प्रल्हाद बोरसे – borsepralhad@gmail.com

यंत्रमागाचे शहर. मोठय़ा प्रमाणावर स्थिरावलेल्या व्यवसायामुळे मालेगावला मिळालेली ओळख. इतका उमदा जम बसवूनही या व्यवसायास आधुनिकतेची झळाळी लाभू शकली नाही. पारंपरिक पद्धतीला कवटाळण्याची उद्योजकांची मानसिकता, दुसरीकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव. शिवाय प्रशासकीय अनास्था आणि जातीय दंगलीच्या इतिहासामुळे बदनामीचा कलंकही. त्यामुळे मालेगावकडे बाहेरच्या मोठय़ा उद्योगपतींचीही पाठ फिरलेलीच. म्हणजे अनेकांना रोजगार देणारा उद्योगधंदा तर आहे, तरी लौकिक अर्थाने औद्योगिक विकासापासून कोसो मैल दूर अशी या शहराची विचित्र स्थिती. परंतु अशा प्रतिकूलतेच्या नावाने बोटे न मोडता नावीन्याचा शोध घेत काही स्थानिकांचा आपापल्या परीने विकास साधण्यासाठी धडपडही सुरू राहिली. यातून या शहराची निर्माण झालेली नकारात्मक प्रतिमा पुसण्यास मदत होत आहे. इतकेच नव्हे अलीकडच्या काही वर्षांत आशादायी चित्रही निर्माण होताना दिसत आहे. शहराजवळील निळगव्हाण शिवारातील एम. बी. शुगर अ‍ॅण्ड फार्मास्युटिकल्स लिमिटेड या उद्योगाबाबतही असेच म्हणावे लागेल.

औषधी साखर निर्मितीच्या क्षेत्रात या कंपनीची झालेली भरभराट खचितच वाखाणण्याजोगी आहे. उत्तम दर्जा आणि विश्वासार्हतेची जपणूक या गुणवैशिष्टय़ांमुळे कंपनीच्या उत्पादनांचा देश-विदेशात दबदबा निर्माण झाला आहे. सातासमुद्रापार पोहोचलेल्या या औषधी साखरेच्या गोडव्यामुळे मालेगावचाही नावलौकिक वाढत आहे.

मालेगावातील प्रसिद्ध व्यापारी भागचंदशेठ लोढा हे एकेकाळी चॉकलेटसाठी प्रसिद्ध रावळगाव येथील साखर कारखान्याचे प्रमुख वितरक होते. साखर विक्री क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवानंतर आपण स्वत:च खडीसाखर निर्मिती करावी, असा निर्धार त्यांनी केला. विजयकुमार, दिनेशकुमार आणि अनिलकुमार या त्यांच्या तिघा मुलांनी हा निर्धार सत्यात उतरविण्यासाठी कंबर कसली. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली १९९१ मध्ये ३० लाखांची प्राथमिक गुंतवणूक करत एम. बी. केमिकल्स नावाने कंपनीची सुरुवात झाली. अल्पावधीतच या कंपनीत उत्पादित होणाऱ्या उच्च दर्जाच्या खडीसाखरेचा सर्वत्र बोलबाला सुरू झाला. भारतातील तिरुपतीसह वेगवेगळ्या प्रसिद्ध देवस्थानांच्या ठिकाणी प्रसाद म्हणून लागणाऱ्या खडीसाखरेची गरज यानिमित्ताने मालेगावातून पूर्ण होऊ  लागली. भारताबाहेर अमेरिका, श्रीलंका आदी देशांमध्येदेखील ही खडीसाखर निर्यात होऊ  लागली. खडीसाखरेचे उत्पादन ते विपणन अशा सर्वच आघाडय़ांवर आलेख उंचावलेला असताना, १९९७ मध्ये काळाची पावले ओळखत कंपनीने औषधी साखर निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले. खरे तर खडीसाखर उत्पादन क्षेत्रातील नावलौकिक विचारात घेता औषध निर्मिती करणाऱ्या रॅनबॅक्सी या प्रसिद्ध बहुराष्ट्रीय कंपनीनेच तेव्हा औषधी साखर निर्मिती करण्यास एम. बी. केमिकल्सला उद्युक्त केले. वेगवेगळी औषधे उत्पादित करण्यासाठी लागणाऱ्या विशिष्ट औषधी साखरेची गरज एम. बी. उद्योग हमखास पूर्ण करेल, असा विश्वास टाकतानाच या बहुराष्ट्रीय कंपनीने आधीच मागणीदेखील नोंदवली. एम. बी. केमिकल्स ही कंपनी ओघानेच ‘एम. बी. शुगर अ‍ॅण्ड फार्मास्युटिकल्स लिमिटेड’ या कंपनीत परावर्तित झाली. रॅनबॅक्सीचा सल्ला आणि मार्गदर्शनाखाली प्रत्यक्षात औषधी साखरेची वेगवेगळी उत्पादने सुरू झाली.

रॅनबॅक्सीसारख्या नामांकित बहुराष्ट्रीय औषध कंपनीची पुरवठादार म्हणून ओळख मिळाल्याने कंपनीच्या नावलौकिकात भर पडू लागली. साहजिकच औषधे निर्मिती करणाऱ्या अन्य कंपन्यांकडूनही एम. बी. उद्योगाच्या उत्पादनांना मागणी वाढू लागली. नवी कंपनी सुरू झाल्यानंतर पुढच्याच वर्षी म्हणजे १९९८ मध्ये गोव्यातील एका प्रसिद्ध जर्मन औषध कंपनीने चक्क शंभर मेट्रिक टन औषधी साखरेची मागणी नोंदवली. त्यानंतर वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी कंपनीला वेळोवेळी उद्योग विस्ताराचे धोरण अवलंबून उत्पादन क्षमतेत वाढ करावी लागली. खडीसाखरेऐवजी आता तेथे पूर्ण क्षमतेने औषधी साखरेची निरनिराळी उत्पादने घेतली जात आहेत. हे करीत असताना या उत्पादनांची उच्चतम गुणवत्ता कायम राखण्यासाठी काटेकोरपणे लक्ष पुरविले जात आहे. त्या अनुषंगाने उच्च तंत्रज्ञानावर आधारित उभारलेल्या प्रयोगशाळेद्वारे वेळोवेळी पृथक्करण करण्यावर भर दिला जात आहे. वाढत्या मागणीनुसार पुरवठय़ाचा काटेकोरपणे समतोल साधला जात असल्याने कंपनीची उत्तरोत्तर भरभराट सुरू आहे. आजमितीस भारतासह ऑस्ट्रेलिया, रशिया, संयुक्त अरब अमिरात, युक्रेन अशा ठिकाणी या औषधी साखरेची निर्यात केली जात आहे.

निरनिराळ्या औषधांच्या निर्मितीसाठी घटक म्हणून औषधी साखरेचा वापर केला जातो. या औषधी साखरेचे वेगवेगळे प्रकार अस्तित्वात आहेत. त्यातील काही प्रकार सध्याच्या घडीला भारताला आयात करावे लागतात. मात्र नजीकच्या काळात ही अडचण दूर करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. अलीकडेच उद्योग विस्ताराचे काम कंपनीने हाती घेतले आहे. त्यासाठी इटली आणि फ्रान्स देशातील उच्च तंत्रज्ञानावर आधारित यंत्रसामग्री मागविण्यात आली आहे. यंत्रसामग्री उभारणीचे हे काम पूर्ण झाले की, आयात कराव्या लागणाऱ्या औषधी साखरेच्या प्रकारांमधील काही प्रकारांचे उत्पादन घेणे येथे शक्य होणार आहे. औषधे बनविण्यासाठी ज्या औषधी साखरेच्या उत्पादनांची आज आयात करावी लागते, त्यातील काही उत्पादने भारतात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न यानिमित्ताने पहिल्यांदाच होत असल्याचा या कंपनीचा दावा आहे.

साखरेच्या विक्री व्यवसायातून अशा प्रकारे उत्पादक कंपनीत झालेल्या यशस्वी पदार्पणासाठी दिवंगत भागचंदशेठ लोढा यांची दूरदृष्टी व व्यावसायिक अनुभव कामी आला. त्यांच्या निधनानंतर कंपनीचा हा गाडा चालविण्यासाठी त्यांचे पुत्र विजयकुमार, दिनेशकुमार आणि अनिलकुमार या तिघा भावांना त्यांचे पुत्र अनुक्रमे सम्यक, सौरभ आणि ऋषभ हे नव्या दमाचे तिघे तरुण मोलाची साथ देत आहेत. हे सहाही जण उच्चविद्याविभूषित असून त्या ज्ञानाचा या उद्योगासाठी ते आवर्जून उपयोग करून घेताना दिसत आहेत. सांघिक पद्धतीने आणि जबाबदारी वाटून प्रत्येक जण आपापला कार्यभाग पार पाडत आहेत. त्याद्वारे या उद्योगाला यशाच्या उत्तुंग शिखरावर नेऊन ठेवण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे.

विजयकुमार / दिनेशकुमार / अनिलकुमार लोढा             

एम. बी. शुगर अ‍ॅण्ड फार्मास्युटिकल्स लिमिटेड, मालेगाव

’ व्यवसाय :    औषधी साखर (फार्मा शुगर)

’ कार्यान्वयन : १९९७  साली

’ प्राथमिक गुंतवणूक     : २.५० कोटी

’ सध्याची उलाढाल             : वार्षिक ११० कोटी रुपये

’ रोजगार निर्मिती :  ४५० पूर्णवेळ कामगार

’ अर्थसाहाय्य :  नाशिक जिल्हा महिला सह. बँक, नाशिक र्मचट्स सह. बँक, डेव्हलपमेंट बँक ऑफ सिंगापूर

’ संकेतस्थळ : www.mbsugar.com

आपणासही या सदरासाठी नवउद्योजकाची शिफारस, सूचना ई-मेल: arthmanas@expressindia.com वर कळविता येईल.