16 January 2019

News Flash

म्युच्युअल फंडातील योजनांची नवीन वर्गवारी

इतर विभाग ज्यात वर्गीकरणाची गुंतवणूकदारांना खूप मदत होते ते आहेत हायब्रिड फंड्स.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

|| भालचंद्र जोशी

भारतीय रोखे आणि विनिमय महामंडळ अर्थात सेबीने अनुक्रमे ६ ऑक्टोबर २०१७ आणि ४ डिसेंबर २०१७ च्या परिपत्रक क्रमांक –  SEBI/HO/IMD/ DF3/ CIR/P/2017/114 AFd¯F SEBI/ HO/IMD/DF3/CIR/P/2017/126 अन्वये म्युच्युअल फंड कंपन्यांना त्यांच्या योजनांची स्पष्ट गटांमध्ये वर्गवारी करण्यास सांगितले आहे. म्युच्युअल फंड योजनांबाबत सुबोधता, एकसमानता, सुसूत्रता आणि प्रमाणबद्धता आणून गुंतवणूकदारांना विविध योजनांची योग्य तुलना करता यावी आणि त्यांची योजनांची निवड तर्कसंगत व्हावी, असा या परिपत्रकांमागचा उद्देश आहे. अधिक स्पष्टता येण्यासाठी सेबीने म्युच्युअल फंडांना प्रत्येक गटात फक्त एक योजना ठेवण्यास सांगितले आहे. याला अपवाद मात्र इंडेक्स फंड / ईटीएफ विविध निर्देशांकांचे प्रतिकृतीकरण / ट्रॅकिंग, फंड ऑफ फंड्स आणि सेक्टोरल / थीमॅटिक फंड यांचा असेल. ज्यांच्यापाशी एका गटात अनेक योजना आहेत अशा म्युच्युअल फंडांनी त्यांच्या योजना विलीन केल्या आहेत किंवा त्यांचे मूलभूत स्वरूप बदलले आहे.

आता म्युच्युअल फंडांचे इक्विटी, डेट, हायब्रिड, सोल्यूशन-ओरिएन्टेड आणि ‘इतर’ असे ठोस स्वरूपात वर्गीकरण करण्यात आले आहे. इक्विटी योजनांमध्ये मल्टी कॅप, लार्ज कॅप, मिड कॅप, लार्ज आणि मिड कॅप, आणि स्मॉल कॅप आणि इतर यासह १० उप गट असतील. बाजार मूल्यानुसार १०० श्रेष्ठ कंपन्यांचे समभाग हे लार्ज कॅप म्हणून वर्गिकृत असतील. १०१ ते २५० या क्रमवारीतील समभागांचे मिड कॅप असे वर्गीकरण करण्यात येईल आणि बाजार मूल्यानुसार २५० पेक्षा वरच्या क्रमवारीतील समभागांचे स्मॉल कॅप असे वर्गीकरण करण्यात येईल. डेट आणि हायब्रिड योजनांचे अशाच प्रकारे १६ आणि सहा उपगटांमध्ये अनुक्रमे वर्गीकरण करण्यात येईल.

खास करून डेट आणि हायब्रिडमध्ये स्वारस्य असलेल्या व्यक्ती आता योग्य योजना अधिक सहजपणे निश्चित करू शकतील. उदाहरणार्थ, गुंतविलेल्या इन्स्ट्रुमेन्ट्सच्या परिपक्वतेच्या स्वरूपानुसार कालावधी फंडांचे उपगटांमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. विस्तारित मिळकत फंडांचे डेट फंड्स आता त्यांच्या खास वैशिष्टय़ांनुसार डायनॅमिक बाँड फंड्स, क्रेडिट रिस्क फंड, कॉर्पोरेट बाँड फंड, बँकिंग आणि पीएसयू फंड अशी ओळख असेल. त्याचप्रमाणे हायब्रिड फंडांचे त्यांच्या इक्विटी गुंतवणुकीनुसार आक्रमक हायब्रिड, बचावात्मक हायब्रिड अशी ओळख असेल. त्यामुळे गुंतवणूकदारांना कोणत्या हायब्रिड फंडात गुंतवणूक करायची हे निश्चित करता येईल.

इतर विभाग ज्यात वर्गीकरणाची गुंतवणूकदारांना खूप मदत होते ते आहेत हायब्रिड फंड्स. हे इक्विटी आणि डेटचे खास तयार करण्यात आलेले मिश्रण आहे आणि गुंतवणूकदार त्यांच्या गरजेनुसार असलेल्या मालमत्ता विभाजनात गुंतवणूक करण्यासाठी त्याचा उपयोग करतात.

परंतु, या गटाची जोखीम, परतावा आणि कामगिरी ते इक्विटी आणि डेटमध्ये करत असलेल्या गुंतवणुकीच्या बदलत्या प्रमाणानुसार बदलतात. योजनांच्या खास वर्गीकरणामुळे देखील त्याच गटातील फंडांबरोबर तुलना करणे शक्य होईल. पूर्वीच्या लार्ज कॅप फंडांच्या गटात खास लार्ज कॅपवर आधारित योजना होत्या, त्याचबरोबर चांगल्या प्रमाणात मिड कॅप एक्स्पोजर देखील होते, तर आता मोठय़ा प्रमाणात फरक असलेल्या योजना एकत्र केल्या जाणार नाहीत. यामुळे गुंतवणूकदारांना समान फंडांच्या तुलनेद्वारे योग्य योजनेची निवड करणे शक्य होणार आहे.

(लेखक गेली २७ वर्षे बँकिंग आणि आर्थिक सेवा क्षेत्रात कार्यरत असून, सध्या रिलायन्स म्युच्युअल फंडात गुंतवणूकदार सेवा आणि ऑपरेशन्स विभागाचे प्रमुख आहेत.)

First Published on May 21, 2018 12:05 am

Web Title: mutual fund investment 5