नीतिनियम म्हटले की, ‘चाणक्य नीती’चा पहिला संदर्भ येतो. ‘आर्य चाणक्य’ यांना भारतात नीती आणि अर्थशास्त्राचे गुरू मानले जाते. त्यांनी, नीती व अर्थशास्त्रावर मांडलेले सिद्धांत आणि नियम अजूनही शाबूत असून त्याचा अभ्यास केला जातो व ते नीतिनियम पाळलेही जातात.
आजच्या भागात ‘टाटा एथिकल – इक्विटी डायव्हर्सिफाइड फंड’विषयी माहिती करून घेऊ. जो ‘शरीया नीतिनियमां’वर आधारित फंड आहे.
टाटा एथिकल फंडाची खासियत अशी की, निधी व्यवस्थापक वेगवेगळ्या औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये निधी गुंतवितात, ज्यांच्या ताळेबंदात कर्जाचे प्रमाण कमी असेल आणि कंपन्यांचे कामकाज व व्यवहार चांगले व नैतिकतेला धरून असतील. अर्थात मद्य उत्पादक कंपन्या, चर्मोद्योग कंपन्या, जुगार खेळांवर आधारित कंपन्या, कर्ज देणाऱ्या कंपन्या (बँका) असे उद्योगक्षेत्र फंडातून गुंतवणुकीसाठी नियमानुसार वगळले जातात.
निधी व्यवस्थापक अर्थव्यवस्थेचा तसेच वेगवेगळ्या औद्योगिक क्षेत्राच्या विकासाचा अभ्यास करून त्या त्या औद्योगिक क्षेत्रातल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये योग्य त्या गुणोत्तर प्रमाणात निधी गुंतवितात. बाजारातील तेजी-मंदीचा आधार घेऊन यात वेळोवेळी बदलही केले जातात. जर फंडातील एक औद्योगिक क्षेत्र खराब कामगिरी करीत असेल तर निधी व्यवस्थापक त्याच फंडातील दुसऱ्या भविष्यात चांगली कामगिरी करणाऱ्या औद्योगिक क्षेत्रात अधिक निधी गुंतवून चांगला परतावा देण्याचा प्रयत्न करतात. हा फंड २४ मे १९९६ रोजी पुनर्खरेदीसाठी खुला झाला. ३१ डिसेंबर २०१२ रोजी या फंडाची गुंतवणूकयोग्य मालमत्ता (गंगाजळी) ११०.६० कोटी रुपये होती. या फंडातील किमान गुंतवणूक रु. ५००० इतकी निश्चित करण्यात आली आहे. प्रदीप गोखले हे या फंडाचे निधी व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. फंडाच्या परताव्याच्या तुलनेसाठी एनएसई सीएनएक्स ५०० हा निर्देशांक मानदंड म्हणून ठरविण्यात आला आहे. फंडात गुंतवणूक केल्यापासून एक वर्षांत गुंतवणूक काढून घेतल्यास १ टक्का इतके निर्गमन शुल्क आकारले जाते.
ज्यांना डायव्हर्सिफाइड फंडांविषयी उत्सुकता आहे त्यांनी या फंडात ‘एसआयपी’द्वारे गुंतवणूक करावी. पुढे या फंडाचा मागील एक वर्षांचा तौलनिक परतावा आणि निधी गुंतवणूक क्षेत्रे दिली आहेत.