|| भालचंद्र जोशी

दरमहा १०,००० रुपये ‘एसआयपी’ गुंतवणुकीवर विमा संरक्षण

म्युच्युअल फंडात ‘एसआयपी’द्वारे गुंतवणूक करताना विमा या सेवेबद्दल आज आपण या लेखाद्वारे जाणून घेऊया. सामान्यपणे आपण आपले आयुष्य सुरक्षित करण्यासाठी विमा खरेदी करतो. पण आपण म्युच्युअल फंडात एसआयपीद्वारे गुंतवणूक करून आपली आर्थिक उद्दिष्टे साध्य करताना आपल्याला गुंतवणुकीबरोबर विमासुद्धा देऊ  केला जातो. ‘एसआयपी’च्या कार्यकाळात गुंतवणूकदाराच्या दुर्दैवी निधनानंतर नामनिर्देशित व्यक्तीला विम्याची रक्कम दिली जाते, त्यामागचा उद्देश गुंतवणूकदारांच्या मृत्यूच्या दुर्दैवी घटनेतही गुंतवणूकदाराच्या कुटुंबाला विम्याचा लाभ मिळेल.

‘एसआयपी’ गुंतवणूकदारांना दिलेले हे विमा संरक्षण ठरावीक फंड घराण्यांच्या निवडक योजनांसाठी उपलब्ध आहे आणि ते गुंतवणूकदाराने केलेल्या मासिक गुंतवणुकीच्या थेट प्रमाणात उपलब्ध आहे. या वैशिष्टय़ांतर्गत गुंतवणूकदाराला संपत्ती संचय करण्याबरोबरच जीवनातील अनिश्चिततेसाठी संरक्षण दिले जाते.

विमा संरक्षणासह योजना

  • म्युच्युअल फंड गुंतवणूकदारासाठी ही पूर्णपणे अतिरिक्त सेवा योजना आहे. जेवढी अधिक गुंतवणूक जास्त काळासाठी कराल, तेवढे अधिक विमा संरक्षण मिळेल. यामुळे अप्रत्यक्षरीत्या त्यांच्या संपत्ती संचयाच्या शक्यतेत वाढ होते.
  • गुंतवणूकदाराला एक विशेष सेवा देणे हा यामागचा उद्देश आहे.
  • दीर्घ कालावधीसाठी नियमित गुंतवणूक करणे ही अतिशय चांगली सवय आहे आणि दीर्घ मुदतीची आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी नियमित गुंतवणूक केल्याबद्दल हे विमा संरक्षण म्हणजे एक प्रकारचे सुरक्षा कवच आहे. हे वैशिष्टय़ म्हणजे अ‍ॅड-ऑन पर्याय आहे आणि तेसुद्धा कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय.
  • अशा विमा संरक्षणासाठी प्रीमियम हा फंड घराण्यांद्वारे भरला जातो.

ही योजना कशी काम करते?

‘एसआयपी’च्या माध्यमातून गुंतवणूक करणाऱ्या आपल्या गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंड घराण्यांद्वारे जीवन विम्याची अधिकची सुविधा पुरविली जाते. हे काही ठरावीक अटींच्या अधीन आहे जसे हे गट विमा संरक्षण असेल. त्याचबरोबर, एसआयपीचा कालावधी किमान ३६ महिन्यांसाठी असला पाहिजे आणि ही सुविधा फंड घराण्यांच्या फक्त निवडक योजनांसोबत उपलब्ध असेल. हे संरक्षण पहिल्या वर्षी मासिक एसआयपीच्या १० पट असेल, ज्यात दुसऱ्या वर्षी २० किंवा ५० पट इतकी वाढ होते आणि त्यानंतर तिसऱ्या वर्षांपासून १०० किंवा १२० पट वाढ होते. फंड घराण्यांना प्रदान करता येणाऱ्या कमाल संरक्षणाला मर्यादा आहेत. काही कारणास्तव ‘एसआयपी’ची रक्कम भरता नाही आली तर हे विमा संरक्षण ताबडतोब खंडित होते. त्यामुळे आर्थिक शिस्त असणे अतिशय जरुरीचे आहे.

या अ‍ॅड-ऑन वैशिष्टय़ासाठी पात्र ठरण्यासाठी गुंतवणूकदारासाठी वयोमर्यादा ही पहिल्या गुंतवणुकीच्या वेळी १८ वर्षांपेक्षा अधिक अशी आहे. त्याशिवाय, फंड घराण्याने निश्चित केलेली कमाल वयोमर्यादा गुंतवणूकदाराने ओलांडल्यास तो या सुविधेसाठी अपात्र ठरतो.

शेवटी, तुम्ही केवळ मोफत जीवन संरक्षणासाठी योग्य म्युच्युअल फंड घराण्याची किंवा योजनेची निवड करावी काय? तर नव्हे, दीर्घ मुदतीत चांगल्या कामगिरीचा पूर्वइतिहास असलेल्या योजनेचीच नेहमी निवड करा की ज्यामुळे तुमचे आर्थिक उद्दिष्टे साध्य होतील आणि विम्याचे आर्थिक सुरक्षा कवचसुद्धा प्राप्त होईल. त्याचबरोबर हेदेखील लक्षात ठेवा की अशा ‘एसआयपी विमा’ योजनेत फक्त मर्यादित जीवन संरक्षण उपलब्ध असते.

(लेखक गेली २७ वर्षे बँकिंग आणि आर्थिक सेवा क्षेत्रात कार्यरत असून, सध्या रिलायन्स म्युच्युअल फंडात गुंतवणूकदार सेवा आणि ऑपरेशन्स विभागाचे प्रमुख आहेत.)

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.