भालचंद्र जोशी bhalchandra.joshi@whiteoakindia.com

गुंतवणूक म्हणजे फक्त स्टेटमेंट आणि रिटर्न नव्हे. आपल्या कुटुंबाच्या वैद्यकीय सल्लागारासारखे आर्थिक सल्लागाराशी असलेले नाते गुंतवणुकीच्या पलीकडले असायला हवे.

या लेखमालेच्या मागील भागांना वाचकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. चांगला ‘एमएफडी’ (म्युच्युअल फंड वितरक) किंवा ‘आरआयए’ (‘सेबी’कडे नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार) कसा ओळखावा याची चर्चा मागील लेखांमधून आपण केली. या नंतर चांगल्या ‘एमएफडी’ किंवा ‘आरआयए’ची ओळख आपण या लेखात अधिक दृढ करून घेणार आहोत. पारदर्शकता, गणिती कौशल्य, विश्लेषणात्मक कौशल्य हे गुण आपल्या आर्थिक नियोजनकाराकडे असणे गरजेचे असते हे आपण मागील भागांत पाहिले.

गरज असेल तेव्हा ‘एमएफडी’ किंवा ‘आरआयए’ यांची उपलब्धता हा एक महत्त्वाचा गुण आहे. ग्राहकांना जोखीम आणि परतावा यांच्यात समतोल साधायला ‘एमएफडी’ किंवा ‘आरआयए’ मदत करतात. आर्थिक नियोजनकार आपल्या गुंतवणूकदारांमध्ये त्यांची शैक्षणिक पात्रता, बुद्धिमत्ता, समाजातील प्रतिष्ठा, आर्थिक स्तर या बाबींवर भेद न करता शक्य असेल तेव्हा चर्चेसाठी उपलब्ध असायला हवा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी की आपले ज्या व्यक्तीशी व्यावसायिक संबंध आहेत, ज्याने आपला आर्थिक वारसा व त्याच्या भविष्याचे रक्षण करण्याची जबाबदारी सोपविली आहे त्याच्या हितसंबंधांना सर्वोच्च प्राधान्य देणारा असायला हवा. सर्वच फोन कॉल घेणे ‘एमएफडी’ किंवा ‘आरआयए’ला त्याच वेळी शक्य नसेल. परंतु जेव्हा तो कामातून मोकळा होईल तेव्हा त्याने तुमच्या फोनला प्रतिसाद द्यायला हवा. एखाद्या सल्लागारावर आर्थिक निर्णय घेण्याचे काम तुम्ही सोपवता तेव्हा ज्या निर्णयात तुमचे हित आहे असा निर्णय तो घेणारा हवा. आर्थिक नियोजनकार संपर्क करण्यासाठी उपलब्ध असणे आणि त्याने त्वरित फोन कॉल परत करणे हा एक महत्त्वाचा गुण आहे.

गुणी ‘एमएफडी’ किंवा ‘आरआयए’कडे व्यावसायिक नीतिमत्ता, आदर्शाचे पालन (प्रदर्शन नव्हे) हे गुण असायला हवेत. अमेरिकेत केलेल्या एका सर्वेक्षणात, ३९ टक्के गुंतवणूकदारांची पसंती गुंतवणूकदारांच्या हितासाठी स्वत:च्या व्यावसायिक नफ्याला प्राधान्य न देणाऱ्या ‘एमएफडी’ किंवा ‘आरआयए’ला होती. ‘एमएफडी’ किंवा ‘आरआयए’च्या निवडीत हा एक महत्त्वाचा निर्धारक घटक होता. वित्तीय सेवा क्षेत्रात याला विश्वासार्हता मानक (फिडिश्युअरी स्टँडर्ड्स) असे म्हणतात. कुठल्याही आर्थिक उद्योगाचा पाया हा याच विश्वासार्हतेवर अवलंबून असतो. नैतिकता म्हणजे सल्लागाराने एखादे उत्पादन खरेदी करण्यापूर्वी गुंतवणुकीतील धोके काळजीपूर्वक समजावून सांगायला हवेत. सर्वसाधारणपणे गुंतवणूकदार मागील परतावा पाहून म्युच्युअल फंडांच्या युनिट्सची खरेदी करायला येतात. उदाहरणार्थ गुंतवणूकदार ज्येष्ठ नागरिक असेल आणि तो स्मॉल कॅप फंडासाठी आग्रही असेल तर स्मॉलकॅप गुंतवणुकीतील धोके सल्लागाराने स्पष्टपणे समजावून सांगितले पाहिजेत. बँकेत मुदत ठेव करायला गेलेल्या ज्येष्ठ नागरिकाला रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडाऐवजी स्मॉलकॅप फंड विकणारे अनेक जण आजूबाजूला सहज दृष्टीस पडतात. निर्णय चुकल्यास परिणाम गंभीर असणाऱ्या गुंतवणुकीबद्दलचे व्यावसायिक निर्णय घेताना ग्राहकांवर कधीही दबाव आणू नये. सखोल विश्लेषण करून अंतिम निर्णय ग्राहकावर सोडून द्यावा.

भारतात अनेक एक खांबी तंबू असलेले वितरक आढळून येतात. एखाद्या सल्लागारास आपल्या ग्राहकांच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी तज्ज्ञांची आवश्यकता भासते. एक खांबी तंबू म्हणजे विविध सेवा देणारा एकच सल्लागार किंवा गरज पडल्यास वेगवेगळ्या विषयातील तज्ज्ञांची मदत घेणारा सल्लागार (सेवानिवृत्ती नियोजनकार, वारसा व्यवस्थापक, विमा तज्ज्ञ, म्युच्युअल फंड संशोधन करणारे इत्यादी) आपली नियोजित आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी यापैकी तुम्हाला कोणाची आवश्यकता आहे याचे उत्तर हे तुम्हीच देऊ शकाल.

तुमचा फंड वितरक हा व्यावसायिक आहे की हौशी हेसुद्धा लक्षात घेतले पाहिजे. बँकेतून, मालमत्ता कंपन्यांतून (एएमसी) निवृत्त झालेले जोडधंदा म्हणून फंड वितरक झाल्याचे दिसून येते. अशा हौशी वितरकांपेक्षा माझी पसंती नेहमीच व्यावसायिक सल्लागाराला असेल. एक उत्तम व्यावसायिक आर्थिक सल्लागार कायम तुमच्याबरोबर असेल, तुमच्या जीवनातील महत्त्वपूर्ण प्रसंगी आणि वर्षभर नियमित भेटेल. वर्षांमागून वर्षे हे नाते अधिक सुदृढ होत जाते. बऱ्याच वेळा, लोक सल्लागारास भेटतात, एखादी योजना विकसित करतात आणि नंतर फक्त ई-मेलमध्ये स्टेटमेन्ट मिळवतात. गुंतवणूक म्हणजे फक्त स्टेटमेंट आणि रिटर्न नव्हे. आपल्या कुटुंबाच्या वैद्यकीय सल्लागारासारखे आर्थिक सल्लागाराशी असलेले नाते गुंतवणुकीच्या पलीकडले असायला हवे.

सल्ल्यासाठी शुल्क देणे हे बदलत्या जगात अंगवळणी पडायला हवे. गुंतवणूकदारांना हे मी सांगू इच्छितो की अमेरिकेसारख्या देशात अर्थसाक्षरतेचा दर्जा भारतापेक्षा वरचा आहे त्या देशातील गुंतवणूकदारही आर्थिक नियोजन हे सल्लागाराच्या मदतीने करतात. एक चांगला आर्थिक सल्लागार शोधणे आपल्याला आपल्या वित्तीय लक्ष्यांवर लक्ष केंद्रित करण्यास पुरेसे आहे.

व्हॅनगार्ड, ही जगातील सर्वात मोठी वित्तीय सेवा व्यवसायात असलेली कंपनी आहे. ही संस्था गुंतवणूकविषयक सर्वेक्षण, टिपण यासारख्या माध्यमातून गुंतवणूकदारांना चार हिताच्या गोष्टी सांगत असते. अशाच एका तिने २०१९ मध्ये प्रसिद्ध केलेल्या टिपणात म्हटले आहे की, तज्ज्ञांच्या सल्ल्याचे मोल हे त्यांना आपण देत असलेल्या शुल्कापेक्षा कितीतरी अधिक आहे. या संकल्पनेला त्यांनी ‘अ‍ॅडव्हायजर्स अल्फा’ ( निर्देशांकापेक्षा अधिक परतावा) असे नाव दिले आहे. अमेरिकेसारख्या देशात केवळ योग्य सल्लागारांच्या मदतीने तुम्ही वार्षिक तीन टक्के अधिक परतावा (अल्फा) मिळवू शकता. व्हॅनगार्डने या टिपणात पुढे म्हटले आहे, की दरवर्षी ही वाढ तुम्हाला दिसणार नाही. तसेच, मालमत्ता किती उत्तम प्रकारे व्यवस्थापित केली जाते यावरही हा दर अवलंबून आहे.

रसेल इन्व्हेस्टमेंट ही अमेरिकेतील दुसरी मोठी गुंतवणूकविषयक संधोधन पेढी. पैशांचे व्यवस्थापन करताना व्हॅनगार्डच्या मूलभूत भूमिकेशी तिने सहमती दर्शविली आहे. रसेल म्हणतात की, एक चांगल्या सल्लागाराचा परतावा हा १५ ते २० वर्षांतील सल्लागाराशिवायच्या परताव्याच्या साधारण दुप्पट असेल. अमेरिकेच्या (जी बाजारपेठ परिपक्व झाली आहे) बाजारपेठेने मार्गदर्शकाची आवश्यकता विशद केली असेल तर भारताच्या (जी बाजारपेठ परिपक्व होण्यास अद्याप बराच अवधी आहे.) बाजारपेठेत सल्लागाराची गरज निश्चितच आहे. दासबोधात समर्थ म्हणतात, ‘‘मुळीं देह त्रिगुणाचा। सत्वरजतमाचा।।’. तमोगुण म्हणजे मत्सर, दुष्टपणा, आळस, कपट, त्याच त्याच चुका पुन्हा पुन्हा करणे. म्हणूनच एका भारूडात एकनाथ महाराज म्हणतात, या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा. आजच्या विषयाच्या अनुषंगाने सांगायचे तर स्वत:ची गुंतवणूक स्वत:च व्यवस्थापित करण्याचा हेकेखोरपणा सोडायला हवा. मथितार्थ आणि विनंती एवढीच की, ‘आरआयए’ की ‘एमएफडी’ यापैकी एकाची निवड एकदाच सारासार विचार करून करायला हवी. आर्थिक नियोजन या विषयाचे उत्तम ज्ञान असल्याशिवाय स्वत:ची गुंतवणूक स्वत: व्यवस्थापित करू नका. नाही तर या हेकेखोरपणाची खूप मोठी किंमत द्यावी लागू शकेल. बाकी आपण सगळे सुज्ञ आहातच. तुम्ही योग्य निर्णय घ्याल याची खात्री आहे.

तळटीप : म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजार जोखमींच्या अधीन असते. गुंतवणूक करण्यापूर्वी फंडाचे माहितीपत्रक कृपया सखोल अभ्यासा.

लेखक व्हाइट ओक कॅपिटल  मॅनेजमेंटचे कार्यकारी संचालक आणि मुख्य परिचालन अधिकारी