|| वसंत माधव कुळकर्णी

शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येकाला आपण केलेल्या गुंतवणुकीतील एक तरी समभाग बहुप्रसवा (मल्टी बॅगर) व्हावा असे वाटते. मागील आठवडय़ात इन्फोसिसला बाजारात सूचिबद्ध होऊन २५ वर्षे झाली. या २५ वर्षांत इन्फोसिसने केलेल्या संपत्तीच्या निर्मितीची चर्चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर रंगली. बहुप्रसवा समभाग हुडकणे हे सागराच्या तळाशी मोती असलेला शिंपला सापडण्यापेक्षाही कठीण आहे. प्रवर्तकांनी व्यवसायास सुरुवात केल्यानंतर प्रामुख्याने आयपीओ किंवा एखाद्या वर्षांत गुंतवणूक केलेल्या समभागाचा प्रवास बहुप्रसवा होण्याची शक्यता असते. मिड कॅपच्या तुलनेत स्मॉल कॅपमधील भावी बहुप्रसवा समभाग हुडकण्यासाठी विशेष कौशल्य लागते. हे कौशल्य डीएसपीच्या विनित सांबरे, एचडीएफसीच्या चिराग सेटलवाड आणि एल अँड टी म्युच्युअल फंडाच्या सौमेंद्रनाथ लाहिरी यांनी आत्मसात केलेले असून लाहिरी यांनी एल अँड टी इमर्जिग बिझनेसेस फंडाच्या माध्यमातून याचे यशस्वी प्रदर्शन केले आहे.

एल अँड टी फंड घराण्याच्या यशस्वी स्मॉल कॅप गुंतवणुकीची उदाहरणे इमर्जिग बिझनेसेस फंडाच्या गुंतवणुकीत तपासायला मिळतात. जसे की, नव्या प्रकारच्या व्यवसायाच्या (एफएम रेडिओ स्टेशन) संधी निर्माण झालेल्या कंपन्या (एन्टरटेनमेंट नेटवर्क), एका मोठय़ा उद्योग क्षेत्राचा लहान हिस्सा व्यापलेली कंपनी (आयशर मोटर्स), असंघटित क्षेत्रातील हिस्सा नव्याने आपल्याकडे वळविण्यात यशस्वी झालेली कंपनी (कजरिया सिरॅमिक्स) अशी उदाहरणे आढळतात. पंधरा वर्षांपूर्वी बाजारात सूचिबद्ध असलेल्या १०० कोटीपेक्षा अधिक नफा असलेल्या असलेल्या कंपन्यांची संख्या मागील दहा वर्षांत ५० वरून ३४९ वर पोहोचली आहे. दहा वर्षांत ‘एस अँड पी बीएसई सेन्सेक्स’च्या १४ टक्क्यांच्या तुलनेत ‘एस अँड पी बीएसई स्मॉल कॅप’ निर्देशांकाने १६ टक्के परतावा दिला आहे. मागील तीन वर्षांत कमी होणारे व्याजदर आणि घसरलेल्या जिन्नसांच्या किमती याचा परिणाम स्मॉल कॅप कंपन्यांच्या उत्सर्जनात वाढ होण्यात झाला. परिणामी मागील २०१७ मध्ये मिड आणि स्मॉल कॅप गुंतवणुकांनी स्वप्नवत परतावा दिला. मागील वर्षांत गुंतवणूकदारांनी सर्वाधिक पसंती मिड आणि स्मॉल कॅप फंडांना दिली.

स्मॉल कॅप कंपन्यांच्या उत्सर्जनाचा वृद्धीदर अर्थव्यवस्थेच्या वृद्धीदरापेक्षा अधिक असल्याने अर्थचक्राच्या कुठल्याही टप्प्यात केलेल्या गुंतवणुकीने तीन ते चार वर्षांत लार्ज कॅपपेक्षा अधिक परतावा दिला आहे. हा फंड मागील दोन वर्षांत परवडणारी घरे, बचतीचे भौतिकाकडून अभौतिकाकडे झालेले संक्रमण, जीएसटी अशा अनेक बदलांच्या लाभार्थी असलेल्या कंपन्यातून गुंतवणूक करणारा फंड आहे.

अपेक्षित गुंतवणुकीत ‘एस अँड पी बीएसई स्मॉल कॅप टीआरआय इंडेक्स’मधील सर्वाधिक भांडवली मूल्यापेक्षा कमी भांडवली मूल्य असलेल्या कंपन्यांचा समावेश असेल. या गुंतवणूक परिघातील कंपन्यांची निवड कंपन्यांच्या नफ्याचा वृद्धीदर आदर्श व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करणारे व्यवस्थापन सशक्त ताळेबंद आणि मुख्य म्हणजे व्यवसाय वृद्धीच्या संधी या निकषांवर निधी व्यवस्थापक समभागांची निवड करेल. स्मॉल कॅप कंपन्यांचा वृद्धीदर जीडीपीच्या वृद्धीदराहून अधिक असल्याने गुंतवणूकदार भरघोस परताव्यासाठी स्मॉल कॅप गुंतवणुका पसंत करतात. बाजारात धोका जितका अधिक, तितका नफा अधिक हा नियम स्मॉल कॅप समभाग आणि स्मॉल कॅप समभागांतून गुंतवणूक करणाऱ्या फंडांनासुद्धा लागू होतो. या फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी या गुंतवणुकीतील धोका समजून घेणे गरजेचे आहे. एकूण गुंतवणुकीत स्मॉल कॅप गुंतवणुकीचे प्रमाण आपल्या जोखीमांकाला साजेसे असावे लागते. अधिक परताव्यासाठी जोखीमांकाशी विसंगत प्रमाणात गुंतवणूक करू नये. हे गुंतवणूक करण्यापूर्वी लक्षात घेणे आवश्यक आहे. एकूण गुंतवणुकीच्या पाच ते १० टक्के दरम्यान गुंतवणूक स्मॉल कॅप फंडात केल्यास गुंतवणुकीवरील नफ्याचे प्रमाण वाढू शकते. सौमेंद्रनाथ लाहिरी यांच्या रूपाने लाभलेला मुख्य गुंतवणूक अधिकारी आणि एल अँड टी इमर्जिग बिझनेसेस फंडासारख्या यशस्वी फंडाच्या पाश्र्वभूमीवर या फंडात गुंतवणूक करण्याचा विचार करावा. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बाजार जोखमींच्या अधीन असते हा इशारा स्मॉल कॅप फंडाच्या बाबतीत विशेष ध्यानात घेणे आवश्यक आहे.

shreeyachebaba@gmail.com

(अस्वीकृती: लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. स्तंभातील आकडेवारी व माहिती ही उपलब्ध स्रोतांपासून घेतली आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)