कापसाचे भाव ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये हमीभाव पातळीच्या आसपास राहिल्यामुळे व्यापारात मरगळ आली होती. शिवाय देशांतर्गत आणि निर्यातीला फारशी मागणी नसल्यामुळेदेखील व्यापाऱ्यांचा प्रतिसाद कमीच होता. तर दुसरीकडे कापूस महामंडळ आणि महाराष्ट्र कॉटन फेडरेशनची हमीभाव खरेदी चालू असल्यामुळे कापसाचे पीक चांगले असूनदेखील भाव १८,६०० रुपये प्रतिगाठीच्या खाली आलेला नव्हता. आजमितीला दोन्ही संस्थांनी सुमारे ३५ लाख गाठी कापूस खरेदी केला असल्यामुळे आणि अजून निदान तेवढीच खरेदी होणार, अशी शक्यता आहे. त्यामुळे ७० लाख गाठी बाजारातून जाणार याचा सकारात्मक परिणाम किमतींवर होऊन वायदे बाजारात कापूस शुक्रवारी २०,००० रुपये प्रतिगाठ या तीन महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. तरीसुद्धा हाजीर बाजारामध्ये भाव १९,२०० रुपयांच्या आसपास आहे. यामधून ‘आर्बट्रिाज’ व्यापाराची मोठी संधी निर्माण झालीय. हाजीर बाजारात कापूस खरेदी करून लगोलग एमसीएक्स या कमॉडिटी एक्स्चेंजवर ७५०-८०० रुपये अधिकच्या भावात विकल्यास सर्व खर्च वजा जाऊनदेखील २००-२५० रुपये प्रतिगाठ एवढा खात्रीने आणि सुरक्षित फायदा होईल. शेतकरी उत्पादक संस्था किंवा मोठय़ा शेतकऱ्यांनी याचा फायदा घेणे श्रेयस्कर ठरेल.

कापसाचे भाव वायदे बाजारात अजून एक-दोन टक्के वाढू शकतील; परंतु या वाढीला समर्पक कारण सध्या तरी दिसत नाही. निर्यातीमध्ये म्हणावी तशी वाढ नाही, तर रुपया डॉलरच्या तुलनेत अधिकच मजबूत होत असल्यामुळे निर्यात पातळीवर फार मोठे सकारात्मक बदल दृष्टिक्षेपात नाहीत. तसेच स्थानिक वस्त्रोद्योगाकडूनही मागणीमध्ये वाढ नाही. याव्यतिरिक्त विदर्भ आणि विशेषकरून नागपूरमधील अलीकडील पावसामुळे फरदड प्रकारच्या कापसाच्या उत्पादनात चांगलीच वाढ अपेक्षित आहे. यामुळेदेखील कापसाच्या भावावर नियंत्रण आले असून, अमेरिका-चीनमधील तणाव कमी होणार या एका मुद्दय़ावर मूड बदलून कापसाच्या किमतीत निदान वायदेबाजारात तरी वाढ होताना दिसत आहे. चीनकडून अपेक्षेप्रमाणे मागणी न आल्यास भावात नजीकच्या काळात घसरण येऊ शकते. म्हणून वायद्यातील भाववाढीचा लाभ कसा घेता येईल हे शेतकरी उत्पादक कंपन्यांनी पाहणे गरजेचे ठरले आहे.