लक्ष्मण राऊत 

एखादे उत्पादन खरेदी करताना ग्राहक आधी दर्जा पाहतो की त्यावरचे आवरण. ते उत्पादन कोणत्या वेष्टनात गुंडाळले आहे; ते किती आकर्षक आहे यावर त्याची बाजारपेठेतील किंमत ठरते. एखादा बिस्किटाचा पुडा केवळ आवरणावरील चेहऱ्यामुळे अनेक वष्रे लक्षात राहतो. अर्थात उत्पादनाचा दर्जाही बाजारपेठेत अस्तित्व टिकवून ठेवण्यास आवश्यक असतो; पण उत्पादनाचे पॅकेजिंग हा स्वतंत्र व्यवसाय. या क्षेत्रात अनेक बदल येत गेले. प्लास्टिक कागदावर छपाई करण्यापासून ते उत्पादनाचे रूप अधिक खुलविणाऱ्या या क्षेत्रात एस. के चौधरी हे नाव मराठवाडय़ात महत्त्वपूर्ण मानले जाते.

कष्ट, जिद्द आणि संयम या जोरावरच उद्योजक होता येते. हे तिन्ही गुण अंगी बाळगल्यानेच औरंगाबादचे एस. के. म्हणजे संतोष कौतिक चौधरी यशस्वी होऊ शकले. चाळीसगावच्या तळवाडे पेठ या गावात १९४३ मध्ये त्यांचा जन्म झाला. वडील शेतमजूर. जन्मगाव तसे लहानसे खेडे. गाई-म्हशी, शेळ्या-मेंढय़ा चारणे, दूध काढणे अशी शेतीतील कामे करीत त्यांनी सातवीपर्यंत शिक्षण घेतले. पुढे वाणिज्य शाखेचे पदवीधर झाले. रविवारच्या बाजारात ते आगपेटय़ा ओरडून  विक्री करत. डोक्यावर रॉकेलचा डबा घेऊन ते विकत. काळ खडतर, पण त्यातून त्यांना बाजारपेठेची ओळख झाली. शिक्षण चालू असताना त्यांना रेल्वे आणि नंतर महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळात नोकरी लागली. या नोकरीच्या निमित्ताने त्यांचा स्थानिक उद्योजकांशी संपर्क आला आणि त्यामधून त्यांच्या बंधूबरोबर भागीदारीमध्ये स्टेनलेस स्टील भांडी उद्योगाचा शुभारंभ झाला. हा उद्योग १९८२ मध्ये सुरू झाला. भागीदारी काही फार काळ टिकली नाही; परंतु त्यामुळे एस. के. चौधरी यांचा उद्योगातील मार्ग अधिक सुकर होत गेला. १९९२ मध्ये त्यांनी वित्तीय महामंडळातील नोकरीचा राजीनामा दिला आणि कुटुंबातील सदस्यांना बरोबर घेऊन त्यांनी औरंगाबाद येथे वेगवेगळे आठ-नऊ उद्योग सुरू केले.

त्यांच्या कुटुंबात १९८४ मध्ये स्वतंत्ररीत्या मराठवाडय़ातील पहिला प्रिन्टेड पॉलिथिन बॅगनिर्मितीचा उद्योग सुरू झाला. अ‍ॅल्युमिनियम फॉइल विविध रंगांत छपाईच्या लवचीक पॅकिंग उद्योगाचे त्यांच्या लहान बंधूने अहमदाबाद येथे सहा महिने प्रशिक्षण घेतले होते. वित्तीय महामंडळातील नोकरी सोडल्यानंतर १९९४ मध्ये आपला मुलगा सुभाष याच्यासह भागीदारी करून ‘सनराइज इंडस्ट्रीज’ची सुरुवात केली. औषधी गोळ्या, कृषी साहित्य, मसाले, लोणचे इत्यादी पॅकेजिंगकरिता प्लास्टिक आणि अ‍ॅल्युमिनियम फॉइलवरील छपाईपुरतेच तंत्रज्ञान मर्यादित असल्यामुळे या उद्योगाच्या निमित्ताने एस. के. चौधरी यांनी पॉलिस्टर बायोऑक्साइड पॉलीप्रॉपलीनआधारित पॅकिंग साहित्यनिर्मिती क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर मुलगा संजय याच्या पाठीशी उभे ठाकत त्यांनी शेंद्रा औद्योगिक वसाहतीमध्ये ‘संज्योत पॉली प्रॉडक्ट्स’ या उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली. पॉली फिल्मपासून लॅमिनेशन, दुधाच्या पिशव्या इत्यादी अनेक बाबींसाठी लागणारे उत्पादन करणारा हा उद्योग आहे.

भावाबरोबर केलेली पहिली भागीदारी तशी फारशी टिकली नाही. उलट हताश न होता, नवीन उद्योगात पाय रोवण्याचा हाच संघर्षांचा काळ होता. ‘सनराइज’ प्रारंभीची तीन-चार वष्रे कठीण आणि खडतर होती. प्रश्न कुशल आणि तज्ज्ञ कामगारांचा होता. यंत्रसामग्री नवीन होती, पण हवे त्या दर्जाचे उत्पादन काही होत नव्हते. ही समस्या सोडविण्यासाठी काय करावे यासाठी चौधरी यांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या. कामगार घडवावा लागेल, असे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी त्या दृष्टीने हालाचाली सुरू केल्या. यंत्रणा आणि कामगार यांचा ताळमेळ जमण्याचा हा कालावधी दीड ते दोन वर्षांचा होता. पुढे दर्जेदार उत्पादनांच्या हाताळणीची प्रक्रिया कामगारांच्या अंगवळणी पडू लागली. याच काळात आर्थिक अडचणीही वाढत होत्या. उद्योगासाठी राज्य सरकारकडून मिळणारे बीजभांडवलही लवकर मिळाले नाही. ही रक्कम मिळण्यास उशीर लागेल असे गृहीत धरले होते. मात्र, उत्पादन दर्जा आणि आणि आर्थिक आघाडीवर दोन्ही बाजूंनी संकट होते. परिणामी घेतलेल्या कर्जाचे हप्ते, त्याचे व्याज थकले. पुढे पाठपुरावा करून बीजभांडवल मिळाले आणि कामगारही यंत्रांना सरावला. परिणामी उद्योग सुकर बनला. घरातील इतर सदस्यांच्या उद्योगामध्येही अडचणी येत गेल्या. मात्र, नियोजन करत त्यांनी त्यावर मात केली. उद्योग सुरू करणे सोपे असते, पण तो यशस्वीरीत्या चालविणे वाटते तितके सापे नसते, असे चौधरी मानतात.

केवळ प्लास्टिक नाही तर विविध फिल्मच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना उद्योजकांना लागणारा माल पुरविण्याचे कामही त्यांच्या दोन कंपन्यांमधून केले जात आहे. विशेषत. औषधांच्या पॅकेजिंगमध्ये तसेच विविध उत्पादनाच्या पॅकेजिंगमध्ये काम करत उभारण्यात आलेल्या दोन कंपन्यांचा पसारा आता वाढू लागला आहे.

‘संज्योत पॉली प्रॉडक्ट्स’ आणि ‘सनराइज इंडस्ट्रीज’ या दोन्ही उद्योगांची धुरा आता त्यांची मुले सांभाळत आहेत. याव्यतिरिक्त पाच उद्योग त्यांच्या परिवारातील सदस्यांकडून चालविले जातात. केवळ उद्योग उभारणे एवढेच न करता उद्योग संघटनांमध्येही त्यांनी महत्त्वाच्या पदावर काम केले. २००३ मध्ये त्यांना (आयएवायई इंडस्ट्रीज असोसिएशन ऑफ यंग इन्टरप्राइजेस) या संघटनेच्या मानद महासचिवपदी काम करण्याची संधी मिळाली. त्याचबरोबर मराठवाडा स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अ‍ॅन्ड अ‍ॅग्रिकल्चर असोसिएशन (मसिआ) संघटनेचे अध्यक्षपदही भूषविले. उद्योजकांचे विदेश दौरे, प्रदर्शने, उद्योजकांचा सहकारी गृहनिर्माण संस्था यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला. महाराष्ट्र वित्तीय महामंडळाच्या नोकरीत असताना तेथील कर्मचारी संघटनेच्या औरंगाबाद विभागाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम केले होते. वित्तीय महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष  जे. तल्यारखान यांच्या उपस्थितीत कर्मचारी महामंडळाचे अधिवेशनही त्यांच्या पुढाकारानेच झाले होते.

वडिलांच्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये संसाराचा गाडा चालविण्यासाठी त्यांनी खूप मेहनत केली. तीन भाऊ, चार बहिणींना सांभाळून मोठे करण्यात त्यांच्या आईचा मोठा वाटा होता. आजही वयाच्या ७७ व्या वर्षी ते दोन्ही कंपन्यांच्या कारभारावर बारकाईने लक्ष ठेवून असतात.

एस. के. चौधरी

* सनराइज इंडस्ट्रीज, चिकलठाणा

* संज्योत पॉलीप्रॉडक्ट्स, शेंद्रा

* व्यवसाय : विविध प्रकारचे पॅकेजिंग

* कार्यान्वयन : १९९४ साली

* प्राथमिक गुंतवणूक : ३० लाख रुपये

* सध्याची वार्षिक उलाढाल : सनराइज इंडस्ट्रीज- ८ कोटी रुपये, संज्योत पॉलीप्रॉडक्ट्स – १० कोटी रुपये

* रोजगार निर्मिती : ७० (दोन्ही कंपन्या मिळून) एस. के. चौधरी आणि त्यांच्या कंपन्यांचे मराठवाडय़ातील दोन अत्याधुनिक प्रकल्प.

आपणासही या सदरासाठी नवउद्योजकाची शिफारस, सूचना ई-मेल: arthmanas@expressindia.com वर कळविता येईल.