आठ वर्षांपूर्वी इंडियाबुल्स फायनान्शियल सíव्हसेस या कंपनीतून रियल इस्टेट व्यवसाय वेगळा काढून (डीमर्ज) बनलेली सध्या भारतातील एक मोठी बांधकाम कंपनी ( तिसऱ्या क्रमांकाची) म्हणून ‘इंडियाबुल्स रियल इस्टेट लिमिटेड’चे नाव घेता येईल. गेल्या आठ वर्षांत कंपनीने केवळ रियल इस्टेट विकासक म्हणूनच नव्हे तर त्याच क्षेत्रातील इतरही शाखांत प्रवेश केला आहे. यात प्रामुख्याने निवासी तसेच व्यावसायिक वास्तूंचे विकसन आणि बांधकाम, गृह संकुले, मॉल्स, रिसॉर्टस, सेझ (एसईझेड) तसेच अशा सर्व प्रकल्पांचे सल्लागार म्हणून देखील ही कंपनी काम करते. २००७ मध्ये जीडीआर इश्यू यशस्वी झाल्यावर कंपनीने रिटेल तसेच ऊर्जा क्षेत्रातही प्रवेश केला होता. कंपनीची आíथक कामगिरी तितकीशी आकर्षक नसली तरीही ती अपेक्षेपेक्षा चांगली झाल्यामुळे अचानक कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ झालेली दिसते. सध्या कंपनी नाशिक तसेच पनवेलजवळ सेझ प्रकल्प उभारत असून ते लवकरच पूर्ण होतील. मार्च २०१४ साठी संपलेल्या आíथक वर्षांकरता कंपनीने गेल्या वर्षीच्या तुलनेत ४६% कमी म्हणजे १४४.६ कोटी रूपयांचा नक्त नफा कमावला आहे. मार्च २०१४ साठी संपलेल्या तिमाहीसाठीचा नफा देखील ९१% घसरलेला आहे. मात्र कंपनीकडे दिल्ली, मुंबई आणि चेन्नई या तीनही महानगरात मिळून सुमारे १०१० एकर  जमीन आहे. तसेच वर म्हटल्याप्रमाणे नाशिक मध्ये सुमारे २,५८८ एकर जमिनीवर कंपनी सेझ प्रकल्प राबवित आहे.  गेल्या काही वर्षांत कंपनीने ही व इतर अनेक क्षेत्रात केलेली गुंतवणूक येत्या दोन वर्षांत फायदा देऊ लागेल. पुस्तकी मूल्याच्या निम्मा असलेला सध्याचा बाजारभाव पाहता हा शेअर खरेदीसाठी निश्चितच आकर्षक वाटतो. अर्थात या शेअरचा बीटा २ असल्याने ही गुंतवणूक थोडीफार धोक्याची ठरू शकते. म्हणूनच धोका पत्करण्याची तयारी असलेल्या गुंतवणूकदारांनी यात गुंतवणूक करावी. शिवाय ‘स्टॉप लॉस’ पद्धत कटाक्षाने अवलंबावी.