25 April 2019

News Flash

नको मनधरणी ‘अर्था’ची..

दीर्घकालीन परताव्याचा विचार केल्यास आयडीएफसी मल्टी कॅप फंडाची कामगिरी वाखाणण्याजोगी आहे.

(संग्रहित छायाचित्र)

फंड विश्लेषण

वसंत माधव कुळकर्णी

सक्रिय पोर्टफोलिओ व्यवस्थापन असलेल्या सगळ्याच फंडांत मागील वर्षभरात नियोजनबद्ध पद्धतीने केलेल्या (एसआयपी) गुंतवणुकीचा परतावा नकारात्मक आहे. त्यातही मल्टी कॅप गटातील फंडाचा परतावा त्यांच्या मानदंड असलेल्या निर्देशांकाच्या परताव्यापेक्षा किमान दीड ते तीन टक्के कमी आहे. परंतु एका वर्षांऐवजी पाच वर्षांच्या परताव्याची तुलना केल्यास फंडाचे मानदंड असलेल्या निर्देशांकाच्या परताव्यापेक्षा तो चार ते सहा टक्के अधिक आहे. बाजाराच्या मुख्य निर्देशांकापैकी निफ्टी आणि सेन्सेक्स वर-खाली होत वर्षभरापूर्वी जिकडे होते त्याच पातळीवर असूनही मल्टी कॅप फंड परिघातील उपलब्ध तीनपैकी एका फंडाने नकारात्मक परतावा दिलेला आहे.

दीर्घकालीन परताव्याचा विचार केल्यास आयडीएफसी मल्टी कॅप फंडाची कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. या फंडाला खऱ्या अर्थाने बहर आला तो सप्टेंबर २०१० नंतर म्हणजे फंडाने चार र्वष पूर्ण केल्यानंतरच. या फंडाला नेत्रदीपक कामगिरीपर्यंत नेणारे निधी व्यवस्थापक म्हणजे केनेथ अ‍ॅड्रय़ू. जून २००६ ते सप्टेंबर २०१५ पर्यंत ते या फंडाचे निधी व्यवस्थापक होते. मार्च २०१६ पासून आयडीएफसी मल्टी कॅप फंडाच्या निधी व्यवस्थापनाची धुरा अनुप भास्कर सांभाळत आहेत. अनुप भास्कर हे मिड आणि स्मॉल कॅप फंडातील यशस्वी निधी व्यवस्थापक आहेत. फंडातील गुंतवणूक केवळ नियोजनबद्ध पद्धतीने (एसआयपी) कधीकाळी स्वीकारणारा हा मुच्युअल फंड विश्वातील एकमेव फंड होता. निधी व्यवस्थापक बदलल्याने अनेक गुंतवणूकदारांनी आपणहून किंवा सल्लागारांच्या सांगण्यावरून सुरू असलेली आणि समाधानकारक परतावा देणारी ‘एसआयपी’ बंद केली.

फंड घराण्याने निधी व्यवस्थापनाची धुरा अनुप भास्कर यांच्याकडे दिल्यावर फंडाच्या गुंतवणूक धोरणात स्वाभाविकपणे बदल झाले. हा फंड खऱ्या अर्थाने मल्टी कॅप प्रकारचा झाला आहे. अनुप भास्कर यांच्या कारकीर्दीत या फंडाचे संक्रमण मिड कॅप धाटणीच्या फंडाकडून मल्टी कॅप फंडाकडे झाले. फंडाच्या विद्यमान गुंतवणुकीत ४५.८४ टक्के लार्ज कॅप, ३९.१७ टक्के मिड कॅप १२.०९ टक्के स्मॉल कॅप आणि २.९ टक्के रोकड आभासी गुंतवणुका आहेत. हा फंड एकूण मालमत्तेपैकी ७५ टक्के मालमत्ता उपभोग्य वस्तू तसेच या वस्तूंसाठी वित्तपुरवठा करणाऱ्या कंपन्या आणि २५ टक्के मालमत्ता धोरणात्मक बाबींशी निगडित प्रकारात गुंतविली जाते. फंडाचे सह-निधी व्यवस्थापक म्हणून कार्तिक मेहता यांची एप्रिल २०१८ पासून नेमणूक झाली आहे. अनुप भास्कर यांनी गुंतवणुकीत केलेल्या बदलाचे परिणाम दिसू लागले आहेत. दीर्घ काळापासून सुरूअसलेल्या नियोजनबद्ध पद्धतीने गुंतवणुकीवरील नफ्याच्या टक्केवारीत सुधारणा होऊ लागलेली दिसत आहे.

विद्यमान निधी व्यवस्थापकांनी फंडाच्या गुंतवणुकीत केलेल्या बदलांचे झालेले परिणाम दिसण्यास दीड-दोन वर्षांचा कालावधी जावा लागतो. सक्रिय पोर्टफोलिओ व्यवस्थापन असलेल्या फंडांपैकी ज्या निवडक फंडांनी आपल्या मानदंड असलेल्या निर्देशांकाच्या परताव्यापेक्षा तीन आणि पाच वर्षे कालावधीत अधिक नफा गुंतवणूकदारांना दिला आहे. मल्टी कॅप फंडाचा ‘अल्फा’ (मानदंड निर्देशांकापेक्षा अधिक परतावा) लार्ज कॅप फंडापेक्षा अधिक असेल. सोबतच्या दिलेल्या कोष्टकात दीर्घकालीन नियोजनबद्ध पद्धतीने केलेल्या गुंतवणुकीवरील नफ्याची टक्केवारी वाढत्या कालावधीप्रमाणे वाढत असल्याचे दिसून येते. पुढील तीन-चार वर्षांचा विचार केल्यास अनुप भास्कर आणि कार्तिक मेहता या निधी व्यवस्थापकांनी बदललेल्या रणनीतीमुळे आयडीएफसी मल्टी कॅप फंड हा मानदंड निर्देशांकापेक्षा उजवी कामगिरी असलेल्या फंडापैकी अग्रक्रमावर असलेला एक फंड असेल याबद्दल खात्री बाळगावी अशी स्थिती आहे. फंडाच्या मालमत्तेपैकी मोठा हिस्सा नियोजनबद्ध पद्धतीने केलेल्या गुंतवणुकीतून उभा राहिला आहे. दीर्घकालीन नियोजनबद्ध पद्धतीने केलेल्या गुंतवणुकीवरील समाधानकारक परतावा असलेला हा फंड सध्या एकरकमी गुंतवणुकीसाठी खुला आहे. या फंडात आपल्या वित्तीय ध्येयाशी सुसंगत गुंतवणूक केल्यास एका अर्थी ‘नको मनधरणी अर्थाची’ असे म्हणण्याची गुंतवणूकदारांवर वेळ येणार नाही.

आयडीएफसी  मल्टी कॅप फंड

व्हॅल्यू फंड

* फंडाची पहिली एनएव्ही:  २६ सप्टें. २००५

*  सध्याची एनएव्ही  (३० नोव्हें. २०१८ रोजी)

वृद्धी पर्याय      : ८९.२३   रु.

लाभांश पर्याय   : ५७.५२९  रु.

(तपशील रेग्युलर ग्रोथ योजनेचा)

*  संदर्भ निर्देशांक  :    बीएसई ५००  टीआरआय इंडेक्स

*  किमान एसआयपी    :      १०,००० रुपये

*  किमान गुंतवणूक     :      —

*  पोर्टफोलिओ पी/ई     : ३६.०१

*  पोर्टफोलिओ बीटा     :      ०.८३९९

*  प्रमाणित विचलन    :      ०.८१८५

*  एग्झिट लोड :

३६५ दिवसांआधी १ टक्का; ३६५ दिवसांनंतर लोड नाही

shreeyachebaba@gmail.com

(अस्वीकृती: लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. स्तंभातील आकडेवारी व माहिती ही उपलब्ध स्रोतांपासून घेतली आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)

First Published on December 3, 2018 2:46 am

Web Title: no negotiated for investment