वसंत कुलकर्णी

नियोजनबद्ध गुंतवणुकीचा पर्याय किंवा ‘एसआयपी’ याबाबत म्युच्युअल फंड, त्यांचे वितरक आणि आर्थिक नियोजकांद्वारे प्रचलित केलेली एक अतिशय लोकप्रिय संकल्पना आहे. वेगवेगळ्या माधमांतून ‘म्युच्युअल फंड सही है’ ही जाहिरात प्रसारित होत असते. ही जाहिरात अतिशय परिणामकारक झाल्याचे दिसत आहे. म्युच्युअल फंडात ‘एसआयपी’द्वारा होणाऱ्या गुंतवणुकीने ८,००० कोटी रुपयांचा टप्पा केव्हाच पार केला आहे. साधारणपणे बाजारात चांगली कामगिरी करण्यासाठी आणि दीर्घ मुदतीसाठी संपत्ती निर्माण करण्यासाठी समभाग गुंतवणुकीचा सुरक्षित आणि निश्चित मार्ग म्हणून ‘एसआयपी’कडे पाहिले जाते.

म्युच्युअल फंडांसाठी मालमत्ता वाढविण्यासाठी आणि फंड वितरकांसाठीही ‘एसआयपी’ निश्चितपणे फायद्याचा मामला आहे. फंड घराण्यांकडून दीर्घ मुदतीसाठी पैसे गुंतविले जातात, ज्यासाठी फंड घराणी मालमत्ता व्यवस्थापन शुल्क आकारतात. तर फंड वितरकांसाठी एसआयपी एक नियमित उत्पन्नाचे साधन ठरते. परंतु, गुंतवणूकदारासाठी एसआयपी कितपत संपत्तीनिर्मितीचे साधन आहे? गुंतवणूकदारांना असा प्रश्न विचारला तर एसआयपी मुळीच सुरक्षित नाही असे मानणारे गुंतवणूकदारच अधिक मिळतील. एसआयपी संपत्तीनिर्मिती करण्यास असमर्थ आहे असे मोठय़ा संख्येने असे मानणाऱ्या गुंतवणूकदारांच्या समुदायास मुंबईस्थित रँक म्युच्युअल फंडाने ‘अभिनव एसआयपी’ची सेवा उपलब्ध करून दिली आहे. ‘स्मार्ट एसआयपी’ या संकल्पनेचे जनक ओंकेश्वर सिंग यांच्याशी मागील आठवडय़ात भेट झाली. साहजिकच चच्रेचा विषय ‘स्मार्ट एसआयपी’ हाच होता.

या संकल्पनेच्या जन्मामागची कथा ओंकेश्वर यांनी सहज बोलता बोलता सांगितली. ‘‘मागील काही वर्षांत एसआयपीचा विकल्प गुंतवणूकदारांत चांगलाच लोकप्रिय झाला आहे. गुंतवणूकदारांना फंड गुंतवणुकीतील प्रस्तावित परतावा आणि गुंतवणूकदाराला प्रत्यक्षात गुंतवणुकीवर मिळणारा परतावा यात मोठा फरक दिसून येतो. आणि मग गुंतवणूकदार एक तर ‘एसआयपी’ बंद करतो किंवा फंड निवड चुकली असे समजून दुसऱ्या फंडाचा विचार करतो. हे टाळण्यासाठी आम्ही आमच्या संशोधनाअंती एक पद्धत विकसित केली. डेटा सायन्स किंवा विदा विज्ञानात ‘अल्गोरिदम’ ही संकल्पना वापरली जाते. ‘हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग’मध्ये वापरल्या जाणाऱ्या ‘अल्गोरिदम’चा वापर आम्ही म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी केला. आमची दलाली पेढी असल्याने समभाग संशोधन हा आमच्या व्यवसायाचा अविभाज्य भाग आहे. साहजिकच आमच्याकडे समभाग संशोधनातून मोठी आधार सामग्री (डेटा पॉइंट्स) उपलब्ध आहेत. आम्ही या आधार सामग्रीचा वापर म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी केला. बाजार गुंतवणुकीच्या वेगवेगळ्या टप्प्यात असतो. या वेगवेगळ्या टप्प्यात सर्वच समभागात परिस्थिती नव्याने गुंतवणूक करण्यास अनुकूल असतेच असे नाही.’’

‘‘केवळ सर्वसामान्यपणे गुंतवणूकदारच नव्हे तर वितरकदेखील फंड निवडीसाठी मागील परतावा हा महत्त्वाचा निकष मानतात. आमच्या फंड निवडीत गुंतवणुकीतून मागील परताव्याचा प्रभाव नाहीसा करून वर्तमानात फंड नव्याने गुंतवणूक करण्यास कितपत योग्य आहे हे ठरवत असतो. आम्ही मानवी भावनांचा अडसर दूर करण्यासाठी आणि दोन कोटी आधार बिंदू (डेटा पॉइंटस) वापरून ‘सुरक्षित गुंतवणूक’ ही संकल्पना अस्तित्वात आणली. वॉरेन बफे यांनी समभाग निवडताना ‘मार्जिन ऑफ सेफ्टी’ हा महत्त्वाचा निकष मानला. आम्ही हीच संकल्पना म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी वापरली. फंडांनी गुंतवणूक केलेले समभाग हे नव्याने गुंतवणूक करण्यास कितपत सुरक्षित असतील तर तो फंड नव्याने गुंतवणूक करण्यास सुरक्षित आहे. एक हजारहून अधिक फंडांच्या विश्लेषणातून आम्ही ३३० फंड गुंतवणुकीसाठी निवडले आहेत. आम्हाला फंड निवडण्यासाठी पहिला फंडाचा पोर्टफोलिओ उपलब्ध होणे गरजेचे असते. नव्याने दाखल झालेल्या अनेक फंडांची आम्ही त्या फंडांनी केलेल्या समभाग गुंतवणुकीच्या निकषावर शिफारस केली आहे. ‘स्मार्ट एसआयपी’मध्ये गुंतवणूक लिक्विड फंडात केली जाते. बाजार मूल्यांकनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांनुसार ‘मार्जिन ऑफ सेफ्टी’ ५० ते १३० दरम्यान असते. ‘मार्जिन ऑफ सेफ्टी’ जितकी अधिक, तितकी गुंतवणूक सुरक्षित!’’

‘‘उदाहरणासाठी जानेवारी ते ५ जुलै (अर्थसंकल्प जाहीर झाल्याची तारीख) दरम्यान ‘एचडीएफसी टॉप १००’ फंडाचा मार्जिन ऑफ सेफ्टी इंडेक्स १०० दरम्यान होता. अर्थसंकल्पानंतर झालेल्या घसरणीमुळे मार्जिन ऑफ सेफ्टी वाढल्यामुळे एखाद्या गुंतवणूकदाराची एसआयपी १,००० रुपयांची असेल तर आम्ही ती सध्या दुप्पट म्हणजे २,००० रुपये करण्याचा सल्ला देत आहोत. आमच्या ‘अल्गोरिदम’नुसार या फंडात २००९ ते २०१९ अशी दहा वर्षे एसआयपी करणाऱ्या गुंतवणूकदाराला १६.२६ टक्के सरासरी वार्षिक परतावा मिळाला आहे. तर नेहमीची एसआयपी करणाऱ्याला १०.३२ टक्के  परतावा मिळाला आहे. आमच्या ‘अल्गोरिदम’नुसार बाजारचक्राचा पूर्ण फायदा घेण्यासाठी किमान पाच वर्षे गुंतवणूक करणे आवश्यक आहे.

‘‘एसआयपीचा डाव जिंकायचा असेल तर एसआयपी ‘टी-२०’प्रमाणे खेळायला हवी. ‘टी-२०’मध्ये जेव्हा खेळपट्टी अनुकूल नसेल तेव्हा विकेट न पडू देणे महत्त्वाचे. जेव्हा खेळ मधल्या टप्प्यात पोहोचतो, तेव्हा धावफलक हलता ठेवता यायला हवा. आणि शेवटच्या षटकात फटकेबाजी करून धावा कुटता येणारा संघच जिंकतो. जेव्हा बाजार गुंतवणुकीसाठी प्रतिकूल असेल म्हणजे मार्जिन ऑफ सेफ्टी नसेल तेव्हा समभाग गुंतवणूक टाळून भांडवल सुरक्षित राखणे महत्त्वाचे. बाजार सामान्य किंवा साइडवेज असेल तेव्हा लिक्विड फंडातून ३५ ते ५० टक्के समभाग गुंतवणूक करणाऱ्या फंडात जायला हवेत आणि सध्याच्या परिस्थितीत जेव्हा मार्जिन ऑफ सेफ्टी ‘हाय’ आहे तेव्हा मासिक गुंतवणुकीव्यतिरिक्त अतिरिक्त गुंतवणूक समभाग गुंतवणूक करणाऱ्या फंडात जायला हवी.’’

याला पुरावा काय?

‘‘तुम्ही आमच्या संकेतस्थळावर जाऊन, टिक बाय टिक म्हणजे प्रत्येक आधारिबदूचा तुमच्या गुंतवणुकीवर होणारा परिणाम आणि बदलत गेलेला मार्जिन ऑफ सेफ्टीचा अनुभव घेऊ शकता. तुमची गुंतवणूक असलेला फंड नव्याने गुंतवणूक करण्यास कितपत सुरक्षित आहे हे जाणून घेऊ शकता. जेव्हा तुम्ही गुंतवणुकीला सुरुवात केलीत तेव्हा त्या फंडाचे मार्जिन ऑफ सेफ्टी किती होते आणि आता किती आहे हे ताडून घेऊ शकता. अनेकदा फंड चांगला असतो पण ती घडी गुंतवणुकीला अनुकूल नसते. तर एखाद्या वेळेस फंड आणि वेळ दोन्ही प्रतिकूल असतात. उदाहरण म्हणून सांगायचे तर मागील वर्षभरात अनेकांनी येस बँकेचे शेअर्स खरेदी केले. कारण येस बँक रोज नव्या नीचांकाची नव्याने नोंद करत होता. रोज नव्याने नीचांकाची नोंद करणाऱ्या समभागात कितीही ‘अ‍ॅव्हरेज’ केलेत तरी तुम्ही नफा कमावू शकणार नाही. तेच एचडीएफसी बँकेची नवीन खरेदी आधीपेक्षा वरच्या भावात केली असतीत तरी नफा झाला असता. आम्ही नेमके हेच सूत्र म्युच्युअल फंड गुंतवणुकीत वापरले. तुम्ही चांगल्या फंडात आणि अनुकूल काळात केलेली गुंतवणूक लाभदायक ठरेल. फंड निवड चुकली तर दीर्घकालीन एसआयपी करूनही तुम्हाला नफा होणार नाही. फंड निवड आणि अनुकूल वेळ हे साधले तरच एसआयपी लाभदायक ठरेल.

shreeyachebaba@gmail.com