|| भालचंद्र जोशी

तुमच्या कष्टाने कमावलेल्या पैशाचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा तुम्हाला जाहिरातदाराने दाखविल्याप्रमाणे आर्थिक उत्पादने आणि सेवा मिळाव्यात अशी अपेक्षा असते. उदाहरणार्थ, तुम्ही तुमचे पैसे बँकेत ठेवलेत तर ते सुरक्षित असतील आणि त्यावर ठरल्याप्रमाणे व्याज मिळावे अशी तुम्हाला अपेक्षा असते. त्याचप्रमाणे, तुम्ही जेव्हा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता तेव्हा जाहिरात केली आहे त्याप्रमाणे ती योजना असेल अशी तुमची अपेक्षा असते. उदाहरणार्थ, समजा एखाद्या योजनेचे ‘रिस्कोमीटर’ माफक जोखीम दर्शवित असेल, तर याचा अर्थ, त्या लेबलशी सचोटीने वागून तो फंड प्रकाशित केलेल्या माहितीनुसार बंधने पाळेल आणि अशा प्रकारे गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ तयार करण्याचा प्रयत्न करेल, ज्यामध्ये माफक प्रमाणात जोखीम असेल. त्यामुळे त्या योजनेत गुंतवणूक  करणाऱ्या गुंतवणूकदाराला त्याला दर्शविल्याप्रमाणे जोखमेला सामोरे जावे लागेल. अशा प्रकारे, जर एखाद्या फंडाने गुंतवणूकदारांना दर्शविल्याप्रमाणे लेबलनुसार वर्तन ठेवले तर तो फंड आपल्या गुंतवणुकीच्या उद्दिष्टांशी प्रामाणिक आहे असे आपण समजू शकता.

रंगांच्या कोडचा वापर करून जोखमीचे स्वरूप स्पष्ट करण्याऐवजी आता ‘रिस्कोमीटर’ नावाच्या मीटरच्या चित्राने सामान्य गुंतवणूकदाराला समजू शकेल अशा प्रकारच्या चित्राने काही दिवसांपूर्वी त्याची जागा घेतली आहे. चित्राच्या मदतीने अगदी योग्य प्रकारे ठरावीक योजनेतील जोखमीचे प्रमाण दर्शविले जाते. उदाहरणार्थ, गुंतवणूकदारांना त्यांच्या मुद्दलाला किती जोखीम आहे हे खालील चित्राप्रमाणे दर्शविले जाईल- कमी (लो), माफक प्रमाणात कमी (मॉडरेटली लो), माफक(मॉडरेट), माफक प्रमाणात अधिक (मॉडरेटली हाय) आणि उच्च (हाय).

त्याशिवाय, ही सर्व माहिती प्राथमिक अर्जाच्या- की इन्फर्मेशन मेमोरॅण्डमच्या (कीम), योजनेच्या माहितीचे दस्तऐवज (एसआय्डीज्) आणि सामाईक अर्ज (कॉमन अ‍ॅप्लिकेशन फॉर्म) यांच्या पहिल्या पानात समाविष्ट असावी.

गुंतवणूकदार या नात्याने तुम्ही निवडलेल्या योजनेची मलमत्ता विभाजन पद्धती आणि जोखमीचे स्वरूप समजून घेऊन तुम्हाला त्या योजनेच्या संभाव्य कामगिरीचा अंदाज बांधता. यानुसार, तुमच्या पोर्टफोलिओत या योजनेला प्राधान्य द्यावे की नाही हे तुम्ही निश्चित करता.

गुंतवणूकदाराच्या हितासाठी, फंड मॅनेजरने अल्पकालावधीत बाजारपेठेची स्थिती कशीही असली तरीसुद्धा त्याने उघड केल्याप्रमाणे मत्ता विभाजन कायम ठेवणे आवश्यक आहे. अशा प्रकारे, गुंतवणूकदाराने पोर्टफोलिओत त्याने गुंतवणूक केलेल्या जोखमेनुसार आणि त्याच्या गुंतवणुकीचे दीर्घकालीन उद्दिष्ट साध्य करता येईल.

प्रत्येक योजनेने आपले मत्ता विभाजन पद्धती पारदर्शक पद्धतीने नियमितपणे प्रसिद्ध करणे अत्यावश्यक आहे. ही केवळ नियामक आवश्यकता नाही तर एखाद्या लेबलनुसार प्रामाणिकपणे वागणाऱ्या म्युच्युअल फंड योजनेचे ते प्रमुख वैशिष्टय़ आहे. पोर्टफोलिओ मत्ता विभाजनाची माहिती सहज उपलब्ध करून देऊन गुंतवणूकदारांना पुरेशी माहिती उपलब्ध करून दिली पाहिजे. त्यामुळे त्यांना कोणत्या प्रकारच्या जोखीम/मोबदला पद्धतीला सामोरे जावे लागत आहे ते समजेल. पारदर्शकता ठेवणे हे म्युच्युअल फंडांना विश्वासार्हतेसाठी आवश्यक असते तर फंड हाऊसेसने सादर केलेले प्रगटीकरण आणि पत्रव्यवहारांवर नियमित लक्ष ठेवून माहिती करून घेणे ही गुंतवणूकदाराची देखील जबाबदारी आहे. म्हणूनच गुंतवणूकदाराने म्युच्युअल फंड जाहिरात केल्याप्रमाणे किंवा गुंतवणूकदारांना कळविल्याप्रमाणे अगदी तंतोतंत त्याच पद्धतीने गुंतवणुकीच्या पद्धतीचा निधी व्यवस्थापक पाठपुरावा करीत आहेत ना याची पडताळणी करून लेबलनुसार प्रामाणिक असलेल्या योजनांची निवड करावी. तसेच निवडलेला फंड हा योजनेत सूचित गुंतवणुकीचे उद्दिष्ट, तत्त्व, व्यूहात्मक  धोरणांनुसार गुंतवणूक ठेवतो हेही पाहायला हवे.

‘रिस्कोमीटर’चा वापर करून गुंतवणूकदार आर्थिक उद्दिष्टानुसार योग्य ती जोखीम घेऊन गुंतवणूक करू शकतात आणि त्यामुळे म्युच्युअल फंडांची विश्वासार्हता वाढली आहे. जे गुंतवणुकदारासाठी खूप फायदेशीर आहे.

(लेखक गेली २७ वर्षे बँकिंग आणि आर्थिक सेवा क्षेत्रात कार्यरत असून, सध्या रिलायन्स म्युच्युअल फंडात गुंतवणूकदार सेवा आणि ऑपरेशन्स विभागाचे प्रमुख आहेत.)

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.