News Flash

बाजाराचा  तंत्र-कल : परिघातील परिक्रमा

एशियन पेंटसच्या समभागाचा बाजारभाव तब्बल २,२०० रुपयांपर्यंत घसरला.

आशीष ठाकूर

वर्तुळ जिथून सुरू होते तिथेच संपते. वर्तुळ हे आपल्या आसाभोवतीच फिरत असते. आसाभोवती जो परीघ निर्माण होतो, त्या परिघातील परिक्रमा ही अतिशय शिस्तबद्ध असते. त्याचप्रमाणे हल्लीच्या दिवसांत निफ्टीची हालचाल ही अतिशय अचूक व शिस्तबद्ध दिसून येते. जसे की, गणिती कोष्टकाचा आधार घेत, वाचकांना अगोदर अवगत करून दिलेल्या १५,३३० ते १५,४३० च्या स्तरावरच निफ्टी निर्देशांकाचा उच्चांक होतो काय? आणि या उच्चांकावरून घसरण किती? याचा आपण पुरेपूर प्रत्यय घेतला. घसरणीचा ताजा इतिहास पाहता, निफ्टीवर हजार अंशांची संभाव्य घसरण होते हे गृहीतक आताच्या घडीला निफ्टीच्या उच्चांकावर वापरले असता १५,४३० मधून हजार अंश वजा करता १४,४३० चे खालचे लक्ष्य येते, जे सरलेल्या सप्ताहातील शुक्रवारच्या नीचांकाच्या समीप आहे. अशी ही निफ्टीच्या उच्चांक-नीचांकाची आखीवरेखीव वाटचाल, जसे की वर्तुळ आपल्या आसाभोवती फिरत आहे. तसेच मंदीत निफ्टी आपल्या हजार अंशांच्या परिघातच परिक्रमा पूर्ण करते, याची प्रचीतीही ती देऊन जाते. या पाश्र्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव:

सेन्सेक्स: ४९,८५८.२४

निफ्टी: १४,७४४

येणाऱ्या दिवसांत सेन्सेक्सवर ४८,५८६ आणि निफ्टीवर १४,३५० चा स्तर सातत्याने राखल्यास निर्देशांकांचे वरचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ५०,००० ते ५०,५०० आणि निफ्टीवर १४,८०० ते १४,९५० असे असेल. वरचे लक्ष्य साध्य झाल्यावर नफारूपी विक्री होऊन जी घसरण संभवते त्यात सेन्सेक्सने ४९,९६० आणि निफ्टीने १४,७५० चा स्तर राखणे नितांत गरजेचे आहे. हा स्तर राखण्यास निर्देशांक अपयशी ठरल्यास निर्देशांक पुन्हा सेन्सेक्सवर ४८,५८६ ते ४८,००० आणि निफ्टीवर १४,३५० ते १४,२०० पर्यंत खाली घसरू शकतो.

बाजारात शाश्वत तेजी ही आपल्या महत्त्वाच्या केंद्रबिंदू स्तरावर म्हणजे सेन्सेक्सवर ५१,००० आणि निफ्टीवर १५,००० च्या स्तरावरच येईल.

जाहीर झालेले कंपन्यांचे वित्तीय निकाल व त्यांचे विश्लेषण..

निर्देशांकाच्या उच्चांकावरून अपेक्षित घसरण सुरू असतानाच, कंपन्यांचे तिमाही वित्तीय निकाल निराशाजनक आल्यास, अशा वेळेस समभागाच्या बाजारभावात जी घसरण होते, त्यातून होणाऱ्या तोटय़ापासून गुंतवणूकदारांना सावध करण्याचे काम ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’ या संकल्पनेने केले का, त्याचा आज आढावा घेऊ या.

एशियन पेंट्स : रंग उत्पादनातील प्रथितयश, आघाडीची एशियन पेंटस लिमिटेडच्या तिमाही वित्तीय निकालाची नियोजित तारीख २१ जानेवारी होती. ८ जानेवारीचा बंद भाव २,८४४ रुपये होता. निकालापश्चात महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर हा २,७०० रुपये होता. निकालापश्चात २,७०० रुपयांचा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर तोडल्यामुळे गुंतवणूकदार खरेदीपासून परावृत्त झाले व यथावकाश लेखात नमूद केलेले २,५०० रुपयांचे खालचे लक्ष्य ११ फेब्रुवारीला साध्य झाले. नंतरच्या र्सवकष मंदीत एशियन पेंटसच्या समभागाचा बाजारभाव तब्बल २,२०० रुपयांपर्यंत घसरला. निकालापश्चात २,७०० ते २,२०० रुपयांच्या संभाव्य तोटय़ापासून गुंतवणूकदारांचे सरंक्षण झाले. आजही एशियन पेंट्स २,७०० रुपयांच्या महत्त्वाच्या केंद्रबिंदू स्तराखालीच असून १९ मार्चचा बंद भाव हा २,४१० रुपये आहे.

बायोकॉन लिमिटेड : या स्तंभातील १८ जानेवारीच्या लेखातील दुसरा समभाग हा बायोकॉन लिमिटेड होता. या समभागाचा १५ जानेवारीचा बंद भाव ४५६ रुपये होता. निकालापश्चात महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर हा ४५० रुपये होता. निकालादरम्यानच्या काळात सहयोगी कंपनीच्या संचालकांनी संचालक मंडळातून राजीनामा व निराशादायक निकाल याचा एकत्रित परिणाम बायोकॉन लिमिटेडने ४५० रुपयांचा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर तोडत, समभाग मंदीच्या गर्तेत सापडून समभाग ४५६ वरून ३६३ रुपयांपर्यंत कोसळला. आता बायोकॉन ही आघाडीची, प्रथितयश अशी औषध कंपनी, पण एकदा का निकालापश्चात महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर तोडला की.. समभाग स्वस्तात मिळतो, अध्र्या किमतीत मिळतो म्हणून आम्ही समभाग खरेदी करतो, आम्ही समभाग खरेदी केल्यानंतर तो समभाग आणखी स्वस्त होतो. अशा दुष्टचक्रातून सुटका नाही, मग भले ती प्रथितयश औषध कंपनी असो, याची परिणती त्या औषध कंपन्यांची औषधेच गुंतवणूकदारांना आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी घ्यावी लागतात. आजही बायोकॉन लिमिटेड ४५० रुपयांच्या महत्त्वाच्या केंद्रबिंदू स्तराखाली असून १९ मार्चचा बंद भाव हा ३९५ रुपये आहे.

लेखक भांडवली बाजार विश्लेषक

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’, इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2021 12:03 am

Web Title: stock market technical analysis technical analysis of stocks zws 70 2
Next Stories
1 रपेट बाजाराची : सावध पवित्रा
2 फंडाचा ‘फंडा’.. : फंड क्षितिजावरील ‘वॉशिंग्टन सुंदर’!
3 गोष्ट रिझर्व्ह बँकेची : रिझर्व्ह बँक स्थापनेस गोलमेज परिषदांतून चालना
Just Now!
X