वसंत माधव कुळकर्णी

अस्थिरता आणि परतावा यांचा समतोल साधणारा फंड गुंतवणुकीसाठी सर्वात सुयोग्य. मात्र अनेकदा होते याच्या विपरितच. आकडय़ात अधिक परतावा दिलेला फंड कमालीचा अस्थिर असतो..

सर्वसाधारणपणे गुंतवणूकदार त्यांची गुंतवणूक असणाऱ्या फंडात समाधानकारक परतावा न मिळाल्यास कारणांची मीमांसा करतात. ही मीमांसा करताना बहुतेक वेळा दुसऱ्या फंडाशी तुलना करतात. सक्रिय गुंतवणूक व्यवस्थापन असणाऱ्या फंडांतील गुंतवणुकीतून भांडवली लाभ मुख्यत्वे समभागांची निवड, गुंतवणुकीतील वैविध्य, गुंतवणुकीचे संतुलन यांच्या जोडीला गुंतवणुकीचे जोखीम व्यवस्थापन वगैरेतून गुंतवणूकदाराला मिळत असतो. जोखीम व्यवस्थापनात अर्थव्यवस्थेतील अंत:प्रवाहांचा विचार आणि उपलब्ध आधारबिंदूंचा वापर करून निर्देशांकसापेक्ष एखाद्या उद्योग क्षेत्रात कमीअधिक गुंतवणूक करणाऱ्या कौशल्यावर निधी व्यवस्थापकाचे यशापयश ठरत असते. हे यशापायश सांख्यिकीय दृष्टीने निश्चित करण्यासाठी ‘मॉडर्न पोर्टफोलिओ थिअरी’ने अल्फा, बीटा, स्टँडर्ड डिव्हिएशन (प्रमाणित विचलन), आर-स्क्वेअर आणि शार्प रेशो हे सांख्यिकीय संकेत निश्चित केले आहेत. यापैकी अल्फा हे निर्देशांकसापेक्ष मिळालेला परतावा, बीटा हे निर्देशांक आणि पोर्टफोलिओ यांच्यातील सहसंबंध, स्टँडर्ड डिव्हिएशन, आर-स्क्वेअर आणि शार्प रेशो हे जोखीम मोजणारे संकेत आहेत.

सर्वोत्तम जोखीम व्यवस्थापन करणाऱ्या चार निधी व्यवस्थापकांच्या मालिकेतील दुसरे मानकरी निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंडाचे निधी व्यवस्थापक शैलेश राज भान हे आहेत. ते जोखीम व्यवस्थापनातील चाणक्य अशा दृष्टीने की, कोणती जोखीम टाळणे हे गुंतवणूकदारांच्या हिताचे आहे हे त्यांना उत्तम कळते. निप्पॉन इंडिया लार्जकॅप, निप्पॉन इंडिया मल्टिकॅप निप्पॉन इंडिया फार्मा आणि निप्पॉन इंडिया कंझम्प्शन या चार फंडांचे ते निधी व्यवस्थापक आहेत. चार वेगवेगळी गुंतवणूक उद्दिष्टे असलेल्या फंडांच्या गुंतवणुकीचा परीघसुद्धा भिन्न, निप्पॉन इंडिया लार्जकॅपसाठी भांडवली मूल्यानुसार पहिल्या शंभर कंपन्या, मल्टिकॅपचा परीघ लार्जकॅप मिडकॅप आणि स्मॉलकॅपला कवेत घेणाऱ्या ५०० कंपन्यांचा, निप्पॉन इंडिया फार्मा आणि निप्पॉन इंडिया कंझम्प्शन फंडांचा परीघ त्या उद्योग क्षेत्रातील अंदाजे ५० कंपन्यांपुरता. एकापेक्षा अधिक फंडांचे व्यवस्थापन करीत असताना निधी व्यवस्थापक अनेकदा एका किंवा अनेक कंपन्यांच्या प्रेमात असलेले दिसतात. दोन किंवा अधिक फंडांच्या गुंतवणुकीत असलेल्या समान कंपन्यांना ‘स्टॉक इंटरसेक्शन’ किंवा ‘पोर्टफोलिओ ओव्हरलॅप’ म्हणून ओळखल्या जातात. एखादा गुंतवणूकदार अनेक फंडांत गुंतवणूक करीत असलेल्या ‘पोर्टफोलिओ ओव्हरलॅप’ घटक महत्त्वाचा असतो. ‘पोर्टफोलिओ ओव्हरलॅप’ जितका अधिक तितकी जोखीम अधिक. साहजिकच गुंतवणुकीतील वैविध्य कमी आणि समभागांचे ध्रुवीकरण जास्त. यासाठी अतिरिक्त ध्रुवीकरण असलेले फंड टाळायला हवेत. साधारण एका फंड घराण्याच्या कोणत्याही फंडात काही समान समभाग असतात; किंबहुना सर्वच लार्जकॅप फंडांत पहिल्या पाच गुंतवणुका या एचडीएफसी बँक, रिलायन्स, इन्फोसिस, टीसीएस अशा समान दिसतील. शैलेश राज भान निधी व्यवस्थापक असलेल्या फंडांचा पोर्टफोलिओ ओव्हरलॅप मात्र एका आदर्श पातळीवर आहे.

फंडांच्या निवड पद्धतीबाबत विचारले असता ते म्हणाले, ‘‘लार्जकॅप साठी १००, मल्टिकॅपसाठी ५०० आणि दोन्ही सेक्टोरल फंडांसाठी प्रत्येकी ५० समभाग उपलब्ध असतात. सर्वात कमी ध्रुवीकरण लार्जकॅप, त्यापेक्षा अधिक मल्टिकॅप, तर सेक्टोरल फंडात समभागांचे सर्वाधिक ध्रुवीकरण झालेले असते. ध्रुवीकरणाचा धोका असल्याने सेक्टोरल फंड सर्वाधिक जोखीम असणारे समजले जातात. शार्प रेशो हा निधी व्यवस्थापकाच्या जोखमीचे प्रतिबिंब मानतात. सरकारी रोख्यांपेक्षा (रिस्क-फ्री रेट ऑफ रिटर्न) अधिक परतावा मिळविताना निधी व्यवस्थापक कशी अस्थिरता व्यवस्थापित करतो हे शार्प रेशो दर्शवतो. अनेक वलयांकित निधी व्यवस्थापक निर्देशांकाच्या तुलनेत अधिक अस्थिर आणि निर्देशांकापेक्षा कमी परतावा मिळविणारे आहेत. या निधी व्यवस्थापकांचे फंड टाळायला हवेत. अनेकदा आकडय़ात अधिक परतावा दिलेला फंड कमालीचा अस्थिर असतो. अस्थिरता आणि परतावा यांचा समतोल साधणारा फंडांची शिफारस केली जाते.

समभाग गुंतवणूक नेहमीच अस्थिरतेच्या अधीन असते. मात्र या अस्थिरतेचे मोजमाप एक, तीन, पाच आणि १० वर्षे सापेक्ष केले असता शैलेश राज भान यांनी अस्थिरता आणि परतावा यांचा योग्य समतोल साधलेला दिसत आहे. मागील एक वर्षांतील कमालीच्या खालावलेल्या कामगिरीबद्दल विचारले असता ते म्हणाले, ‘‘आम्ही आदरातिथ्य उद्योगाबाबत आशावादी होतो. जेव्हा हॉटेलच्या खोल्यांचा वापर वाढतो तेव्हा खोलीचे भाडेसुद्धा वाढते. हे वाढीव भाडे थेट नफ्यात परावर्तित होते. आम्हाला आदरातिथ्य व्यवसायात उत्सर्जनवाढीची अपेक्षा होती. आदरातिथ्य उद्योगात लार्जकॅप फंडाची ८ टक्के आणि मल्टिकॅप फंडाची १६ टक्के गुंतवणूक होती. दुर्दैवाने टाळेबंदीची सर्वाधिक बाधा आदरातिथ्य उद्योगाला झाली असल्याचा परिणाम आमच्या कामगिरीवर झाला आहे.’’ गुंतवणुकीत मंदी, व्याजदरातील बदल, नैसर्गिक आपत्ती, दहशवादी हल्ले, हे ‘मार्केट रिस्क’ किंवा ‘सिस्टीमॅटिक रिस्क’ या प्रकारात मोडतात. गुंतवणूकगुरू वॉरेन बफे यांच्या एका वाक्याची वाचकांना आठवण करून द्यावीशी वाटते, बफे म्हणतात, बाजार नेहमीच दीर्घ कालावधीत ‘सिस्टीमॅटिक रिस्क’ घेतल्याचा पुरेपूर मोबदला गुंतवणूकदाराच्या पदरात टाकत असतो. म्हणून एखादा वाचक जेव्हा एकरकमी किंवा एसआयपीसाठी फंड निवड करेल तेव्हा आपल्या गुंतवणुकीत ‘सिस्टीमॅटिक रिस्क’ घेणाऱ्या एका तरी निधी व्यवस्थापकाच्या फंडाला स्थान दिले तर ही शिवामूठ फलद्रूप झाली असे मानता येईल. आपल्या सल्लागाराशी हितगुज करून योग्य फंडाची निवड करावी.

shreeyachebaba@gmail.com

म्युच्युअल फंड गुंतवणुकीसंबंधित माहिती देणारे साप्ताहिक सदर