|| प्रवीण देशपांडे

  • प्रश्न : माझ्याकडे एकच राहाते घर आहे. मी दरमहा १२०० रुपये मालमत्ता कर सहकारी गृहनिर्माण संस्थेमार्फत महानगरपालिकेला देते. मी या कराची वजावट घेऊ शकते का? – मानसी मोरे, ईमेलद्वारे

उत्तर : आपल्याकडे फक्त एकच घर असेल तर आणि ते घर भाडय़ाने दिलेले नसेल तर त्या घराचे ‘घर भाडे’ शून्य समजले जाते. त्यामुळे मालमत्ता कराची वजावट आणि ३० टक्के प्रमाणित वजावटसुद्धा मिळत नाही. या शून्य रकमेतून गृहकर्जावर भरलेल्या व्याजाची वजावट मात्र घेता येते. या व्याजाच्या रकमेवर देखील मर्यादा आहेत. जर घर १ एप्रिल १९९९ नंतर खरेदी केले असेल किंवा गृहकर्ज घेतलेल्या वर्षांपासून तीन वर्षांत बांधले असेल तर व्याजाची २ लाख रुपयांपर्यंत वजावट मिळते आणि असे नसेल तर इतर बाबतीत व्याजाची फक्त ३०,००० रुपयांपर्यंत वजावट मिळते. हा व्याजाच्या रकमेएवढा तोटा आपल्याला इतर उत्पन्नातून वजा करता येतो.

  • प्रश्न : मी आणि माझ्या पतीने संयुक्त नावाने २०१३ मध्ये एक घर खरेदी केले होते. या घरासाठी आम्ही ८० लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले आहे. आता आम्हाला या गृहकर्जाचे हफ्ते भरण्यास अडचण निर्माण झाली आहे. हा हफ्ता कमी होण्यासाठी आम्ही वडिलांनी ५० वर्षांपूर्वी खरेदी केलेले घर विकून कर्ज फेडण्याचा विचार करीत आहोत. या व्यवहारावर कर वाचविण्यासाठी किती आणि कोठे गुंतवणूक करावी? – अंजली राणे, ईमेलद्वारे

उत्तर : आपल्या वडिलांनी ५० वर्षांपूर्वी खरेदी केलेले घर आपण आता विक्री करत असाल तर ही संपत्ती दीर्घ मुदतीची असेल. आपल्याला महागाई निर्देशांकाचा फायदा सुद्धा घेता येईल. महागाई निर्देशांकासाठी आधार वर्ष (बेस इयर) २००१-०२ असे करण्यात आले आहे. त्यामुळे आपल्याला १ एप्रिल २००१ रोजीचे ‘वाजवी बाजारभाव मूल्य’ किती आहे हे शोधावे लागेल. या ‘वाजवी बाजारभाव मूल्याचा’ महागाई निर्देशांक १०० आणि ज्या वर्षांत घर विक्री केले आहे त्या वर्षांचा महागाई निर्देशांक (आर्थिक वर्ष २०१७-१८ सालचा महागाई निर्देशांक २७२ आहे आणि २०१८-१९ चा अजून प्रकाशित झालेला नाही) विचारात घेऊन भांडवली नफा किती आहे हे समजेल. आपल्याला कर पूर्णपणे वाचवायचा असेल तर या भांडवली नफ्याच्या रकमेएवढी गुंतवणूक आपल्याला नवीन घरात किंवा कलम ५४ ईसी नुसार ५ वर्षांच्या बाँडमध्ये (कमाल मर्यादा ५० लाख रुपये) करावी लागेल. या रकमेव्यतिरिक्त बाकी रक्कम आपण गृहकर्ज फेडण्यासाठी वापरू शकता.

  • प्रश्न : माझ्या वडिलांचे १५ डिसेंबर २०१७ रोजी निधन झाले. ते नियमित विवरणपत्र भरत होते. त्यांनी आर्थिक वर्ष २०१६-१७ चे विवरणपत्र वेळेवर दाखल केले होते. मी त्यांचा एकमेव वारसदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या नावावर असणाऱ्या मुदत ठेवी, नामनिर्देशनानुसार माझ्या नावावर झाल्या आहेत. त्यावर मला कर भरावा लागेल का? आता माझ्या वडिलांचे २०१७-१८ या आर्थिक वर्षांचे विवरणपत्र मला दाखल करावे लागेल का? असल्यास मला काय करावे लागेल? – प्रकाश शिंदे, ईमेलद्वारे

उत्तर : आपण वडिलांचे वारसदार असल्यामुळे विवरणपत्र भरण्याची जबाबदारी आपल्यावर आहे आणि त्यांचे काही करदायीत्व असल्यास ते भरण्याचीसुद्धा जबाबदारी आपलीच आहे. वारसदाराला मृत व्यक्तीच्या वतीने भरावा लागणारा कर हा वारसदाराला मृत व्यक्तीकडून मिळालेल्या संपत्तीएवढा मर्यादित आहे. आपल्या वडिलांचे विवरणपत्र भरण्यापूर्वी आपल्याला प्राप्तिकर कायद्याच्या संकेतस्थळावर ‘वारसदार’ (लीगल हायर) म्हणून नोंदणी करावी लागेल. ही नोंदणी करताना आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील. यामध्ये मृत्यू प्रमाणपत्र, मृत व्यक्तीच्या पॅन कार्डची प्रत, वारसदाराच्या पॅनकार्डची स्वप्रमाणित प्रत आणि वारसदार असल्याचे प्रमाणपत्र (नोंदणी केलेले मृत्युपत्र, कोर्टाने किंवा स्थानिक संस्थेने दिलेले प्रमाणपत्र, फॅमिली पेन्शन प्रमाणपत्र वगैरे) चा समावेश होतो. वडिलांचे विवरणपत्र भरताना त्यांचे उत्पन्न काय दाखवावे हे महत्त्वाचे आहे. १ एप्रिल २०१७ ते त्यांच्या मृत्यूपर्यंत असणारे उत्पन्न हे वडिलांच्या नावाने दाखवावे लागेल. त्या उत्पन्नावरील कर भरावा लागेल. त्यांच्या मृत्यूच्या तारखेनंतर मिळालेले उत्पन्न वारसदाराला करपात्र आहे. हे उत्पन्न वारसदाराच्या विवरणपत्रात दाखवावे लागेल.

  • प्रश्न : मी एका खाजगी कंपनीत नोकरी करतो. २०१७-१८ या आर्थिक वर्षांसाठी माझे पगाराचे उत्पन्न ३० लाख रुपये आहे. पगाराव्यतिरिक्त माझे शेअर्स आणि म्युच्युअल फंडातील लाभांश आणि भांडवली नफ्याचे उत्पन्न आहे. मला विवरणपत्राचा कोणता फॉर्म भरावा लागेल? – विलास जाधव, ईमेलद्वारे

उत्तर : आपल्या उत्पन्नात शेअर्स आणि म्युच्युअल फंडातील लाभांश आणि भांडवली नफ्याच्या उत्पन्नाचा समावेश असल्यामुळे आपल्याला फॉर्म २ भरावा लागेल.

वाचकांच्या माहितीसाठी कोणते फॉर्म कोणाला लागू आहेत हे खालील कोष्टकात दर्शविले आहे :

  • प्रश्न : मी वकील असून वकिलीचा व्यवसाय करीत आहे. माझ्या व्यवसायाचा भाग म्हणून मला माझ्या सहकारी वकिलांना मदतीबद्दल मानधन द्यावे लागते. त्या मानधनावर मला उद्गम कर (टीडीएस) कापावा लागेल का? – एक वाचक, ईमेलद्वारे

उत्तर : व्यावसायिक, जे वैयक्तिकरीत्या व्यवसाय करतात आणि या व्यवसायातील मागील वर्षांतील उलाढाल किंवा एकूण प्राप्ती ५० लाख रुपयांपेक्षा जास्त असेल त्यांना उद्गम कर (टीडीएस)च्या तरतुदी लागू होतात. म्हणजेच आपल्या व्यवसायाची उलाढाल किंवा एकूण प्राप्ती आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये ५० लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये आपणाला टीडीएसच्या तरतुदी लागू होतील. आपण जर आर्थिक वर्षांत व्यवसायाच्या संदर्भात मानधन ३०,००० रुपयांच्या पेक्षा जास्त रक्कम एका व्यक्तीला देणार असाल तर टीडीएस १० टक्के इतका कापावा लागेल.

  • प्रश्न : मी एक वास्तुविशारद (आर्किटेक्ट) आहे. माझे आर्थिक वर्ष २०१७-१८ सालचे व्यवसायातील एकूण उत्पन्न १८,५०,००० रुपये इतके आहे. मला माझ्या लेख्याचे लेखापरीक्षण करणे बंधनकारक आहे का? – सुरेश काळे, ईमेलद्वारे

उत्तर : मागील वर्षांपासून छोटय़ा करदात्यांचा त्रास कमी करण्यासाठी काही ठरावीक व्यावसायिकांसाठी (निवासी करदाते) अनुमानित कराच्या तरतुदी लागू करून ४४ एडीए हे कलम सुरू केले. या कलमानुसार ज्या ठरावीक व्यावसायिकाची उलाढाल किंवा एकूण प्राप्ती ५० लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशांचे उत्पन्न (नफा) उलाढालीच्या ५० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दाखविल्यास हे उत्पन्न ‘धंदा-व्यवसायातील उत्पन्न’ म्हणून गणले जाईल. हे दाखविताना सर्व खर्च आणि घसारा विचारात घेतला असे समजण्यात येईल. जर करदात्याने एकूण प्राप्ती किंवा उलाढालीच्या ५० टक्क्य़ांपेक्षा कमी उत्पन्न (नफा) दाखविल्यास त्याला लेखे ठेवणे बंधनकारक आहे आणि शिवाय कलम ४४ एबी नुसार लेख्यांचे लेखापरीक्षणसुद्धा करून घ्यावे लागेल, जरी त्यांच्या व्यवसायाची एकूण प्राप्ती किंवा उलाढाल ५० लाख रुपयांपेक्षा कमी आहे.

ठरावीक व्यवसायामध्ये डॉक्टर, इंजिनीअर, सी.ए., वकील, वास्तुविशारद, चित्रपटसृष्टीतील कलाकार, तंत्रज्ञ, अंतर्गत सजावट सल्लागार वगैरेंचा समावेश होतो. आपले उत्पन्न ५० लाख रुपयांपेक्षा कमी आहे, आपण एकूण उत्पन्नाच्या (१८,५०,००० रुपयांच्या) किमान ५० टक्के इतकी रक्कम म्हणजेच ९,२५,००० रुपये इतका नफा दाखविल्यास आपली लेखे ठेवण्यापासून आणि त्याचे लेखापरीक्षण करून घेण्यापासून सुटका होईल.

लेखक सनदी लेखाकार आणि कर सल्लागार आहेत. त्यांच्याशी ई-मेल pravin3966@rediffmail.com वर संपर्क साधून आपले करविषयक प्रश्न विचारता येतील.