यूटीआय एमएनसी फंड

वसंत माधव कुळकर्णी

बाजार निर्देशांक अधिकाधिक धोकादायक मूल्यांकनावर असताना धोपट मार्गी गुंतवणूक करण्यापेक्षा ‘कोअर अ‍ॅण्ड सॅटेलाइट’ रणनीती वापरल्यास भविष्यात उद्भवणाऱ्या अस्थिरतेला यशस्वीरीत्या तोंड देता येईल. या प्रकारच्या रणनीतीत चपखल बसणाऱ्या फंडांचा वाचकांना शिफारस करण्यासाठी शोध घेतला असता निश्चित निकषांवर जे फंड गवसले त्या चार फंडांचा परिचय वाचकांना करून देण्याच्या मालिकेतील यूटीआय एमएनसी फंड हा एक फंड आहे.

या फंडाबाबत अधिक माहिती घेण्यापूर्वी काही गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे. ‘रिस्क-रिवॉर्ड’ तुलनेसाठी एक निर्देशांक निश्चित करणे आवश्यक असते. या फंडाच्या तुलनेसाठी ‘निफ्टी एमएनसी इंडेक्स’  हा निर्देशांक निश्चित केला. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की, या फंड गटात केवळ चार फंड घराण्यांचे फंड असून यापैकी एक फंड मागील वर्षी आलेला आहे. कोणत्याही संशोधनासाठी मोठय़ा संख्येने आधार बिंदू (डेटा पॉइंट्स) उपलब्ध असणे गरजेचे असते. या फंड गटात केवळ चार फंड असल्याने आंतरफंड तुलनेसाठी उपलब्ध आधार बिंदू मर्यादित संख्येने उपलब्ध असणे ही या शोधकार्यातील महत्त्वाची मर्यादा. तरीही बहुराष्ट्रीय (एमएनसी) कंपन्या व्यवसाय केंद्रित असल्याने त्यांचे ताळेबंद समभाग गुंतवणुकीस आदर्श समजले जातात. ताळेबंदात कर्जाचे अल्प किंवा शून्य प्रमाण असल्याने भांडवलावरील परताव्याचा दर (आरओसी) आकर्षक असतो. दीर्घ मुदतीची गुंतवणूक केल्यास या कंपन्यांनी नेहमीच भरघोस नफा गुंतवणूकदारांच्या पदरात घातला आहे.

‘थीमॅटिक फंडा’त गुंतवणूक योग्य वेळी केली आणि योग्य वेळी बाहेर पडण्यावर संधीचे सोने किंवा माती होणे निर्भर करते. थीमॅटिक फंड अल्प कालावधीसाठीच स्थूल बाजारापेक्षा अधिक परतावा देतात. त्यामुळे थीमॅटिक फंड एकूण गुंतवणुकीत ‘सॅटेलाइट’ प्रकारच्या पोर्टफोलिओचा भाग असावा. एमएनसी फंड बाजार घसरणीत अन्य फंडांच्या तुलनेत कमी नुकसान पोहचवितात. म्हणून कडय़ाच्या टोकावर उभ्या असलेल्या बाजारात गुंतवणुकीसाठी यापेक्षा अधिक चांगला फंड खचितच गवसला असता. फक्त ‘एमएनसी’त (बहुराष्ट्रीय कंपन्या) गुंतवणूक करणारा हा फंड प्रकार आहे. बहुतांश एमएनसी कंपन्या या व्यवसाय केंद्रित असतात. त्यांच्यावर कर्जभार अतिशय कमी असतो. उदाहरणार्थ, एमएनसी निर्देशांकात असलेल्या कंपन्यांच्या स्वनिधीचे कर्जाशी (डेट-इक्विटी) प्रमाण फक्त ०.११ आहे. या निर्देशांकातील कंपन्यांच्या भाग भांडवलावरील सरासरी परतावा (आरओई) २३ टक्के आहे. एमएनसी कंपन्या भरघोस लाभांश वाटप करणाऱ्या असून मागील पाच वर्षांत सरासरी किमान ४० टक्के लाभांश वाटप या कंपन्यांनी केले आहे. एप्रिल २००५ ते जुलै २०२० या कालावधीत ‘निफ्टी एमएनसी इंडेक्स’चा तीन वर्षांचा चलत परतावा १८.५ टक्के आहे. याचा कालावधीत ‘निफ्टी ५०’चा तीन वर्षांचा चलत परतावा १०.५ टक्के आहे.

थीमॅटिक फंड प्रकारात ‘एमएनसी’ या ‘थीम’अंतर्गत गुंतवणूकदारांना चार पर्याय उपलब्ध असले तरी एसबीआय मॅग्नम ग्लोबल या फंडाचे वर्गीकरण २०१८ नंतर या फंड गटात झाले. आयसीआयसीआय प्रु. एमएनसी फंडाला १५ महिनेच पूर्ण झाले आहेत. आदित्य बिर्ला सनलाईफ एमएनसी फंड आणि यूटीआय एमएनसी फंड या दोनही फंडांना पुरेसा इतिहास असल्याने गुंतवणूकदारांनी आपल्या सल्लागाराच्या मदतीने फंड निवड करावी.

यूटीआय फंड घराण्याच्या सर्वाधिक अनुभवी निधी व्यवस्थापिका स्वाती कुलकर्णी या फंडाचा २००४ पासून निधी व्यवस्थापित करतात. फंडाची मालमत्ता उपलब्ध ताज्या आकडेवारीप्रमाणे २,१३७ कोटी रुपये आहे. फंडाचा सध्याचा पोर्टफोलिओ ग्राहक उत्पादने औषध निर्मिती, माहिती तंत्रज्ञान यासारख्या संरक्षणात्मक आणि उद्योग चाकाशी निगडित अभियांत्रिकी आणि औद्योगिक उत्पादने अशा दोन्ही प्रकारांचा समतोल साधणारा आहे. फंड ‘बाय अ‍ॅण्ड होल्ड’ रणनीती अवलंबणारा असून समभाग मंथन (पोर्टफोलिओ टर्नओव्हर) मागील दहा वर्षांत १४ ते १७ टक्कय़ांदरम्यान राहिले आहे. निधी व्यवस्थापिका क्वचितच एखाद्या कंपनीतून बाहेर पडल्याचे दिसते. बहुतांश विक्री ही मागील १६ वर्षांत गुंतवणुकीचे संतुलन साधण्यासाठी किंवा नफावसुलीसाठी केली आहे. अपवाद म्हणून या वर्षांत एचयूएल आणि कोलगेट पामोलिव्हचे प्रमाण कमी केले, तर ब्लू डार्ट एक्स्प्रेस आणि अशोक लेलँड (०.१४ टक्के) मधून पूर्णपणे बाहेर पडल्या. युनायटेड स्पिरिट्समध्ये घसरण होण्यापूर्वी योग्य वेळी नफावसुली केली. तर अ‍ॅबट इंडिया (सध्याचे प्रमाण २.३७ टक्के) समभागाची ४००० रुपयांपासून खरेदी (सद्य भाव १७,००० रुपयांच्या आसपास) आणि नेस्ले इंडिया आणि अंबुजा सिमेंट्सची गुंतवणुकीतील मात्रा वाढवली.

फंडाच्या गुंतवणुकीचा ढाचा लार्ज कॅप किंवा मिड कॅप फंडाच्या ढाच्यापेक्षा खूपच वेगळा आहे. फंडाच्या गुंतवणुकीत वित्तपुरवठा आणि वित्तीय सेवा कंपन्या नाहीत. अन्य फंड प्रकारात (अगदी कंझम्शन, इन्फ्रास्ट्रक्चरसुद्धा) सर्वाधिक गुंतवणूक बँका आणि वित्तीय सेवा क्षेत्राशी निगडित कंपन्यांत असते. एम्फॅसिस (४.८७ टक्के), हनीवेल ऑटोमेशन (४.३९ टक्के) सारख्या मजबूत ताळेबंद असलेल्या कंपन्यांचा गुंतवणुकीतील मोठा वाटा दुसऱ्या कोणत्याही फंड प्रकारात असत नाही. फंडाच्या गुंतवणुकीत ६८.८६ टक्के लार्ज कॅप, २६.५२ टक्के मिड कॅप २.५६ टक्के स्मॉल कॅप गटातील समभाग आहेत.

फंडाची कामगिरी १९९८ ते २०१३ आणि २०१३ ते आजपर्यंत अशा दोन कालावधीत तपासायला हवी. एमएनसी निर्देशांकाची २०१३ मध्ये पुनर्रचना झाली. या पुनर्रचनेत ‘एफएमसीजी’ कंपन्यांचा प्रभाव ३० टक्कय़ांपेक्षा अधिक वाढल्याने फंडाच्या गुंतवणुकीत एचयूएल (८.०६ टक्के), ब्रिटानिया (७.९ टक्के), नेस्ले (७.२३ टक्के) जीएसके कंझ्युमर आणि युनायटेड स्पिरिट्स (३.६९ टक्के) या सारख्या उपभोग क्षेत्रातील कंपन्याचा गुंतवणुकीतील वाटा वाढला. या निर्देशांकाची पुन्हा २०१८ मध्ये पुनर्चना झाल्याने मारुती सुझुकी (७.०२ टक्के) या सारख्या प्रवासी वाहन उद्योगात मोठा संख्यात्मक वाटा असलेल्या कंपनीचा गुंतवणुकीत समावेश झाल्याचा फायदा फंड कामगिरीला झाला.

या फंडाची शिफारस ६ जुलै २०१५ रोजी केली होती. त्यानंतर फंडाने दोन वर्षांत गुंतवणूकदारांना भरघोस परतावा दिला होता. या फंडगटात जोखीमसापेक्ष एकूण गुंतवणुकीच्या १० ते २० टक्कय़ांपर्यंत गुंतवणूक राखण्याची शिफारस असून आणि गुंतवणुकीनंतर फंड कामगिरीचा आढावा किमान वर्षांतून एकदा घेणे आवश्यक आहे.

स्वाती कुलकर्णी निधी व्यवस्थापिका

shreeyachebaba@gmail.com

म्युच्युअल फंड गुंतवणुकीसंबंधित माहिती देणारे साप्ताहिक सदर