अतुल कोतकर atul@sampannanivesh.com

भारताने मुक्त आर्थिक धोरण स्वीकारण्यापूर्वी शेती हा सकल राष्ट्रीय उत्पादनाचा प्रमुख आधारबिंदू होता. मुक्त आर्थिक धोरणानंतर औद्योगिक उत्पादनाच्या संधी वाढून रोजगार उपलब्ध होतील हे अभिप्रेत होते. परंतु कुशल मनुष्यबळाची उणीव असल्याने आपण सेवा क्षेत्रात मोठी झेप घेतली. त्यामुळेच अर्थव्यवस्थेच्या उत्पादन, सेवा आणि शेती यापैकी, भारतात सेवा क्षेत्रात गुंतवणुकीच्या विपुल संधी उपलब्ध आहेत. म्हणूनच सेवा क्षेत्रात गुंतवणूक करणारा सुंदरम सव्‍‌र्हिसेस फंड हा करोनापश्चात ‘न्यू नॉर्मल’चा लाभार्थी निश्चितच म्हणता येईल.

भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात मोठा वाटा असलेले प्रबळ सेवा क्षेत्र हे मोठय़ा प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देणारेही क्षेत्र आहे. रोजगारनिर्मितीसोबत, आदरातिथ्य, माहिती तंत्रज्ञान आणि बौद्धिक संपदा यासारख्या क्षेत्रांचा देशाला आवश्यक असलेले परकीय चलन निर्यातीच्या माध्यमातून मिळविण्यात मोठा वाटा आहे. सुंदरम सव्‍‌र्हिसेस फंडाने देशांतर्गत आणि निर्यातीत वाटा असलेल्या कंपन्यांत गुंतवणूक केली आहे. निधी व्यवस्थापक विविध सेवा क्षेत्रांतील आणि कंपन्यांत उपलब्ध असलेल्या संधींचा शोध विश्लेषणाच्या माध्यमातून घेतात.

कंपनीची मागील कामगिरी आणि भविष्यातील व्यवसाय विस्ताराच्या संधी, आर्थिक सुदृढता, स्पर्धात्मक परिस्थिती, व्यवस्थापकीय गुणवत्ता आणि अल्पसंख्याक भागधारकांचे हित जपण्याविषयीचे धोरण आणि पारदर्शकता याचा विचार करून सेवा क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कंपन्यांची निवड करतात. फंडाने अरविंद फॅशन (वस्त्र दालन), अ‍ॅव्हेन्यू सुपरमार्ट (ग्राहकोपयोगी वस्तू विक्री शृंखला), महिंद्रा हॉलिडेज (आदरातिथ्य), माइंडट्री (माहिती-तंत्रज्ञान निर्यात), बजाज फायनान्स (वित्तपुरवठा) यासारख्या बहुविध सेवा देणाऱ्या कंपन्यांत गुंतवणूक केली आहे.

कोविडपश्चात ‘न्यू नॉर्मल’मध्ये भारतातील सेवा क्षेत्राचे चित्र खूपच आशादायक दिसत आहे. सुंदरम सव्‍‌र्हिसेस फंड या संधीचा लाभ गुंतवणूकदारापर्यंत पोहोचविण्यास सुयोग्य साधन आहे. मध्यम ते तीव्र जोखीम असलेल्या आणि दीर्घ काळात भारतातील सेवा क्षेत्रातील संधींचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांनी एकूण पोर्टफोलिओच्या १० ते १५ टक्के गुंतवणुकीसाठी सुंदरम सव्‍‌र्हिसेस फंडाचा पर्याय निवडण्यास हरकत नसावी.

सुंदरम सव्‍‌र्हिसेस फंड

* फंड गट समभाग (थिमॅटिक)

* फंडाची सुरुवात २१ सप्टेंबर २०१८

* फंड मालमत्ता १,२८६ कोटी (३१ डिसेंबर २०२०)

* मानदंड एस अ‍ॅण्ड पी बीएसई २०० टीआरआय

भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात सेवा क्षेत्राचा ५० टक्क्यांहून अधिक वाटा आहे. साहजिकच विपुल गुंतवणूक संधी असल्याने समभाग निवडीत लवचीकता साधणारा हा फंड प्रत्येक गुंतवणूकदाराच्या पोर्टफोलिओत नक्कीच असायला हवा. नावीन्याची कास धरणारा हा फंड इतरांपेक्षा आपले वेगळेपण सिद्ध करतो.

सुनील सुब्रमणियम

मुख्य कार्यकारी अधिकारी, सुंदरम म्युच्युअल फंड