27 September 2020

News Flash

थेंबे थेंबे तळे साचे : २०१९ ला निरोप; २०२० चे स्वागत 

२०१८ सालाची सुरुवात जरी घोडदौडीने झाली असली, तरी पहिला धक्का जानेवारी महिन्याअखेर लागला.

(संग्रहित छायाचित्र)

तृप्ती राणे

या वर्षांचा माझा हा शेवटचा लेख. मी जरी मागील तीन वर्ष लिहीत असले तरीसुद्धा पोर्टफोलिओ गुंतवणूक ही गेले दोन वर्षांपासून सुरू आहे. २०१८ जानेवारीपासून जेव्हा थेंबे थेंबे गुंतवणूक करायला सुरुवात केली तेव्हा शेअर बाजारातील महत्त्वाचे आकडे खालीलप्रमाणे होते :

निर्देशांकांची २९ डिसेंबर २०१७ रोजी पातळी (कंसात) किंमत/उत्पन्न (पी/ई) गुणोत्तर :

सेन्सेक्स ३४,०५६.८३     (२४.६७ पट)

निफ्टी    १०,५३०.७०     (२६.९२ पट)

बीएसई  मिडकॅप    ५,४३८.४५      (३३.०२ पट)

बीएसई स्मॉलकॅप    ९,२३०.७२      (११५.६९ पट)

आज आपण ३१ डिसेंबर २०१९ कडे झपाटय़ाने जेव्हा पावले टाकतोय तेव्हा वरचे आकडे याप्रमाणे दिसत आहेत :

निर्देशांकांची २० डिसेंबर २०१९ रोजी पातळी (कंसात) किंमत/उत्पन्न (पी/ई) गुणोत्तर :

सेन्सेक्स  ४१,६८१.५४     (२७.५७ पट)

निफ्टी    १२,२७१.८०     (२८.६० पट)

बीएसई मिडकॅप १४,८३५.९७     (२९.७८ पट)

बीएसई स्मालकॅप    १३,३९१.०३     (४२.२९ पट)

वरील तक्त्यांमधून स्पष्ट होत आहे की, एका बाजूला निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये मागील दोन वर्षांत १७ टक्के आणि २२ टक्के इतके परतावे मिळाले तर दुसऱ्या बाजूला मिड आणि स्मॉल कॅप निर्देशांक १७ टक्के आणि ३० टक्के घसरले आहेत. २०१८ सालाची सुरुवात जरी घोडदौडीने झाली असली, तरी पहिला धक्का जानेवारी महिन्याअखेर लागला. तिथून साधारणपणे पुढचे दोन महिने हे घसरणीचे गेले आणि त्यानंतर मग पुन्हा नव्याने आगेकूच करायला सुरुवात केली. मग सप्टेंबरमध्ये ‘आयएल अ‍ॅण्ड एफएस’मधील घोटाळ्याने बाजाराला स्पीड ब्रेकर लावला. वर्षभर कमावलेलं सगळं गमावून हळूहळू बाजाराची गाडी पुन्हा पुढे ढकलायला लागली. मात्र हा प्रवास आता खडतर होऊ लागला. २०१९ ची सुरुवात मुळात जेट एअरवेजच्या दिवाळखोरीने झाली आणि त्यापाठोपाठ झी, दिवाण हाऊसिंग, रिलायन्स कॅपिटल ही नावे बाहेर पडली. सुरक्षित मानले जाणारे आणि नावाजलेले डेट म्युच्युअल फंड या कचाटय़ात सापडले आणि या फंडामध्ये सुद्धा नुकसान होतं ही जाणीव गुंतवणूकदारांना झाली. ऑक्टोबपर्यंत साधारणपणे ७,८०० कोटी इतका बॉण्ड डिफॉल्ट आपल्या देशात झाला. निर्देशांक जरी नफ्यात दिसला, तरीसुद्धा हा नफा सगळ्या कंपन्यांचा नसून फक्त ठरावीक आठ-१० मातब्बरांनी कमावलेला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी मागील दोन/तीन वर्षांमध्ये बाजारात एंट्री केली ते अजूनही साशंक अवस्थेत आहेत की, खरंच यातून फायदा होतो का? स्मॉल आणि मिड कॅपमधील गुंतवणूक कधी परतावे देणार की येणाऱ्या काळात अजून कमी होणार या बाबतीतसुद्धा फार विश्वास सामान्य गुंतवणूकदाराला आज वाटत नाही. हे सर्व असं असताना पुढे काय करावं असा प्रश्न पडणं अतिशय स्वाभाविक आहे.

तेव्हा २०२० मध्ये गुंतवणूक करताना खालील गोष्टी सुचवाव्यात असे वाटते :

१ कोणत्याही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याआधी त्याच्या पोर्टफोलिओमध्ये कोणत्या कंपन्या किंवा कोणते रोखे आहेत ते बघा. फक्त मागील परतावे बघून गुंतवणूक करू नका.

२ मार्केट कॅप संलग्न गुंतवणूक करताना किंमत/उत्पन्न (पी/ई) गुणोत्तराकडे लक्ष असू द्या. आजघडीला स्मॉल आणि मिड कॅप निर्देशांक गुंतवणुकीसाठी जास्त आकर्षक आहेत. परंतु तिथे जोखीमसुद्धा जास्त आहे.

३ बाजाराच्या पी/ई बरोबर महागाई आणि त्यानुसार वाढणाऱ्या व्याजदरांकडेसुद्धा लक्ष असू द्या. जर हे दोन्ही लवकर वाढले तर बाजारातील परतावे कमी होतील आणि त्याचा जास्त फटका स्मॉल आणि मिडकॅप गुंतवणुकीला बसेल.

४ रोखेसंलग्न म्युच्युअल फंड किती सुरक्षित आहेत आणि महागाईबरोबर जुळवून घेणारे आहेत हे बघून घ्या. अल्ट्रा शॉर्ट टर्म, शॉर्ट टर्म, मीडियम टर्म, कॉर्पोरेट बॉण्ड, बँकिंग आणि पीएसयू डेट फंड, गिल्ट फंड या सर्वाची जोखीम आणि फायदे समजून घ्यावी आणि त्यानुसार गुंतवणूक करा.

५ ‘एसआयपी’च्या आधाराने गुंतवणूक सुरू ठेवा. नव्या गुतंवणूकदाराने सुरुवात करताना कमी जोखीम असलेले फंड निवडावे. अग्रेसिव्ह हायब्रीड  फंडसुद्धा मार्केटची जोखीम बाळगून आहेत तेव्हा ते येत्या काळात कदाचित कमी परतावे देऊ शकतील याची जाण असू द्या.

६ आपल्या देशाबाहेरच्या घटनांचा वेध घ्या. अमेरिकेचे येत्या वर्षांतील धोरण, चीनमधील परिस्थिती, या दोन्हीही गोष्टींचा आपल्या बाजारावर परिणाम होतो हे ध्यानात घ्या.

७ हवामान बदल, डिजिटायझेशन, आशियाई देशांमध्ये वाढणारं कंझम्पशन, वाढणारे आयुर्मान, मानसिक अस्थर्य – या सर्व गोष्टींचा आपल्या आयुष्यावर आणि गुंतवणुकीवर होणारा परिणाम समजून घ्या.

८ थेट गुंतवणुकीसाठी कंपनी निवडताना तिचा व्यवसाय येत्या काळात राहील की नाही याबद्दल चौकस राहा.

९. तुमच्या आणि तुमच्या मुलांच्या राहणीमानामध्ये आणि मानसिकतेत खूप फरक आहे. तेव्हा आर्थिक गुंतवणुकीबरोबर भावनिक गुंतवणूकसुद्धा प्रगल्भ करा.

या पुढे आपण या सदरातून ‘पोर्टफोलिओची कामगिरी’ दर्शविणारा आढावा हा प्रत्येक पंधरवडय़ाला न घेतला जाता, प्रत्येक तिमाहीला घेणार आहोत. कामगिरी दाखवणं आणि त्याची वारंवारिता जरी कमी होणार असली तरी थेंबे-थेंबे गुंतवणूक सुरू ठेवायची आहे. सर्वाना नवीन वर्षांच्या अनेकोत्तम शुभेच्छा.

(लेखिका सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार )

trupti_vrane@yahoo.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 23, 2019 4:14 am

Web Title: portfolio investment share market abn 97
Next Stories
1 नावात काय? : स्पॉट रेट, फॉरवर्ड रेट
2 माझा पोर्टफोलियो : डिजिटल युगाचा सांगावा
3 अर्थ चक्र : युद्धविराम
Just Now!
X