बघता बघता नवीन वर्षांचे पहिले तीन महिने संपलेदेखील. २०१३ या कॅलेंडर वर्षांची सुरुवात एकूणच निराशाजनक झाली. रिझव्‍‌र्ह बँकेचे पतधोरण आणि अर्थसंकल्प शेअर बाजारात संजीवनी आणू शकले नाहीत. किंबहुना कुठलीही ठोस उपाययोजना नसलेल्या आणि अतिशय सपक अशा अर्थसंकल्पाने निराशाच केली. या व्यतिरिक्त वाढते भ्रष्टाचार, काळे पसे, जागतिक बाजारपेठेवरील मंदीचे सावट आणि अनिश्चित राजकीय परिस्थिती या सर्वाचा एकत्रित परिणाम शेअर बाजारावर झालेला दिसतो. सध्या मंदीवाले जोरात असल्याने गुंतवणूक करायची नक्की वेळ कळेनाशी झाली आहे. बाजार कोसळायला लागला की सामान्य गुंतवणूकदार नुकसानीत विक्री करून बाजारातून पळ काढतो. खरे तर हीच वेळ गुंतवणूक करायची असते. गुंतवणूक नेमकी कधी करायची हे माहिती असले तरीही हुशार गुंतवणूकदार देखील बावरून जाऊन विक्रीचा मार्ग पत्करतात. मिडकॅपची परिस्थिती तर दयनीय झाली आहे. अनेक उत्तम कंपन्यांचे शेअर्स आकर्षक किमतीस उपलब्ध आहेत. याच स्तंभातून सुचविलेले काही शेअर्स उदा. ग्रीव्हज् कॉटन, इंगरसोल रॅन्ड, केर्न, तळवलकर्स, एनएमडीसी इ. कंपन्यांचे शेअर्स तुम्हाला आकर्षक भावास मिळू शकतात. अर्थात शेअर बाजाराचा कल अजून काही दिवस मंदीचा राहील अशी अपेक्षा असल्याने हवा असलेला शेअर तळ गाठेपर्यंत थांबा आणि नंतरच खरेदी करा.
पोर्टफोलियो का बनवावा? या प्रश्नाचे उत्तर आहे गुंतवणुकीतील धोका कमी करण्याकरीता. एकाच कंपनीतील किंवा एकाच क्षेत्रातील कंपनीत केलेली गुंतवणूक कशी महाग पडू शकते ते सध्या रियल इस्टेट, इन्फ्रा., पॉवर कंपन्यांची परिस्थिती बघितल्यावर लक्षात येईल. अशा वेळी एफएमसीजी, फार्मा कंपन्या गुंतवणुकीतील नुकसान टाळू शकतात किंवा तोटा कमी करतात. पडणाऱ्या बाजारात अपरिवर्तनीय रोख्यातील किंवा बॉन्डस मधील गुंतवणूकही फायद्याची ठरू शकते. एकंदरीत अर्थव्यवस्थेची धोरणे पाहता व्याज दर वाढण्याची शक्यता आता कमी होत चालली आहे, गेल्या वर्षी श्रीराम सिटी युनियन, श्रीराम ट्रान्सपोर्ट, रेलिगेअर फिनवेस्ट सारख्या अनेक कंपन्यांनी अपरिवर्तनीय रोखे बाजारात विक्रीसाठी आणले होते. साधारण ११.५% ते १३% पर्यंत वार्षकि परतावा देणाऱ्या या रोख्यांचा गुंतवणुकीसाठी जरूर विचार करावा. या खेरीज ज्या गुंतवणूकदारांना करमुक्त व्याज हवे असेल त्यांनी पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन, एनएचएआय, हुडको, आयआरएफसी इ. करमुक्त बॉँड्स बाजारातून खरेदी करावेत. बँकेतील मुदत ठेवी किंवा    कंपनीतील मुदत ठेव योजनापेक्षा ही गुंतवणूक कधीही चांगली. अर्थात इथेही अभ्यास आहेच. रोखे खरेदी करण्यापूर्वी त्याचे पतमापन, व्याजदर आणि व्याज देय तारीख तपासणे आवश्यक आहे.
क्रॉम्प्टन ग्रीव्हज् लिमिटेड
गेल्या वर्षभरात ४०% पेक्षा जास्त आपटी खाणारा हा शेअर गुंतवणुकीसाठी का सुचवतोय असा प्रश्न तुम्हाला पडणे साहजिक आहे. गेला काही काळ क्रॉम्पटनसाठी खरच कसोटीचा होता. परदेशात काही कंपन्या ताब्यात घेतल्यावर काही कंपन्यांची कामगिरी सुधरण्यासाठी त्यांची पुनर्बाधणी चालली आहे. युरोपमध्ये अजूनही मंदीचे वातावरण आहे त्यामुळे यंदाचे आर्थिक वर्ष कसोटीचे राहिले. कंपनीच्या नाशिक येथील प्रकल्पामध्ये आग लागल्याने देखील उत्पादनावर थोडा परिणाम झाला. परंतु हा वाईट कालावधी फार काळ राहणार नाही. गेल्या पांच वर्षांत क्रॉम्पटनने  बेल्जियममध्ये पौवेल्स, हंगेरीमध्ये गांझ तर नुकतीच झीव ही स्पॅनिश कंपनी ताब्यात घेतली. मंदीचा भर ओसरू लागल्यावर त्याची फळे क्रॉम्पटनला नक्कीच मिळतील. देशांतर्गतही ऊर्जा क्षेत्राचे महत्व आता सरकारला जाणवू लागल्याने येणारा कालावधी क्रॉम्पटनसारख्या कंपन्यांना चांगलाच असेल. सोबतच्या तक्त्यात दिलेले पी/ई गुणोत्तर सध्या आकर्षक वाटले तरीही ते गेल्या १२ महिन्यांच्या कालावधीसाठी आहे हे इथे लक्षात घ्यायला हवे. म्हणजेच मार्च २०१३ साठी संपलेले आर्थिक वर्ष कंपनीसाठी चांगले नसल्याने शेअरचा बाजार भाव हाच राहिल्यास पी/ई गुणोत्तर वाढेल. म्हणूनच यंदाचे आर्थिक निष्कर्ष जाहिर होईपर्यंत क्रॉम्प्टनवर लक्ष ठेवा आणि योग्यवेळी खरेदी करा. येत्या दोन वर्षांत हा शेअर तुम्हाला चांगलाच फायदा मिळवून देईल.

शेअरहोल्डिंग पॅटर्न                     (%)
प्रवर्तक                                           ४१.७
परदेशी गुंतवणूकदार                       १७.९       
बँका / म्युच्युअल फंडस्                 २१.८
सामान्यजन  व इतर                       १८.६

प्रवर्तक                                                       थापर समूह
सद्य बाजारभाव                                              रु. ९३.७०
प्रमुख उत्पादन                                          पॉवर ट्रान्समिशन  
भरणा झालेले भाग भांडवल                       रु. १२८.३० कोटी
पुस्तकी मूल्य :  रु.  ४१.९                           दर्शनी मूल्य : रु. २/-
प्रति समभाग उत्पन्न (ईपीएस)                रु. ७.२
प्राइस अर्निंग गुणोत्तर    (पी/ई)                  १३.६ पट
मार्केट कॅपिटल : रु. ६,१८० कोटी    बीटा :    १.४
गेल्या वर्षभरातील उच्चांक/ नीचांक     :     रु. १४८/ रु. ८८