|| वसंत माधव कुळकर्णी

इंडिया बुल्स ब्लूचीप फंड

खनिज तेलाच्या किमतीचा भडका, रुपयातील मूल्यऱ्हास आदि अर्थपरिमाणे उत्साहवर्धक नसल्याचा बाजाराला धसका बसला आहे. देशाची वर्तमान वित्तीय स्थिती दिलासा देणारी नसली तरी भविष्याविषयी काही आशादायक संकेतही आहेत. अशा समयी पठडीबाहेरच्या फंडाचा नव्याने गुंतवणुकीकरिता  विचार करावा लागणार. संशोधन पद्धतीत गवसलेला असाच हा चौकटीच्या बाहेरचा फंड..

प्रत्येक तिमाहीनंतर फंडांची कामगिरी तपासण्याचा नेम मागील अनेक वर्षे सुरू आहे. प्रारंभिक चाचपडत सुरू राहिलेल्या संशोधन पद्धतीच्या काळापासून ते ‘कॅप्चर रेशो’ या नवीन निकष निश्चितीपर्यंत म्युच्युअल फंड विश्लेषकाची भूमिका प्रगल्भ होत आली आहे. या संशोधन पद्धतीतून अनेक फंडांच्या भविष्यातील उत्तम कामगिरीची चाहुल बरीच आधी लागते. उदाहरणादाखल तीन वर्षांपूर्वी आयडीएफसी कोअर इक्विटी फंड (जुने आयडीएफसी क्लासिक इक्विटी फंड) हा फंड या पद्धतीने गवसला तेव्हा या फंडाची मालमत्ता केवळ ९० कोटी रुपयांची होती. मागील तीन वर्षांत या फंडाची मालमत्ता वाढून ३१ ऑगस्ट २०१८ रोजी फंडाची मालमत्ता ३०४० कोटी झाली आहे. सातत्याने मानदंड निर्देशांकापेक्षा सरस कामगिरी करणारा लार्ज कॅप फंड गटात लक्षवेधी ठरलेला इंडिया बुल्स ब्लूचीप फंडाचे भविष्यातील चित्र आशादायक असेल अशी चाहूल लागली आहे. हा फंड पारंपरिक गुंतवणूकदार आणि मध्यम जोखीम बाळगू इच्छिणाऱ्या फंड गुंतवणूकदारांसाठी सध्याच्या परिस्थितीत एक उपलब्ध पर्याय आहे. जे गुंतवणूकदार मुखत्वे लार्ज कॅप फंड गटातील फंडाच्या शोधात असतील अशा गुंतवणूकदारांनी या फंडाचा विचार करावा.

इंडिया बुल्स ब्लूचीप फंडात गुंतवणूक करताना निधी व्यवस्थापक ‘टॉप डाऊन’ आणि ‘बॉटम अप’ या दोन्ही रणनीती धोरणात्मक रीतीने वापरतात. धोरणात्मक रणनीती मुखत्वे वैश्विक ढोबळ अर्थव्यवस्था (मॅक्रो इकॉनॉमिक्स), भारतीय ढोबळ अर्थव्यवस्था, सरकारी धोरणे, अन्य आर्थिक परिमाणे, यावर निर्भर राहून उद्योग क्षेत्रे निश्चित करून कंपन्यांची निवड केली जाते. फंडाच्या मालमत्तेच्या ८० टक्के गुंतवणूक भांडवली मूल्यानुसार पहिल्या १०० कंपन्यांत होते. २० टक्के गुंतवणूक मिड कॅप आणि स्मॉल कॅप प्रकारच्या कंपन्यांत केली जाते. सुमित भटनागर हे इंडिया बुल्स म्युच्युअल फंडाचे मुख्य गुंतवणूक अधिकारी आणि या फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत. मागील वर्षभरात फंडाच्या गुंतवणुकीत २८ ते ३३ कंपन्यांचा समावेश होता. आघाडीच्या पाच गुंतवणुका एकूण मालमत्तेच्या ३५ टक्के, १० गुंतवणुका ५२ टक्के भाग व्यापतात. हा फंड एका अर्थाने फोकस्ड फंड या संकल्पनेत बसणारा फंड आहे.

‘निफ्टी ५० टीआरआय’ हा फंडाचा मानदंड असून फंडाची पहिली एनएव्ही १० फेब्रुवारी २०१२ रोजी जाहीर झाली. पहिल्या एनएव्हीला नियोजनबद्ध गुंतवणूक सुरू करणाऱ्या गुंतवणूकदाराला ५ ऑक्टोबरच्या रेग्युलर ग्रोथ एनएव्हीनुसार वार्षिक १०.८५ टक्के दराने परतावा मिळाला आहे. पहिल्या एनएव्हीला १ लाख एकरकमी गुंतवणुकीचे ५ ऑक्टोबरच्या रेग्युलर ग्रोथ एनएव्हीनुसार १ लाख ९३ हजार रुपये झाले असून वार्षिक परताव्याचा दर १०.८५ टक्के आहे. मागील तीन वर्षे फंडाने फंड गटातील सरासरीपेक्षा अधिक परतावा दिला आहे. फंडाचा मागील परतावा नकारात्मक वृद्धीदर दाखवत असला तरी सध्याची परिस्थिती नव्याने गुंतवणूक करण्यास पोषक म्हणावी लागेल. जानेवारी २०१८ पासून रुपयाच्या विनिमय मूल्यात १५ टक्के घट झाली असून, कच्च्या तेलाच्या किमतीत जानेवारी २०१८ पासून १७ टक्के वाढ झाली आहे. भविष्यातील अर्थपरिमाणे उत्साहवर्धक नसल्याचा बाजाराला धसका बसला आहे. वर्तमान देशाची वित्तीय परिस्थिती दिलासा देणारी नसली तरी वाढती कर्जाची मागणी आशादायक आहे. भविष्यात सकल राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा दर ७-७.५ टक्के  राहण्याची चिन्हे दिसत आहेत.

पितृ पंधरवडय़ात पितरं कावळ्याच्या रूपात येतात असे हिंदू धर्म मानतो. माऊलींना कावळा हा शुभशकुनाचा संकेत घेऊन येणारा वाटतो. बहुतांश म्युच्युअल फंड वितरक ठरावीक चौकटीतील फंडांची शिफारस करतात. वेगवेगळ्या कारणांनी गुंतवणूकदारांना पठडीबाहेरच्या फंडांचा नव्याने गुंतवणुकीकरिता विचार करावा लागणार असल्याने ‘मध्यम जोखीम, मध्यम परतावा’ देणारा या फंड चौकटीबाहेरचा हा फंड या संशोधन पद्धतीत गवसला आहे. पाहुण्याच्या आगमनाची चाहूल देणारा कावळा इंडिया बुल्स ब्लूचीप फंडाच्या भविष्यातील कामगिरीचा संकेत देतो असे वाटते. मध्यम जोखीम पत्करणाऱ्या गुंतवणूकदारांनी पाच ते सात वर्षांसाठी या फंडाचा विचार करावा.

shreeyachebaba@gmail.com

(अस्वीकृती: लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. स्तंभातील आकडेवारी व माहिती ही उपलब्ध स्रोतांपासून घेतली आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)