|| अजय वाळिंबे

जवळपास ६० वर्षांपूर्वी म्हणजे १९६० मध्ये फिलिप्स पेट्रोलियम कार्पोरेशन या अमेरिकी कंपनीच्या सहकार्याने पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथे हा संयुक्त प्रकल्प उभारण्यात आला. सुरुवातीला वर्षांला १४,००० मेट्रिक टन कार्बन ब्लॅकचे उत्पादन करणारा हा प्रकल्प आज वार्षकि १,७०,००० मेट्रिक टन उत्पादन करतो. आपला विस्तारीकरण प्रकल्प राबवताना कंपनीने गुजरातमधील पालेज येथील गुजरात कार्बन तसेच कोचीमधील कार्बन अँड केमिकल्स लिमिटेड या कंपन्या ताब्यात घेतल्या. आज कंपनीचे कोची, दुर्गापूर आणि गुजरातेत मुंद्रा आणि पालेज असे चार उत्पादन प्रकल्प असून कंपनीचे एकत्रिक वार्षकि उत्पादन ५,१५,००० मेट्रिक टन आहे. या चारही प्रकल्पात कंपनी ऊर्जा निर्मिती देखील करते.

रबर ब्लॅक आणि स्पेशालिटी ब्लॅक ही कंपनीची प्रमुख उत्पादने असून पकी स्पेशालिटी ब्लॅक हे रंग, प्लास्टिक, पॉलिमर, फायबर तसेच रिचार्जेबल बॅटरी इ. अनेक व्यवसायात वापरले जाते. गेल्या तीन वर्षांत कंपनीने उत्तम कामगिरी करून दाखविली असून कंपनीच्या आरईओ आणि नफ्यात वाढ होताना दिसत आहे. डिसेंबर २०१८ साठी संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीने ९४५.८९ कोटी रुपयांची उलाढाल (गेल्या वर्षी ६१५.०१ कोटी) साध्य केली असून याच कालावधीत १०८.५८ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तो ९२ टक्क्य़ांनी अधिक आहे. कंपनीचा नऊमाहीचा नफा ३१४.१० कोटी असून तो गेल्या वर्षीच्या तुलनेत १०० टक्क्य़ांहून अधिक आहे. येते वर्ष देखील या क्षेत्रासाठी फायद्याचे ठरेल अशी अपेक्षा असल्याने फिलिप्स कार्बन ब्लॅक या हाय बीटा कंपनीचा शेअर मध्यमकालीन गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटतो.