|| जयंत विद्वांस

निवृत्ती नियोजनाची सुरुवात बहुतेक वेळा पन्नासाव्या वर्षांपासून सुरू होते. त्या सुमारास घर व इतर कर्जाचे हप्ते संपलेले असतात. मुले शिक्षणात आपल्या मार्गी लागलेली असतात. या टप्प्यापासून होणारी बचत निवृत्ती नियोजनासाठी विचारात घ्यायला सुरुवात होते. आपण आर्थिक नियोजन हे तज्ज्ञ व्यावसायिकाकडून करून घेत असाल, तरच वयाच्या तिसाव्या वर्षांपासूनच निवृत्ती नियोजनाचा विचार केला जातो.

निवृत्ती नियोजनाची गुंतवणूक करण्यापूर्वी आपला आर्थिक ताळेबंद मांडणे गरजेचे आहे. आपल्या सध्याच्या गुंतवणुका कशा आहेत, याचाही आढावा घेणे आवश्यक आहे. त्यानुसार नवीन गुंतवणुकांचे वर्गीकरण सोपे होईल. कंपन्या आपल्या वार्षिक अहवालात ज्या पद्धतीत बॅलन्स शीट देतात, त्याचप्रमाणे आपल्या मालमत्ता व दायित्वे यांचा लेखाजोखा सोबतच्या तक्त्याप्रमाणे मांडा. (तक्ता १ पाहा)

आर्थिक ताळेबंदाप्रमाणेच आपला सध्याचा खर्च व निवृत्तीनंतर अपेक्षित खर्च याची मांडणी करा. असे म्हणतात की, आपला निवृत्तीच्या सुमारास जो खर्च असतो, तो निवृत्तीनंतर ३० टक्कय़ांनी कमी होऊ शकतो; परंतु हे असे होईलच असे नाही. निवृत्तीनंतर वैद्यकीय व रुग्णालयाचा खर्च मोठय़ा प्रमाणावर वाढतो. मेडिक्लेम पॉलिसीद्वारे रुग्णालयाचा खर्च भरून मिळाला तरी नियमित औषधोपचारांचा खर्च आपल्यास करावा लागतो. (तक्ता २ पाहा)

महागाई विचारात घेताना सरसकट पाच टक्के वाढ विचारात घेतली जाते; परंतु औषधोपचाराचा खर्च, वाहन खर्च यात महागाई १२ टक्के ते १३ टक्के वाढत असते. पर्यटन/ हौसमौज यात १५ टक्कय़ांपेक्षा जास्त वाढ होत असते.

खर्चाचा आढावा घेताना आपल्या निवृत्तीच्या जीवनातील  वयाचे हे टप्पे विचारात घ्यावे लागतील –

  • ६०-७५ वर्षे
  • ७५-९० वर्षे
  • ९०-१०५ वर्षे
  • १०५-१२० वर्षे

या प्रत्येक टप्प्यावर आपली शारीरिक स्थिती विचारात घ्यावी लागते. त्यानुसार आपल्या व्यावसायिक उत्पन्नात बदल होतो. तसेच खर्च वाढत जातात. (मुख्यत्वे वैद्यकीय) ६० ते ७५ वर्षे वयादरम्यान आपली शारीरिक स्थिती चांगली असते. आपण या काळात निवृत्तीनंतरही कार्यरत राहून अर्थार्जन करू शकतो. ७५ ते ९० या टप्प्यावरसुद्धा काही काळ कार्यरत राहता येते. आपले अर्थार्जन जितका काळ पुढे नेता येईल त्याप्रमाणे पुढील दोन टप्प्यांत आपला खर्च भागवणे सहज शक्य होते.

  •  मोठे घर – खूपदा आपली मुले स्वतंत्र राहत असतात. त्यामुळे आपल्याला मोठय़ा घराची आवश्यकता नसते; पण त्या जागेचा खर्च वाढत असतो किंवा निवृत्तीनंतर आपण दुसऱ्या शहरात (किंवा ज्येष्ठालयात) राहावयास जातो त्या वेळेस यातील आर्थिक बाजू विचारात घ्याव्या लागतात. रॉबर्ट कियोसाकी हे भव्य मोठय़ा घरास ‘लायबिलिटी’ असे म्हणतात. तसेच गरजेपेक्षा मोठय़ा वाहनासही ‘अ‍ॅसेट’ न समजता ‘लायबिलिटी’ समजतात.
  •  कर्जे – निवृत्तीनंतर मिळणाऱ्या पुंजीमधून गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व कर्जे फेडून टाकावीत. तुमच्या गुंतवणुकांवर मिळणाऱ्या व्याजापेक्षा कर्जावरील व्याजदर हा नेहमीच जास्त असतो.
  •  अनपेक्षित खर्च – आजारपण/ अपघात यांसारख्या अनपेक्षित खर्चाची तरतूद स्वतंत्रपणे तरल गुंतवणुकीद्वारे करा.
  •   इतर जबाबदाऱ्या – मुलांची शिक्षणे किंवा लग्न यासाठी रक्कम सुनियोजित करून बाजूला काढा.
  • महिलांचे आयुर्मान पुरुषांपेक्षा नेहमीच जास्त असते. निवृत्तीसाठी आवश्यक असणारी पुंजी विचारात घेताना ही बाब विचारात घेणे महत्त्वाचे असते.
  •  दानधर्म – खूपदा निवृत्तीच्या सुमारास मिळणाऱ्या रकमेमधून सामाजिक उपक्रमांसाठी किंवा धार्मिक संस्थांसाठी रक्कम बाजूला काढून ठेवली जाते व नंतर उरलेली रक्कम गुंतविण्याचा विचार केला जातो. शक्यतो असे न करता, आपल्या इच्छापत्रात आपल्या पश्चात यासाठी तरतूद करून ठेवावी किंवा एकरकमी रक्कम सुरुवातीस न देता पुढील काळात आठ ते दहा वर्षांत विभागून द्यावी.

sebiregisteredadvisor@gmail.com

(लेखक सेबीद्वारे नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार व सीएफपी पात्रताधारक आहेत.)