28 January 2021

News Flash

 बंदा रुपया : ‘किर्ती’वान कर्तबगारी!

मराठी मातीतील उद्यम-व्यवसायातील नवधुमाऱ्यांचा वेध घेणारे साप्ताहिक सदर

किर्ती ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे संस्थापक  १. विष्णुदास भुतडा आणि  २. अशोक भुतडा

 प्रदीप नणंदकर

मराठी मातीतील उद्यम-व्यवसायातील नवधुमाऱ्यांचा वेध घेणारे साप्ताहिक सदर ..

व्यवसायाची कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना व फारसे शिक्षण नसतानाही १९७० साली लातूरमधील औद्योगिक वसाहतीत केवळ लाखभराच्या गुंतवणुकीत विष्णुदास भुतडा यांनी सुरू केलेला व्यवसाय आज वार्षिक पाच हजार कोटींच्या उलाढालीला पोहोचला आहे. खाद्यतेलातील देशातील अग्रगण्य ब्रॅण्डमध्ये किर्तीचे नाव आवर्जून घेतले जाते आणि सध्या लातूर, नांदेड, हिंगोली, सोलापूर व विजापूर या ठिकाणांहून त्यांचे खाद्यतेलाचे उत्पादन सुरू आहे. मराठवाडय़ासारख्या मागास भागात नेमका हा व्यवसाय कसा रुजला? तो कसा विकसित झाला? याचे श्रेय नेमके कोणाचे? ही कहाणी समजून घेऊ या.

दोन वेळा परीक्षा दिल्यानंतर दहावी उत्तीर्ण झालेल्या विष्णूदास भुतडा यांनी सहकारी प्रशिक्षण केंद्रात पुढील शिक्षण घेतले. पुढे सहकारी संस्थेतच सुपरवायझर म्हणून नोकरी मिळविली. त्यानंतर एका बँकेत क्लर्क कम अकाऊण्टण्ट अशा उमेदवारीनंतर त्यांना पणन व्यवस्थापकपदावर बढती मिळाली. हा इतका अनुभव नोकरीकडे पाठ करून व्यवसायाकडे असलेला कल आजमावण्यासाठी त्यांना पुरेसा ठरला.

सुरुवात काही जणांसह भागीदारीत झाली. मात्र बहुतांशप्रकरणी जसे घडते त्याप्रमाणे भागीदारीत अडचणी निर्माण झाल्या आणि व्यवसाय गुंडाळावा लागला. १९७०च्या आसपासचा तो काळ होता. लातूरच्या सहकारी संस्थेकडून मिळविलेल्या एक लाख रुपयाच्या गुंतवणुकीवर कमल ऑइल मिल या नावाने भुतडा यांचा स्वत:चा व्यवसाय सुरू झाला. दररोज दोन टन गाळप करण्याची क्षमता व सुमारे ७०० किलो खाद्यतेलाचे उत्पादन सुरू झाले. प्रारंभी चार कामगारांच्या मदतीने सुरू झालेल्या या व्यवसायात भुतडा स्वत:ही रमले आणि त्यांनी जमही चांगला बसविला.

दहा वर्षांनी त्यांचा मुलगा अशोक दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर तोही व्यवसायात लक्ष देऊ लागला. बारावीचे शिक्षण पूर्ण केल्यावर अशोकने पूर्ण वेळ व्यवसायात लक्ष देण्यास सुरुवात केली. १९८७ साली या व्यवसायाचे उपांग म्हणून दाल मिल उद्योगाला सुरुवात झाली आणि सर्व प्रकारच्या डाळीचे उत्पादन घेणे सुरू झाले. १९९४ साली खाद्यतेलाचा पहिला सॉल्व्हंट प्रकल्प लातुरात सुरू झाला. त्यानंतर हळूहळू व्यवसाय विस्तारला गेला. अशोकसोबत किर्ती, भरत, सतीश या मुलांनीही व्यवसायात लक्ष घालणे सुरू केले. त्यानंतर नातूमंडळी आनंद, अर्जुन, अंकित, अजित, अरिवद यांनी उच्चशिक्षण घेतल्यानंतर आपल्या सर्व क्षमता व्यवसाय वाढीसाठी वापरण्याचे ठरविले आणि पाहता पाहता व्यवसायाने मोठी झेप घेतली.

विष्णुदास भुतडा यांच्या दृष्टीने कुटुंबातील एकोपा हे कायम सर्वोच्च स्थानी होते. तथापि त्यांनी हे प्रारंभापासून घरातील सर्वाना व्यवसायात लक्ष घालायला लावून साध्य केले आणि व्यवसायाचा पसाराही वाढवत नेला. त्यांच्या आग्रहामुळे आज कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र राहतात. भीष्म पितामहाच्या भूमिकेत ९० वर्षीय विष्णुदास भुतडा हे आजही झेपेल तसे व्यवसायावर लक्ष ठेवून आहेत.

व्यवसाय वाढवताना लातूरच्या आसपासच्या जिल्हय़ावर या उद्योगाने लक्ष केंद्रित केले. नांदेड, िहगोली, सोलापूर व कर्नाटकातील विजापूर येथे सॉल्व्हंट प्रकल्प उभे केले. रोज दोन टन गाळपक्षमता प्रारंभी होती. सध्या सर्व प्रकल्पांची मिळून एकूण गाळपक्षमता साडेचार हजार टन आहे. सोयाबीन, सूर्यफूल, सरकी यांपासूनचे खाद्यतेल तर तूर, हरभरा, मूग, उडीद याची डाळ दालमिलमध्ये तयार केली जाते. दोन हजारांपेक्षा अधिक कामगार प्रत्यक्ष रोजगारात असून अप्रत्यक्षणे पाच हजार जणांना या उद्योगातून रोजगार उपलब्ध झाला आहे. अर्थात स्थानिक मंडळींना रोजगार मिळायला हवा हा आग्रह आणि त्यासाठी स्थानिकांच्या क्षमता विकसित करण्यासाठी कंपनीने मेहनतही घेतली आहे. केवळ पुस्तकी ज्ञान उपयोगाचे नसून त्याला अनुभवाची जोड मिळणे किती महत्त्वाचे असते याचा हा उद्योग मूर्तिमंत नमुना आहे. औपचारिक शिक्षण फारसे नसतानाही, आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या उद्योगांसोबत स्पर्धा करता येऊ शकते. हे भुतडा यांच्या उद्योगाने प्रगतीने दाखवून दिले आणि तसा आत्मविश्वास त्यांनी इतरांतही निर्माण केला. अगदी दहावी, बारावीपर्यंत शिक्षण झालेली ग्रामीण भागांतील मुलांमध्ये कंपनीत व्यवस्थापकपदापर्यंतची काम करण्याची क्षमता या आत्मविश्वासामुळेच सिद्ध झाली आहे.

व्यवसायातील आवड, मेहनतीची तयारी, सातत्य आणि अनुभव या जोरावर ग्रामीण भागातील तरुणांमध्ये वेगळा विश्वास निर्माण केला गेला. कंपनीतील व्यवस्थापक, अभियंते, टेक्निशियन, उत्पादन व्यवस्थापक, विपणन व्यवस्थापक अशी सर्व मंडळी स्थानिकच आहेत. काही अंगमेहनतीची कामे करणारी मंडळी परप्रांतीय आहेत. व्यवसाय वाढवताना व्यवसायातील अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करायला हवेच, मात्र जगभर कोणते बदल सुरू आहेत त्यानुसार आपल्यात काय बदल व्हायला हवेत याचा अभ्यास करून ते सर्व तंत्रज्ञान प्रत्यक्षात आणणे सुरू केले. जगभर आता गुणवत्तेवर भर दिला जातो, त्यासाठी जगात उपलब्ध उच्च तंत्रज्ञानाच्या तोडीचे तंत्रज्ञान त्यांनी आपल्या व्यवसायात आणले. या कामासाठी नव्या पिढीतील मंडळींनी योगदान दिले. बदल स्वीकारण्यासासाठी लागणारी लवचीकता, एकरूप होण्याची मानसिकता व ज्या दिशेने जावयाचे त्या दिशेकडे जाण्यासाठी सर्वाचे एकमत ही भूमिका अर्थात विष्णुदास यांचीच. कौटुंबिक पातळीवर उद्योगातील चढ-उतार आणि जागतिक घडामोडींवर कुटुंबातील इंजिनीअर, सीए, एमबीए झालेल्या मुलांना बरोबर घेऊन सातत्याने चर्चा घडवून आणल्या आणि त्याचा योग्य उपयोग व्यवसायवाढीसाठी निर्णय प्रक्रियेत होत गेला, असे म्हणूनच ते आवर्जून सांगतात.

ज्या भागात आपण व्यवसाय करतो आहोत त्या भागातील शेतकऱ्यांमध्ये त्यांनी उत्पादित केलेला माल हमखास विकला जाऊ शकतो, त्याचे पैसे वेळेवर मिळतील याबद्दल विश्वास निर्माण व्हायला हवा. त्याची काळजी किर्ती उद्योग समूहाने घेतली. एकेकाळी सूर्यफूल उत्पादनात आशिया खंडात पहिल्या क्रमांकावर असलेला लातूर जिल्हा सूर्यफुलाचे भाव कमी झाल्याने सोयाबिन उत्पादनाकडे वळला. हा बदलही उत्पादित केलेले सोयाबिन स्थानिक पातळीवर खरेदी करू अशी हमी किर्ती उद्योगाने दिल्याने शक्य बनले. लातूरच नव्हे तर उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली, बीड, सोलापूर, विजापूर, गुलबर्गा, बिदर या जिल्हय़ांत सोयाबीनचे उत्पादन मोठय़ा प्रमाणावर वाढत आहे. मध्य प्रदेशमधील सोयाबिन उत्पादित करणाऱ्या जिल्हय़ाप्रमाणेच लातूर परिसरात सोयाबीनचे उत्पादन सध्या सुरू आहे. या भागात उत्पादित होणारे सोयाबिन जसे खरेदी केले जाते त्याचप्रमाणे लागणारे सूर्यफूल देशात जेथे उत्पादित हाते तेथून किर्तीकडून खरेदी केले जाते. पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार या प्रांतांतील सर्वाधिक सूर्यफुलाची खरेदी किर्ती उद्योग समूहाकाडून केली जाते. दरवर्षी किमान ६० हजार टनापेक्षा अधिक ती खरेदी होते. खाद्यतेल एक किलो, पाच किलो, १५ किलो व एक लिटर, १५ लिटरच्या पॅकमध्ये उपलब्ध आहे. मराठवाडय़ात जे खाद्यतेल विकले जाते त्याच्या ७० टक्के वाटा हा किर्तीचा आहे. ही नाममुद्रा महाराष्ट्राव्यतिरिक्त छत्तीसगड, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश या प्रांतातही खाद्यतेलासाठी प्रसिद्ध आहे.

खाद्यतेलाबरोबर किर्तीच्या डाळींनाही चांगली मागणी आहे. किर्ती याच नाममुद्रेखाली हा माल विकला जातो. किर्तीने आंतरराष्ट्रीय गुणवत्ता मानांकन आयएसओ-९००१ आणि आयएसओ-२२००० हे २००५ सालीच मिळविले आहे. किर्ती गोल्ड, किर्ती ग्रोलाइट, किर्ती सोयालाइट, किर्ती रॉयल, किर्ती सनलाइट याला बाजारात चांगली मागणी आहे. किर्ती अ‍ॅग्रोवेट लिमिटेड, किर्ती उद्योग, किर्ती फूड्स लिमिटेड, किर्ती अ‍ॅग्रोटेक लिमिटेड, किर्ती सॉल्व्हेक्स लिमिटेड आणि किर्ती दालमिल्स लिमिटेड असा हा उद्योगसमूह फोफावत आला आहे.

संपूर्ण देशात गेल्या काही वर्षांत दररोज सोयाबिनचे भाव ठरवताना लातूरचे भाव काय आहेत यावर देशातील अन्य बाजारपेठेतील सोयाबिनचे भाव ठरतात. शेतमालाच्या किंमत निर्धारणात लातूरला नावारूपाला आणण्यासह उद्योगाच्या क्षेत्रात देशपातळीवर नेण्यात किर्ती उद्योग समूहाचे योगदान असामान्य आहे. ‘मुंगी उडाली आकाशी’ याची प्रचीती या उद्योगाच्या वाटचालीकडे पाहिल्यानंतर येते. काळानुरूप बदल करत ही गरुडझेप निश्चितच नवतरुणांसाठी प्रेरणादायी आहे.

विष्णुदास भुतडा, अशोक भुतडा

किर्ती ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज

’ व्यवसाय -खाद्यतेल, डाळीचे उत्पादन

’ कार्यान्वयन : सन १९७०

’ मूळ गुंतवणूक  :  साधारण एक लाख रुपये

’ सध्याची उलाढाल : सुमारे ५,००० कोटी रुपये

’ कर्मचारी संख्या  :  दोन हजारांपेक्षा अधिक

’ डिजिटल अस्तित्व : www.kirtigroup.co.in

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 13, 2020 1:02 am

Web Title: marathi entrepreneur information marathi businessman successful marathi entrepreneur zws 70
Next Stories
1 माझा पोर्टफोलियो : टाळेबंदीचा अत्यल्प तडाखा बसलेले क्षेत्र
2 कर नियोजनाचे पंचक 
3 बाजाराचा तंत्र कल : अखेर तेजी क्षणीकच ठरली!
Just Now!
X