नव्या मनूंतिल नव्या दमाचा शूर शिपाई आहें,
कोण मला वठणीला आणूं शकतो तें मी पाहें !
ब्राह्मण नाहीं, हिंदुही नाहीं, न मी एक पंथाचा,
तेच पतित कीं जे आंखडिती प्रदेश साकल्याचा !
खादाड असे माझी भूक,
चतकोरानें मला न सुख;
कूपांतिल मी नच मंडूक;
मळ्यास माझ्या कुंपण पडणें अगदीं न मला साहे !
कोण मला वठणीला आणूं शकतो तें मी पाहें !  
-केशवसुत
प्रत्यक्ष ऋणनीती जाहीर होण्याच्या पूर्वसंध्येला रिझव्‍‌र्ह बँकेने देशाच्या अर्थव्यवस्थेची समीक्षा करणारे  निवेदन आणि प्रत्यक्ष ऋणनीतीची केलेली घोषणा ऐकल्यावर मनात केशवसुतांचा नाविन्याची नवी वाट शोधणारा नवा शिपाई मला सुब्बराव यांच्यात दिसू लागला चौकट झुगारून देत परिस्थितीचे वस्तुनिष्ठ विवेचन करून दर कपातीचा दबाव झुगारून देत आपले काम चोख बजावणारा असा शूर शिपाई. एकूण ऋणनीती जशी अपेक्षा केली होती त्याच्या जवळपास आली.  
दहा महिन्याच्या या स्तंभाबरोबरच्या प्रवासानंतर मागे वळून पाहताना बाजाराचा एक विद्यार्थी म्हणून आतापर्यंतचा प्रवास आनंद देऊन गेला. बरेच काही राहून गेल्याची मनात खंत राहते. वाहन व वाहन सुटे भाग (Auto and Auto Ancilary) उद्योग, फार्मा, आदरतिथ्य (Hospitality), बहुव्यावसायिक (conglomerate) कंपन्या या क्षेत्रांबद्दल लिहायचे राहून गेल्याची हुरहूर जाणवते आहे. प्रश्नपत्रिकेत खात्रीने मार्क मिळतील असा प्रश्न वेळ कमी राहिल्यामुळे लिहायचा राहून गेला की लागते तशी चुटपूट लागली आहे. आतापर्यंत बँकिंग व वित्तीय सेवा, मिडकॅप, स्मॉलकॅप अशा वेगवेगळ्या सूत्रांभोवती त्या त्या महिन्याचे लेख गुंफले. नोव्हेंबर महिन्याचे सूत्र बहुव्यावसायिक कंपन्या या सूत्राभोवती गुंफणार आहोत. एकाच व्यवसायात नसल्यामुळे या कंपन्याचे शेअर घेऊन जोखीम कमी करता येते. या चार लेखांच्या मालिकेत आदित्य बिर्ला नुव्हो, गोदरेज इंडस्ट्रीज, लार्सन अ‍ॅड टुब्रो (एलटी), आणि सीमेन्स या चार कंपन्यांची ओळख करून घेणार आहोत. या सूत्रातील आजची पहिली कंपनी आदित्य बिर्ला नुव्हो .
आदित्य बिर्ला नुव्हो
इंडियन रेयॉन अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज ही १९५६ साली स्थापन झालेली कंपनी पुढे काळाच्या ओघात मूळ व्यवसायात बदल होत आज आदित्य बिर्ला नुव्हो हे नाव धारण करून एक बहुव्यावसायिक कंपनी झाली आहे. आदित्य बिर्ला समूहातल्या कंपन्यांचे विलिनीकरण व काही व्यवसाय मूळ कंपनीतून वेगळे काढून या कंपनीत त्यांचा समावेश केला गेला. रोजच्या वापरात आपण या कंपनीची अनेक उत्पादने/ सेवा वापरतो. या कंपनीच्या व्यवसायात खालील गोष्टींचा समावेश होतो.
* जयश्री टेक्स्टाइल : धागे, कापड व्यवसाय, लिनेन कापड धागे, मॉइश्चराइज्ड कापड, टी शर्टसाठी वापरावयाचे विणण्याचे धागे.
* आदित्य बिर्ला मिनाकस: आदित्य बिर्ला मिनाकस ही विविध व्यवसायांना माहिती तंत्रज्ञान सेवा पुरवठादार
* मदुरा गारमेंट्स : लाईफस्टाईल वस्त्रप्रावरणे अ‍ॅलन सोली, लुई फिलीप, व्हॅन ह्युजेन, पीटर इंग्लंड, प्लॅनेट फॅशन या नाममुद्रे खाली विकली जातात. ८८ देशात २६८ ठिकाणी तिचे उत्पादन प्रकल्प आहेत.
* आयडिया सेल्युलर : या कंपनीमार्फत दूरसंचार सेवा दिल्या जातात.
* आदित्य बिर्ला फायनान्शियल सर्व्हिसेस: आदित्य बिर्ला मनी, बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंड, बिर्ला सनलाईफ इन्श्युरन्स, आदित्य बिर्ला कॅपिटल सर्व्हिसेस वगैरे वित्तीय सेवा.
* आदित्य बिर्ला इन्सुलेटर्स : हे विद्युत वाहन व वितरण या साठी वापरायचे उपकरण आहे.
* इंडियन रेयॉन : ही रेयोन धागे बनवणारी व ३८% बाजारपेठेचा हिस्सा असणारी कंपनी
* कार्बन ब्लॅक : हाय टेक कार्बन ब्लॅक
* इंडो गल्फ फर्टीलायझर : रासायनिक खते व्यवसायाचा या कंपनीत समावेश होतो.
भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार केल्यास ‘तरुणांचा देश’ असे बिरूद मिरविणाऱ्या देशाला साजेशा व्यवसायात ही कंपनी आहे. वित्तीय सेवा, नाममुद्रांकीत कपडे, दूरसंचार, माहिती तंत्रज्ञान हे भारतात सध्या बाल्यावस्थेतील व्यवसाय उद्याचे आघाडीचे व्यवसाय बनतील. वित्तीय सेवा व्यवसायाचे जवळजवळ ६०लाख ग्राहक, २०,००० प्रतिनिधी आणि १७०० सेवा/विक्री केंद्रांचे जाळे या व्यवसायाने विणले आहे. मदुरा गारमेंट आणि लाईफस्टाईलचा २२०० कोटींचा व्यवसाय असून गेल्या दोन वर्षांत ५०% चक्रवाढ दराने वाढत आहे. देशभरात व सार्क देश व मध्यपूर्वेतील काही देश, इंग्लंड व अमेरिका येथे मिळून त्याची ११७८ विक्री केंद्रे आहेत. पँन्टलुन रिटेल या कंपनीचे  समभाग विकत घेऊन पँन्टलुनच्या नाममुद्रा (एजील, युएमएम, बेअर डेनिम, रिग, हनी, मिक्स अँड मॅच) आपल्या पंखाखाली आणण्याच्या दृष्टीने कंपनीने पाऊल टाकले आहे.
शुक्रवारच्या बंदभावाचे २०१३च्या अपेक्षित प्रति शेअर मिळकतीनुसार  (रु ९७.२०) पी/ई गुणोत्तर फक्त ८.१४ तर २०१४ च्या मिळकतीनुसार (रु. १०८.२०) हे गुणोत्तर ७.२ पट आहे. म्हणून हा शेअर मुळीच महाग नाही. जेव्हा मे महिन्यात २०१२-१३ चे निकाल जाहीर होतील तेव्हा १३००-१४५० च्या दरम्यान भाव असायला हरकत नाही. हा शेअर खरीदण्यात जोखीम कमी आहे. येत्या गुरुवारी ८ नोव्हेंबर रोजी दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर होतील तेव्हा विक्रीत २२% तर नफ्यात १८% वाढ झालेली दिसणे अपेक्षित आहे.    
मिहद्र अ‍ॅड मिहद्रचे  (मिहद्र)  तिमाही निकाल अपेक्षेप्रमाणे चांगले लागले. त्या नंतर ऑक्टोबर महिन्याच्या विक्रीच्या आकड्यात मिहद्रने अव्वल कामगिरी केली आहे. एक्सयूव्ही  ५००, रेक्स्टॉन, क्वांटो ही नवीन वाहने सणासुदीच्या दिवसात बाजारात उतरविल्यामुळे व स्कॉíपओ, बलेरो व आर्माडा या प्रस्थापित वाहनांमुळे विक्री वाढल्याचे स्पष्ट झाले. अपुऱ्या पावसामुळे गेल्या तिमाहीपेक्षा या तिमाहीत विकलेल्या ट्रॅक्टरची संख्या कमी आहे. परतीच्या पावसाने दिलेला दिलासा या तिमाहीत ट्रॅक्टरची विक्री पुन्हा वाढवेल अशी अपेक्षा आहे. सप्टेंबर अखेपर्यंत विकलेल्या वाहनांच्या संख्येत ६.९% वाढ झाली. मागील चार तिमाहीच्या विक्रीत ३३.४४% वाढ होऊन ती रु. ९८१३ कोटींची झाली. २०१३ च्या पूर्ण वर्षांसाठी प्रति समभाग मिळकत रु. ५७ तर २०१४ साठी रु ७१ रुपये अपेक्षित आहे. येत्या सहा महिन्यात भाव रु १०५० असेल अशी अपेक्षा आहे.
 एखादा शेअर दीर्घ मुदतीसाठी की कमी अवधीसाठी ते कसे ठरवावे. एखाद्या शेअरचे मूल्य कसे काढावे? बाह्य गोष्टींचा बदल आपल्या गुंतवणुकीवर कसा होतो? ‘लोकसत्ता- अर्थ वृत्तान्त’चे वाचक पुण्याचे प्रकाश धामणगांवकर यांनी पाठवलेल्या मूळ इंग्रजी ईमेलमधून हे प्रश्न पुढे आले आहेत.  
या स्तंभातून कायम ठेवण्याचे शेअर्स याची यादी दिली होती. ही यादी व्यक्तीसापेक्ष बदलू शकते. पण  गृहोपयोगी वस्तू, वाहन उद्योग हे दीर्घ मुदतीसाठी तर तत्कालीन कारणांमुळे घेतलेले शेअर हे कमी अवधीसाठी असतात. पुन्हा दीर्घ आणि अल्प मुदत ही व्यक्तीसापेक्ष असू शकते. पी/ई गुणोत्तर ही मूल्यांकनाची सर्वात सोपी पद्धत आहे. बाकीच्या पद्धती गुंतागुंतीच्या आहेत. ऋणनीती, अर्थसंकल्प, नवीन कायदा अथवा कायद्यात बदल यांचा आपल्या गुंतवणुकीवर बरा-वाईट परिणाम होत असतो. येत्या सोमवारी प्रत्येकाच्या गुंतवणुकीत असावा असा ‘लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो लिमिटेड (बंद भाव रु. १६७२) घेऊन तुमच्या भेटीला येईन.     

आदित्य बिर्ला नुव्हो
दर्शनी मूल्य                    : रु. १०.००
मागील बंद भाव              : रु. ९२२.७५ (२ नोव्हे.)
वर्षांतील उच्चांक             :  रु. १०२८
वर्षांतील नीचांक              :  रु. ७१०
पुस्तकी मूल्य                  : रु.     ७२
वर्षांनंतर अपेक्षित भाव    : रु. १२३५

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
loksatta readers opinion on editorial readers reaction on loksatta news
लोकमानस : वंचित नव्हे, मविआच भाजपची ‘बी टीम’?
Can those on insulin participate in exercise
व्यायामापूर्वी खावे की नंतर? मधुमेही व्यक्तीने व्यायाम करावा का? व्यायाम करताना काय काळजी घ्यावी, डॉक्टरांकडून जाणून घ्या

या कंपनीत गुंतवणूक करण्याची कारणे   
* भारतातील व्हिस्कोस धाग्याची दुसऱ्या क्रमांकाची उत्पादक
* भारतातील सर्वात मोठी नाममुद्रांकीत कपड्यांची उत्पादक
* भारतातील क्रमांक दोनची कार्बन ब्लॅक उत्पादक
* लिनेन कापडाची सर्वात मोठी उत्पादक  
* प्रति टन सर्वात कमी उर्जा वापरणारा खत कारखाना
* भारतातील सर्वात मोठा आणि जगातील चौथ्या क्रमांकाचा इन्सुलेटर उत्पादक
* भारतातील तिसऱ्या क्रमांकाचा दूरसंचार सेवा पुरवठादार