|| श्रीकांत कुवळेकर

मागील १०० वर्षांचा इतिहास पाहता सोने आणि चांदी यांच्यात नवरा बायकोचे नाते असल्याचे दिसून येते. कधी दोघेही एकत्र चालतात तर कधी थोडे मागे पुढे असतात. या वेळच्या सोन्यातील तेजीमध्ये तुलनेने चांदी पाठी राहिलेली आहे. परंतु मागील काही दिवसांतील घडामोडी पाहता चांदी हे अंतर भरून काढेल एवढेच नाही तर सोन्यापेक्षा अधिक वेगाने वाढेल असे संकेत मिळत आहेत.

जुलै महिन्याच्या सुरुवातीला सोन्यामध्ये गुंतवणुकीबद्दल लिहिले गेले आहे. भारतात सोन्याचे भाव विक्रमी पातळीला पोहोचले असून त्याची कारणे अनेक आहेत. अमेरिका आणि चीनमधील झगडा, आखाती देशांमध्ये सततची अशांतता, इंग्लंडची युरोपीय संघातून बाहेर पडण्याची प्रक्रिया इत्यादी नित्याचेच झाले असताना जागतिक अर्थव्यवस्थेचा विकासदर अनुमानापेक्षा कमी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या सर्वावर कळस म्हणता येईल म्हणजे अमेरिकेमध्ये व्याजदरात कपातीचे संकेत सराफा बाजारासाठी उत्साहवर्धक आहेत. अशा परिस्थितीत साधारणत: इतर सर्व बाजार कोसळणे अपरिहार्य असते आणि गुंतवणुकीचा ओघ सोन्यामध्ये वळणे ओघानेच आले.

सोन्याच्या सध्याच्या भावामध्ये तांत्रिक कारणांमुळे साधारण ८००-१,००० रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत घसरण होण्याची शक्यता असून त्यावेळी त्यात गुंतवणूक करणे योग्य ठरेल. साधारणत: सोन्याच्या भावात वाढ होते तेव्हा चांदीदेखील वाढते. एखाददुसरा अपवाद वगळता मागील १०० वर्षांचा इतिहास पाहता सोने आणि चांदी यांच्यात नवरा बायकोचे नाते असल्याचे दिसून येते. कधी दोघेही एकत्र चालतात तर कधी थोडे मागे पुढे असतात. या वेळच्या सोन्यातील तेजीमध्ये तुलनेने चांदी पाठी राहिलेली आहे. परंतु मागील काही दिवसांतील घडामोडी पाहता चांदी हे अंतर भरून काढेल एवढेच नाही तर सोन्यापेक्षा अधिक वेगाने वाढेल असे संकेत मिळत आहेत.

थोडे मागे जाऊन पाहिले असता असे दिसेल की, २०११ साली आलेल्या विक्रमी तेजीमध्ये चांदीचे भाव भारतात ७०,००० रुपये प्रति किलो पलीकडे गेले होते. त्यावेळी १,००,००० रुपयांचा भाव होणार असे वाटून लोकांनी चांदीची प्रचंड खरेदी केली होती आणि नंतर भाव निम्म्यावर आल्यामुळे गुंतवणूकदारांची घोर निराशा झाली होती. आतादेखील चांदी ४१,०००-४२,००० रुपये प्रति किलोने उपलब्ध आहे. सोने दिवाळीपर्यंत ३८,०००-४०,००० रुपये होण्याची शक्यता बाजारातील जाणकार आणि अर्थतज्ज्ञ देत असतील तर चांदीचा भाव, निदान वर्षांअखेपर्यंत तरी, ४८,०००-५०,००० रुपये होणे अपरिहार्य आहे. गमतीने म्हणायचे तर सोने आणि चांदी हे नवरा बायको असतील तर स्त्रियांच्या या जमान्यात चांदी मागे राहणे कठीण आहे.

आता चांदीच्या जागतिक बाजारामधील घडामोडी पाहू. या वर्षांमध्ये प्रत्यक्ष चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या फंडांनी, ज्याला एक्स्चेंज-ट्रेडेड फंड असेही म्हणतात, तुफान खरेदी केली आहे. जानेवारीपासून सुरूझालेल्या वर्षांमध्ये आतापर्यंत २,४०० टन चांदी या फंडांनी एकत्रितपणे खरेदी केली आहे. यातील २,००० टन तर या महिन्यातच असून बुधवारी एकाच दिवसात ८१८ टन एवढी विक्रमी खरेदी झाली आहे. या फंडांची चांदीमधील एकत्रित गुंतवणूक विक्रमी १८,३०० टन एवढी झाली आहे.

गुंतवणुकीपलीकडे विचार केल्यास सौर ऊर्जा मिळवण्यासाठी लागणाऱ्या पॅनेल्समध्ये चांदीचा वापर वाढताना दिसत आहे. दुसरीकडे जागतिक विकासदर खुंटल्यामुळे तांबे, जास्त इत्यादी धातूंचे उत्पादन आणि मागणी घटण्याची शक्यता आहे त्याचा चांदीच्या उत्पादनावर देखील परिणाम होईल. याचे कारण चांदी साधारणत: तांबे आणि जस्त उत्पादनातील उपपदार्थ असतो.

गुंतवणूकदारांनी एक लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की,चांदीच्या वस्तू, जसे नाणी, पूजा साहित्य इत्यादी घेणे टाळून बार किंवा विटा घेणे योग्य ठरेल. तसेच या स्तंभातून सातत्याने सांगितल्याप्रमाणे वायदे बाजारामार्फत चांदी घेणे अधिक योग्य, किफायतशीर आणि सुरक्षित ठरेल आणि गुंतवणुकीवर सर्वाधिक परतावा शक्य होईल. एमसीएक्स या एक्सचेंजवर नुकतेच चांदीमध्ये एक किलो आणि पाच किलोची डिलिव्हरी अनिवार्य असणारे वायदे सुरूझाले आहेत ते छोटय़ा गुंतवणूकदारांना फायद्याचे ठरू शकतात.

आता थोडे कृषीक्षेत्रातील घडामोडींकडे वळूया. मागील आठवडय़ामध्ये देशातील खरीपहंगामातील पेरण्यांनी चांगलाच वेग घेतलेला पाहायला मिळत आहे. शुक्रवार अखेपर्यंत हंगामातील एकूण पेरणी ६९ दशलक्ष हेक्टरवर गेली असून अजूनही मागील वर्षांपेक्षा ६ टक्के पिछाडीवर आहे. पाऊस अजूनही काही भागात चिंतेचा विषय राहिलेला असून महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भातील काही भाग चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. भंडारा-गोंदियामध्ये पेरण्या अगदीच अत्यल्प आहेत.

कापसाच्या क्षेत्रात ६ टक्के वाढ झालेली दिसत असून कडधान्यांखालील क्षेत्र अजूनही १९ टक्क्यांनी पिछाडीवर असल्यामुळे आतातरी कापसाची वाटचाल मंदीकडे तर तूर, उडीद आणि मुगाची तेजीकडे दिसत आहे. तेलबियांखालील क्षेत्रदेखील थोडे कमीच आहे. ऑगस्ट मध्यापर्यंत एकूण हंगामाची परिस्थिती स्पष्ट होईल. पाऊसपाणी अजूनदेखील चिंतेचा विषय असून देशातील एकूण पाऊस शुक्रवापर्यंत सरासरीपेक्षा १६ टक्केपिछाडीवर आहे.

शुक्रवारपासून राज्यात आणि देशातील बहुतेक भागात जोरदार पावसाच्या बातम्या येत असून कित्येक राज्यात पूर परिस्थिती चिंताजनक आहे असे दिसत आहे. परंतु येत्या वर्षांसाठी एकंदर पाण्याची उपलब्धता चांगलीच वाढेल अशी चिन्हे आहेत.

शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी..

कृषी क्षेत्रासाठी एक अत्यंत चांगली बातमी मागील पंधरवडय़ात घडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या कृषी परिवर्तन समितीची पहिलीवहिली बठक दिल्लीत झाली. त्यामध्ये चíचल्या गेलेल्या महत्त्वाच्या मुद्दय़ांपकी बाजार समिती कायद्यात मोठय़ा सुधारणा करण्याचे संकेत दिले गेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, बाजार समित्यांची सूत्र नको त्या लोकांच्या हाती गेल्यामुळे शेतकऱ्यांचे शोषण होत राहिले आहे. यातून असा संदेश जात आहे की, हा कायदा आमूलाग्र बदलण्याची आणि त्याची अंमलबजावणीदेखील करण्याची इच्छाशक्ती या समितीची आहे. बघूया, मागील सरकारांप्रमाणे हे बदल नोकरशाही आणि वजनदार मंत्र्यांच्या दबावामुळे केवळ कागदावरच राहतात की प्रत्यक्षात येऊन शेतकऱ्याचे प्रश्न सोडवतात.

ksrikant10@gmail.com

(लेखक वस्तू बाजार विश्लेषक )