|| अजय वाळिंबे

मैथन अ‍ॅलॉइज लिमिटेड (बीएसई कोड – ५९००७८)

अनेकदा काही कंपन्या उत्तम कामगिरी करत असून देखील आपल्या नजरेतून निसटतात. मोठमोठे नावाजलेले गुंतवणूकदार देखील विनाती ऑरगॅनिक्स, व्हील्स इंडिया किंवा ३-एम इंडियासारख्या उत्तम कंपन्या आपल्या नजरेआड राहिल्याचे प्रांजळपणे कबूलही करतात. मैथन अ‍ॅलॉइज ही अशीच एक कंपनी असावी. १९९५ मध्ये एस. सी. अगरवाल यांनी स्थापन केलेली ही कंपनी सातत्याने उत्तम कामगिरी करीत आहे. मँगनीज अ‍ॅलॉइजचे उत्पादन करणारी ही भारतातील एक प्रमुख कंपनी असून गेल्या २० वर्षांत कंपनीने बरद्वान, बिर्निहात (मेघालय) तसेच विशाखापट्टणम येथे असे तीन प्रकल्प उभारले आहेत. फेरो सिलिकॉन, सिलिको मॅंगनीज आणि फेरो मॅंगनीज ही कंपनीची प्रमुख उत्पादने असून ती प्रामुख्याने स्टील उद्योगात वापरली जातात. कंपनीच्या प्रमुख ग्राहकांच्या मंदियाळीत जेएसडब्ल्यू स्टील, जिंदाल स्टील अँड पॉवर, पॉस्को, सेल, चायना स्टील, उषा मार्टिन, ह्य़ुंदाई स्टील, कतार स्टील इ. अनेक कंपन्यांचा समावेश आहे. २००५ पासून कंपनीने आपल्या उत्पादनांच्या निर्यातीला सुरुवात केली. गेल्या काही वर्षांत देशांतर्गत उत्पन्न वाढीबरोबरच कंपनीने निर्यातीतही उत्तम वाढ साध्य केली असून नुकतेच ६००० टन अ‍ॅलॉय कतारला रवाना केले. मार्च २०१८ साठी संपणाऱ्या आर्थिक वर्षांकरिता कंपनीने उत्तम कामगिरी करून दाखवली आहे. या आर्थिक वर्षांत कंपनीने १,८९१ कोटी रुपयांच्या उलाढालीवर २९१.८१ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला असून तो गेल्या आर्थिक वर्षांच्या तुलनेत ५९.४७ टक्क्य़ांनी अधिक आहे. सध्या स्टील उद्योगाला चांगले दिवस आले असल्याने मैथन अ‍ॅलॉइजला देखील उत्तम दिवस आले आहेत. कंपनीचे जून २०१८ अखेर समाप्त तिमाहीचे निकालदेखील अपेक्षेप्रमाणे उत्साहवर्धक आहेत. या कालावधीत कंपनीने ४५५.२६ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ६५.४४ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तो ११ टक्क्य़ांनी अधिक आहे. एकंदरीत बाजाराचा कल पाहता यंदाचे तसेच आगामी दोन र्वष देखील मैथनसाठी चांगलीच असतील अशी अपेक्षा आहे. उत्तम प्रवर्तक, अत्यल्प कर्ज आणि मूल्यांकनाचे म्हणाल तर केवळ ५.८ प्राइस अìनग गुणोत्तर असलेली ही कंपनी म्हणूनच गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटते.