24 April 2019

News Flash

शतदा प्रेम करावे..

इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (बीएसई कोड - ५३२५१४)

|| आशीष अरविंद ठाकूर

इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (बीएसई कोड – ५३२५१४)

जेव्हा तेजी अंतिम चरणात असते तेव्हा या स्तंभातील लेखन मंदीच्या दाहकतेची जाणीव करून देते, तर मंदीच्या दाहकतेमुळे कोमेजलेल्या गुंतवणूकदारांच्या मनाला उभारीसाठी तेजीची फूंकर घालतो. अशा या तेजी-मंदीवर भरभरून प्रेम करण्याच्या लेखकीय भावनेला चतुरस्त्र कवी, संगीतकार यशवंत देव यांनी स्वरबद्ध केलेल्या अजरामर ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ या गीताचा निश्चितच आधार घेता येईल. अशा मोजक्या शब्दात जीवनाचे सार सांगणाऱ्या कवी मंगेश पाडगावकर आणि नुकतेच निधन पावलेल्या यशवंत देव यांना आदरांजलीसह या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळूया.

शुक्रवारचा बंद भाव-

  • सेन्सेक्स : ३५,०११.६५
  • निफ्टी : १०,५५३.००

गेल्या आठवडय़ाच्या पूर्वार्धात निफ्टी निर्देशांक मरणासन्न स्थितीत होता. नाकावर सूत ठेवलेल्या परिस्थितीत निर्देशांकाचे ते कलेवर १०,००० आज तोडणार की उद्या, हाच काय तो तेव्हा प्रश्न होता. परंतु अकस्मात कायापालट होऊन अशी काही सुखद तेजी अवतरली की दोन दिवसापूर्वीपर्यंत आपण निफ्टी निर्देशांकावर १०,००० वर धडपडत होतो हे सांगून खोटे वाटेल.

येणाऱ्या दिवसात निर्देशांकावर ३५,५००/ १०,७०० हा अवघड टप्पा असेल या स्तरावरून एक संक्षिप्त घसरण ही ३४,४०० ते ३४,००० / १०,३५० ते १०,२५० पर्यंत येऊन त्या नंतर वरचे लक्ष्य हे ३५,९०० ते ३६,५०० / १०,८०० ते ११,००० असेल.

शुक्रवारचा बंद भाव – रु. २८१.८५

नैसर्गिक वायू- सीएनजी जो औद्योगिक प्रकल्पासाठी (गॅस बेस्ड प्रोजेक्ट ) आणि गाडय़ांसाठी स्वस्त पर्यायी इंधन म्हणून वापरला जातो त्या क्षेत्रातील ही आघाडीची कंपनी होय. कंपनीच्या समभागाचा सामान्य मार्गक्रमण पट्टा (बँण्ड) हा रु. २५० ते रु. २८० आहे. २८० रुपयांच्या स्तरावर भाव सातत्याने पाच दिवस टिकल्यास (शुक्रवारचा भाव हा २८० रुपयांच्या वर आहे पण तो पाच दिवस टिकणे जरुरीच आहे ) तरच शाश्वत तेजी सुरू होऊन अत्यल्प मुदतीचे प्रथम उद्दिष्ट हे २९० ते ३०० रुपये आणि ३२० ते ३५० रुपये हे दुसरे उद्दिष्ट असेल. दीर्घ मुदतीचे उद्दिष्ट हे ४०० रुपये असेल. गुंतवणूकयोग्य रक्कम २५ टक्यांच्या चार तुकडय़ात विभागून प्रत्येक घसरणीत या समभागाचा विचार करावा या दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीला २०० रुपयांचा ‘स्टॉप लॉस’ ठेवावा.

सोन्याचा किंमत-वेध

भारताच्या बाबतीत कच्चे तेल, डॉलरमध्ये घसरण आणि तात्पुरती अनिश्चितता दूर झाल्यामुळे सोन्याचे भाव गडगडायला लागले. येणाऱ्या दिवसात सोन्याला प्रथम ३१,५०० आणि त्या नंतर ३१,२५० ते ३१,०००चा भरभक्कम आधार असेल. सोन्यावर शाश्वत तेजी ही रु. ३२,३०० स्तरावरच सुरू होईल. (सोन्याचे भाव ‘एमसीक्स’ वरील व्यवहारावर आधारित)

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती :  शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

First Published on November 5, 2018 1:39 am

Web Title: indraprastha gas limited bse code 532514