13 December 2019

News Flash

गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या!

मागील लेखात मुदतपूर्व सेवानिवृत्तीचा विचार केल्यानंतर, नियत वयात निवृत्त होणाऱ्यांनी काय करणे आवश्यक आहे हे या लेखातून जाणून घेऊ.

|| अनुराधा सहस्रबुद्धे

मागील लेखात मुदतपूर्व सेवानिवृत्तीचा विचार केल्यानंतर, नियत वयात निवृत्त होणाऱ्यांनी काय करणे आवश्यक आहे हे या लेखातून जाणून घेऊ. सेवानिवृत्ती नेमकी कशी असते, असा प्रश्न सेवानिवृत्तांना विचारला तर या प्रश्नाचे उत्तर सात आंधळ्यांना हत्ती कसा वाटला, या प्रश्नाच्या उत्तराप्रमाणे असेल. यात मुख्यत्वे, त्या व्यक्तीची आíथक स्थिती, त्या व्यक्तीने नोकरी केलेल्या ठिकाणच्या सेवाशर्ती, कौटुंबिक जबाबदाऱ्या, कमावत्या वयात केलेली बचत अशा अनेक गोष्टींवर अवलंबून असेल. आमच्या प्राथमिकतेनुसार, आम्ही सर्व प्रकारच्या आíथक उद्दिष्टांचे – मुलांचे शिक्षण, घर, सुट्टीची योजना आखत असतो – परंतु निवृत्ती नियोजन हे आपल्या मनावर शेवटची गोष्ट असते. तथापि, काही पचायला कठीण अशा तथ्यांकडे पाहून आपल्याला हे लक्षात येईल की, सेवानिवृत्ती नियोजनाला आता पर्याय उरलेला नाही. निवृत्ती नियोजन शक्य तितक्या लवकर करणे आवश्यक आहे. जुन्या काळात ५० वर्षांपूर्वी निवृत्तीनंतर व्यक्ती सरासरी २० वर्षे जगत असे. वाढत्या आयुर्मानामुळे हा कालावधी ३५ ते ४० वर्षांवर गेला आहे. महागाई, जीवनशैलीत बदल आणि विभक्त कुटुंब पद्धती यांचा सेवानिवृत्तीनंतरच्या नियोजनासाठी एकत्रितपणे विचार करणे गरजेचे असते.

निवृत्ती नियोजन करताना ज्या पाच मूलभूत गोष्टी आहेत त्याचा आनंददायी सेवानिवृत्तीसाठी विचार करायला हवा.

मला सेवानिवृत्तीनंतर दरमहा किती पशाची गरज भासणार आहे याची आकडेमोड करणे गरजेचे असते. निवृत्तीनंतरचा अवधी किंवा सेवानिवृत्तीनंतर किती वर्षे मी जगणार हे माझ्या हातात नाही. सेवानिवृत्त होण्यास किती वर्षे शिल्लक आहेत. आजपर्यंत सेवानिवृत्तीसाठी मी किती पसे शिल्लक ठेवले आहेत. हे समजून घेणे आवश्यक आहे. ही आकडेमोड खालील उदाहरणावरून समजावून घेऊ.

सध्याचे वय :             ४६ वर्षे

मासिक खर्च              ३०,००० रु.

सध्या गुंतवणुकीवरील परतावा ८%

सेवानिवृत्तीचे वय :                ६० वर्षे

महागाईचा गृहीत दर              ८%

पुढे गुंतवणुकीवर अपेक्षित परतावा      १०%

अपेक्षित आयुर्मान                ८५ वर्षे

उपलब्ध बचत            २५,००,०००

दरमहा करावी लागणारी बचत १८,५४७ रु.

ही व्यक्ती १४ वर्षांनतर सेवानिवृत्त होईल तेव्हा सध्याचा ३० हजार रुपये असलेला मासिक खर्च ८८,००० रुपये झालेला असेल. सेवानिवृत्तीपश्चात त्यापुढील २५ वर्षे जमलेल्या निधीवर ८ टक्के परतावा गृहीत धरल्यास या व्यक्तीस २,१३,९६,००० रुपये इतक्या सेवानिवृत्त निधीची गरज भासेल. यासाठी त्या व्यक्तीस दरमहा १८,५४७ रुपये इतकी बचत करावी लागेल. फारच कमी लोकांनी आपल्याला सेवानिवृत्तीपश्चात नेमकी किती पशाची आवश्यकता लागेल याचे नीट नियोजन केलेले असते. अनेकदा सेवानिवृत्तीचे नियोजन करण्यात काही कारणांनी विलंब करतात. सेवानिवृत्तीसाठी बचत सुरू करण्याचा सर्वोत्तम वेळ आपण निवृत्त होतानाची नसून जेव्हा पहिला पगार हातात येतो ती आहे.

वरील उदाहरणातील व्यक्तीने सेवानिवृत्ती नियोजन करण्यास पाच वर्षे विलंब केल्यास त्या व्यक्तीस उर्वरित ९ वर्षे दरमहा ५१,००० रुपयांची बचत करणे भाग आहे. पूर्वी साधारण वयाच्या ५०-५१ व्या वर्षी मुले कमावती होऊन शेवटच्या ५-७ वर्षांत मोठी बचत करणे शक्य होत असे. लग्नाचे वय पुढे सरकत असल्याने मुले कमावती होण्याचा काळ पुढे सरकला आहे. वयाच्या ५५ व्या वर्षांनंतर मुले कमावती झाल्यास मोठय़ा बचतीसाठी शेवटची तीन वर्षेच शिल्लक राहतात.

महागाईसमोर बचतीची क्रयशक्ती टिकवणे कठीण आहे. प्रत्येक वर्षी मासिक खर्च वाढतच असतो. आपण सेवानिवृत्तीच्या वयात प्रवेश करतो तेव्हा एक विशिष्ट जीवनशैली अंगवळणी पडलेली असते. जर पुरेसे आíथक स्रोत नसतील तर खर्च वाचविण्यासाठी जीवनशैलीत बचत करणे अशक्य होते. सेवानिवृत्तीसाठी नियोजन करताना मालमत्ता विभाजन चुकणे ही न सुधारता येण्यासारखी गोष्ट आहे. आपल्या गुंतवणुकीत निश्चित उत्पन्न आणि समभाग यांचा योग्य समतोल साधायला हवा. सर्वात महत्त्वाचे महागाईपेक्षा सरस परतावा हवा असल्यास समभाग गुंतवणूक न टाळणे यातच हित असते.

तुम्ही बचत का करता? या प्रश्नाचे भारतात उत्तर, मुलांच्या शिक्षणासाठी किंवा सेवानिवृत्तीनंतर गावी घर बांधण्यासाठी अशी उत्तरे मिळतात. फारच कमी लोक कमावत्या वयात, सेवानिवृत्तीपश्चातच्या खर्चाचा विचार करतात. यानंतर मुलांच्या शिक्षणाच्या जोडीला, सेवानिवृत्ती पश्चातच्या खर्चासाठी हे उत्तर मनात येणे हे अर्थसाक्षरतेच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल असेल. अर्थसाक्षर नोकरदार व्यक्ती पेन्शन प्लान खरेदी करताना आढळतात. पेन्शन प्लानची निवड करताना ज्या प्रेरित करणाऱ्या गोष्टी आहेत, त्यापकी मित्र, कार्यालयीन सहकारी किंवा जवळच्या व्यक्तीने खरेदी केलेला पेन्शन प्लान हा सर्वात प्रभावशाली निकष ठरत असल्याचे सर्वेक्षणात आढळून आलेले आहे. मित्र, कार्यालयीन सहकारी किंवा जवळच्या व्यक्तीने खरेदी केला म्हणून मी पेन्शन प्लान घेतला म्हणणे हा ‘गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या’सारखा प्रकार आहे. पेन्शन प्लान हा अशा रीतीने खरेदी न करता, माझ्या वित्तीय गरजा आणि माझा जोखिमांक याला साजेसा असेल तोच मी खरेदी करणार असा संकल्प करूया.

(लेखिका पात्रताधारक वित्तीय नियोजनकार आहेत, akswealth@gmail.com  ई-मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल)

First Published on July 29, 2019 12:53 am

Web Title: investment in india mpg 94 2
Just Now!
X