.

कोटक म्युच्युअल फंड आणि झी/ एस्सेल समूहाच्या कंपन्या यांच्यात झालेल्या या व्यवहारात इन्व्हेस्टमेंट बँकरची भूमिका कोणी पार पाडली. या व्यवहारामध्ये कोटक समूहाच्या कोणत्या कंपनीस दलाली मिळाली किंवा कसे, कोटक म्युच्युअल फंडाने सौदापूर्व तपासणी (डय़ू डिलिजन्स) कसा केला. या प्रश्नांची उत्तरे जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत कोटक म्युच्युअल फंडाच्या स्थिर गुंतवणुकीच्या प्रमुख या नात्याने लक्ष्मी अय्यर आणि म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश शहा यांचे निर्दोषत्व सिद्ध होत नाही. ‘सेबी’कडून या गुंतवणुकीच्या निर्णयाचे विच्छेदन होणे गरजेचे आहे. प्रत्येक वेळी कार्यपद्धतीवर (सिस्टीम) खापर फोडून संबंधित व्यक्ती निर्दोष आहेत असे म्हणता येणार नाही. नीलेश शहा हे एका विशिष्ट विचारधारेचे पाईक आहेत. या विचारधारेचा ते उघड पुरस्कार करतात. ही विचारधारा आपल्या विरोधकांना राष्ट्रद्रोही समजते. अशी दुषणे देण्याला नीलेश शहा देखील अपवाद नाहीत. स्टेट बँकेच्या अनुत्पादित कर्जासाठी स्टेट बँकेशी संबिंधत व्यक्तींना जबाबदार धरणारे नीलेश शहा त्यांच्याशी संबंधित अनुत्पादित कर्जाला व्यवस्थेला जबाबदार धरतात (संदर्भ :  नीलेश शहा यांचे कोटक म्युच्युअल फंडाच्या मासिक ‘कॉनकॉल’मधील संभाषण).

भारतात सध्या निवडणुकांचा हंगाम सुरू आहे. सत्ता मूठभरांच्या हातात असली की अनर्थ कसा होतो याचा अनुभव मागील अनेक वष्रे देश घेत आहे. अर्थसत्तेबाबतही असाच निष्कर्ष काढता येईल. आज म्युच्युअल फंडाची ६४ टक्के मालमत्ता पाच फंड घराण्यांच्या ताब्यात आहे, तर ८४ टक्के मालमत्ता पहिल्या दहा फंड घराण्यांच्या व्यवस्थापनाखाली आहे. ‘सेबी’चे अध्यक्ष या एकवटलेल्या मालमत्तेबाबत नेहमीच चिंता व्यक्त करत आलेले आहेत. भारतीय वित्तक्षेत्राची सूत्रे मात्र मूठभर संस्था व संलग्न उच्चपदस्थांच्या हातात आहेत, त्यात कोटक यांचे नाव आघाडीवर आहे. या मूठभर व्यक्ती आर्थिक पतपुरवठय़ाची अथवा विनिमयदराची धोरणे संबंधितांचे वित्त हितसंबंध लक्षात ठेवूनच आखतात. हितसंबंधांची साखळी तयार करणे, जोपासणे याला हा ताजा व्यवहारसुद्धा अपवाद नव्हता. आजपर्यंत कोणत्याही कर्जदारास सहा महिन्यांची सूट न देणारे झीचे सुभाष चंद्र यांच्यावर का मेहरबान झाले असावे हे यातून लक्षात येते. तुकाराम महाराज म्हणतात- ‘होऊनि संन्यासी भगवीं लुगडीं। वासना न सोडी विषयांची।’ अर्थात भगवी वस्त्रे लेवून कोणी संन्सासी ठरत नाही आणि त्यांचे मन विषयवासनाही टाकत नाही. म्हणूनच ‘हर इन्व्हेस्टर की ताकद’ असे बिरुद मिरविणाऱ्या सेबीने गुंतवणूकदारांच्या संपत्तीवर दिवसाढवळ्या दरोडा घालणाऱ्या दोषींना योग्य ती शिक्षा देणे गरजेचे आहे. संबंधितांना शिक्षा होवो किंवा न होवो, प्रत्येक गुंतवणूकदरांनी कष्टाने कमावलेल्या पशाची आपण काळजी घेणे गरजेचे आहे.

shreeyachebaba@gmail.com

First Published on April 15, 2019 12:06 am

Web Title: how to invest money in india 10