26 January 2021

News Flash

सोने गुंतवणूकदारांमध्ये धाकधूक

सोने खरेदी हा भारतीयांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे.

(संग्रहित छायाचित्र)

|| श्रीकांत कुवळेकर

सोने खरेदी हा भारतीयांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. किंबहुना तो त्यांचा जन्मसिद्ध अधिकारच आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. कारण भारतामधील सोन्याचा अंदाजित साठा हा २५,००० टनांहून अधिक आहे असे संपूर्ण जग मानत आले आहे. आणि ही गंगाजळी सतत वाढतच असते. याचे उदाहरण म्हणून या क्षेत्रातील दिग्गज पृथ्वीराज कोठारी असे म्हणतात की, ‘गेल्या ३० वर्षांत सोन्याचे भाव ५,००० वरून ५५,००० रुपये झाले असून माझ्याकडून सोने विकत घेतलेल्या ग्राहकांपैकी एकही जण आजपर्यंत सोने विकायला परत आलेला नाही.’

तर आज या विषयाला परत हात घालण्याचा हेतू म्हणजे मागील तीन-चार महिन्यात सोने गुंतवणूकदारांनी खूप काही अनुभवले आहे. म्हणजे सोन्याचे भाव वायदे बाजारात ऑगस्टमध्ये ५६,००० रुपये प्रति १० ग्रॅम या उच्चांकी पातळीवर पोहोचले. त्यानंतर केवळ दोन-तीन दिवसात ते परत ५०,००० रुपयांपर्यंत पडून त्यानंतर ५०,०००-५२,५०० या कक्षेत फिरत राहिले होते. मागील आठवडय़ात मात्र ते आता ४८,००० रुपयांपर्यंत घसरले असून गुंतवणूकदारांच्या चिंतेत भर घालताना दिसत आहेत. ऑगस्टच्या सुरुवातीला बाजारात वेगळाच मूड होता. जो तो सोने ६५,०००-७५,००० रुपये जाईल म्हणून खरेदी करू लागला होता. विशेष म्हणजे त्यावेळी केवळ आणि केवळ ‘लोकसत्ता अर्थवृत्तान्त’मधूनच सोने खरेदीदारांना सावध केले होते. प्रथम जुलैअखेर या स्तंभामधून आणि नंतर १३ ऑगस्टच्या अंकातील बातमीमधून सोन्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला गेला होता. त्यामध्ये नजीकच्या काळात सोने ४८,२००-५३,००० रुपये या कक्षेत राहील असे म्हटले होते ते अगदी तंतोतंत खरे ठरले आहे. शुक्रवारअखेर एमसीएक्स वायदे बाजारात सोने ४८,२०० रुपयांच्या खाली घसरले आहे.

आता पुढे काय हा प्रश्न गुंतावणूकदारांना पडणे साहजिकच आहे. तर ५५,००० रुपयांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना आपले मुद्दल परत येईल का याचा घोर लागून राहिला आहे. साधारणपणे सोने-चांदीमधील गुंतवणूकदार एकदा अडकले की, ७-८ वर्षे त्यातून निघणे कठीण असते असे ऐतिहासिक डेटा दर्शवतो. सध्याची परिस्थिती सोनेखरेदीला फारशी उत्साहवर्धक नाही. परंतु ज्यांना लग्न किंवा इतर मंगलविधींसाठी सोने आवश्यक आहे त्यांनी या पातळीवर खरेदी जरूर करावी. गुंतवणूकदारांसाठी रणनीती कशी असेल ते पुढील लेखात आपण पाहू.

थोडे मागे गेल्यास असे दिसेल की, सोन्यामध्ये आलेली विक्रमी तेजी ही प्रामुख्याने पाश्चिमात्य देशांमध्ये करोनाविषयक दिलेल्या प्रचंड आर्थिक मदतीमुळे आली होती. तसेच करोना साथीची भीती आणि जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये अचानक आलेल्या मोठय़ा मंदीमुळे बँकांमधील पैसे बुडू शकतील या भावनेने देखील सोनेखरेदीला जगभर हातभार लागून किमती अल्पकाळात गगनाला भिडल्या. ‘ईटीएफ’द्वारे सोन्यामध्ये प्रचंड गुंतवणूक झाली तर सर्वच देशांच्या रिझव्‍‌र्ह बँकांनी देखील परकीय गंगाजळीमध्ये सोन्याचे प्रमाण खूप वाढवले. तसे पाहता मागील तीन-चार वर्षे या बँका हळूहळू सोने खरेदी करीतच होत्या. या सर्वाचा एकत्रित परिणाम किमतींवर होऊन किमतीने ऑगस्टमध्ये शिखर गाठण्यात झाला.

परंतु आजची परिस्थिती बदलली आहे. करोनाची दुसरी लाट आली असली आणि ती पहिलीहूनही भयानक वाटत असली तरी ती जगबुडवी असू शकत नाही याची खात्री जगाला पटली आहे. तसेच सोन्यासाठी सर्वात जास्त नकारात्मक गोष्ट म्हणजे करोनावरील लस कधी येईल, तिची सुरक्षितता किती असेल आणि त्याची उपयुक्तता किती असेल याविषयीच्या बातम्या. त्यामुळे सोन्यासाठी तेजी दर्शवणाऱ्या १० गोष्टी घडत असल्या तरी भाव वर जाण्याऐवजी लशीवरील एक सकारात्मक बातमी सोन्याचे भाव १५-२० डॉलरने पाडताना दिसत आहे. सध्या जगात निदान तीन कंपन्यांकडून विकसित लस पुढील एक-दोन महिन्यात बाजारात धडकण्याच्या तयारीत दिसत असून यात आणखी तिघांची भर लवकरच पडेल. यामुळे बाजारातील ‘सेंटिमेंट’ सोन्यासाठी नकारात्मक बनले आहे. आणि मागणी पुरवठय़ापेक्षा सेंटिमेंटचा प्रभाव किमतींवर जास्त असतो हे पाहता सोन्यात अजून ५००-७०० रुपयांची घट संभवते.

दुसरे म्हणजे टेक्निकल चार्ट पाहून सोने गुंतवणूक करणारा मोठा वर्ग पाहिला तर सोन्यात एक शॉर्ट-कव्हरिंगमुळे फेरउसळी शक्य असून त्यामुळे सोने परत एकदा ५०,००० रुपयांकडे झेपावलेले दिसू शकते. परंतु मागील तीन महिन्यात ज्याप्रमाणे ५२,५०० रुपयांचा प्रतिबंध राहिला त्याप्रमाणे आता नजीकच्या काळात सोने ५०,००० रुपयांच्या वर जाणे निदान डिसेंबर अखेरपर्यंत तरी कठीण वाटत आहे. महत्त्वाचे म्हणजे डिसेंबर मध्यापासून ते जानेवारी पहिल्या आठवडय़ामध्ये जागतिक बाजारामध्ये बहुतेक हेज फंड व्यवस्थापक नाताळ आणि नूतन वर्ष साजरे करण्यासाठी सुट्टीवर जात असल्यामुळे बाजारात बऱ्याचदा माफक मंदी पाहायला मिळते. यावेळी देखील तशीच परिस्थिती असेल असे वाटत आहे.
आता सोन्याच्या भावावर प्रभाव पडणारे जागतिक बाजारातील घटक पाहू. मागील काही आठवडय़ात एक्स्चेंज ट्रेडेड फंड म्हणजे ईटीएफ हे सोन्याची विक्री करताना दिसत असून एसपीडीआर या जगातील सर्वात मोठय़ा फंडातील सोन्याची मालमत्ता मागील दीड महिन्यात १,२७८ टनांवरून थेट १,१९४ टनांवर घसरलेली दिसत आहे. म्हणजे ८४ टन सोनेविक्री या एकाच फंडाने केली आहे. ज्या फंडांमध्ये मालमत्तेत वाढ झाली आहे त्या वाढीचा वेग खूपच कमी आहे. यावरून गुंतवणूकदारांचा कल सोन्यातून बाहेर पडण्याचा आहे हे उघड आहे. डिसेंबरअखेरीस ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’च्या रिपोर्टमध्ये कदाचित रिझव्‍‌र्ह बँकांमधील खरेदी देखील थांबलेली किंवा बहुधा विक्रीमध्ये बदललेली दिसू शकेल. असे झाल्यास जानेवारीमध्ये देखील सोन्याच्या किमतींवर दबाव वाढू शकेल.

दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे अमेरिकेतील निवडणूक संपली असून हो-नाही करता करता ट्रम्प महाशयांनी पराभव मान्य करून व्हाइट हाऊस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. बायडेन यांचे सरकार लवकरच कार्यभार सांभाळेल आणि जागतिक व्यापार सुरळीत होऊ शकेल याची शक्यता खूपच वाढल्यामुळे सोन्याच्या भावातील ‘ट्रम्प प्रीमियम’ संपला आहे असे म्हणावे लागेल.

सोन्यासाठी एवढे नकारात्मक घटक असले तरी सोन्याला आधारभूत घटक देखील कमी नाहीत. उदाहरणार्थ, अमेरिकेमधील बायडेन सरकार नवीन आर्थिक पॅकेजबद्दल घोषणा करेल तेव्हा ते अपेक्षेपेक्षा मोठे असल्यास सोन्यात मोठी उसळी संभवते. शिवाय लस प्रत्यक्षात येऊन लोकांपर्यंत पोहोचून करोनाचा संसर्ग लक्षणीयरीत्या कमी होणे ही प्रक्रिया निदान चार-सहा महिन्यांची तरी आहे. त्यामुळे बाजारातील ‘एंटर द रूमर अँड एक्सिट ऑन न्यूज’ या नियमाप्रमाणे जेव्हा प्रत्यक्ष लस टोचणी मोठय़ा प्रमाणावर चालू होईल, आणि तोपर्यंत सोने ४५,००० रुपयांपर्यंत आलेले असल्यास एक मोठी उसळी घेऊन सोने ५०,००० पर्यंत जाऊ शकते. परंतु हा ‘सेंटिमेंट’चा खेळ असेल असे वाटते.
विशेष म्हणजे अमेरिकी डॉलर दिवसेंदिवस अशक्त होत चालला असून तो अजून घसरण्याचे संकेत अनेक अर्थतज्ज्ञांनी दिले आहेत. सर्वसाधारणपणे डॉलर आणि सोने यांच्या किमती नेहमीच व्यस्त असतात. परंतु गेल्या काही महिन्यात सोने आणि डॉलर एकाच दिशेने चाललेले दिसतात. हे समीकरण पूर्ववत होताना दिसले तर सोने आणि इतर कमोडिटीजमध्ये तेजी संभवते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अमेरिकेमधील आणि युरोपियन देशांमधील व्याजदर बऱ्याच काळासाठी शून्य ते नकारात्मक पातळीवर राहणार आहेत याचा फायदा देखील कधी ना कधी सोन्याला मिळणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे सध्या चालू असलेल्या मंदीमध्ये खचून जाऊन चुकीचा निर्णय घेण्यापेक्षा गुंतवणूकदारांनी परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून भावातील मोठय़ा उसळीमध्ये विक्री करून किंमत स्थिर झाल्यावर खरेदी असे करून एकूण खरेदी किंमत कमी करत जावी.

सरते शेवटी बाजाराचा एक नियम लक्षात घेणे महत्त्वाचे ठरते जो सोन्यालाही लागू आहे. घटक सकारात्मक असो किंवा नकारात्मक. या घटकांचा सुगावा बाजाराला आपल्या बराच आधी लागत असतो आणि सध्याच्या किमती या घटकानुरूपच असतात. वरील संपूर्ण माहिती जमेस धरता आणि बाजारतज्ज्ञांचे अल्प काळासाठी किमतीबाबतचे ४५,०००-५०,००० रुपये हे अंदाज पाहता सोने आधी ५०,००० रुपयांवर जाण्याची शक्यताच जास्त वाटत आहे.

दावा परित्याग : वाचकांनी लक्षात घ्यावे कीलेखकाचे सोन्यामधील व्यवहारांमध्ये कुठल्याही प्रकारचे वैयक्तिक अथवा व्यावसायिक हेतू नाहीत. त्यामुळे हा लेख म्हणजे गुंतवणुकीचा सल्ला न मानता केवळ परिस्थितीचे विश्लेषण म्हणूनच त्याकडे पाहावे.

लेखक वस्तू बाजार विश्लेषक.
ksrikant10@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 30, 2020 3:32 am

Web Title: investment in gold mppg 94
Next Stories
1 निरुत्तर नि:प्रश्न!
2 पतजोखीम क्रेडिट रिस्क
3 श्रोते व्हावे सावधान
Just Now!
X