प्रवीण देशपांडे pravin3966@rediffmail.com

विवरणपत्र भरणाऱ्यांची संख्या मागील काही वर्षांत दुपटीने वाढली असली तरी एकूण लोकसंख्येच्या मानाने याचे प्रमाण अद्याप खूप कमी आहे. विवरणपत्र दाखल न करणाऱ्या करदात्यांसाठी मागील वर्षांपासून बँकेतून ठरावीक रकमेपेक्षा जास्त पैसे काढल्यास जास्त दराने उद्गम कर कापण्याची तरतूद करण्यात आलेली होती. अशीच तरतूद प्राप्तिकर कायद्यात ‘२०६ एबी’ आणि ‘२०६ सीसीए’ ही दोन कलमे जोडून करण्यात आलेली आहे. या कलमानुसार निर्दिष्ट व्यक्तींचा गोळा करावयाचा कर (टीसीएस) आणि उद्गम कर (टीडीएस) हा जास्त दराने कापला जाणार आहे. ही तरतूद १ जुलै २०२१ पासून लागू झाली आहे. या निर्दिष्ट व्यक्ती कोण? किती जास्त दराने कर गोळा केला जाणार किंवा उद्गम कर कापला जाणार? वगैरे माहिती या लेखात दिली आहे.

प्राप्तिकर कायद्याच्या ‘कलम २०६ एबी’नुसार निर्दिष्ट व्यक्तींचा उद्गम कर किंवा ‘कलम २०६ सीसीए’नुसार गोळा करावयाचा कर खालीलपैकी जे जास्त आहे अशा दराने कापावा किंवा गोळा करावा लागेल:

१. प्रचलित दराच्या दुप्पट दराने

२. किंवा ५ टक्के दराने

निर्दिष्ट व्यक्तींची व्याख्या या कलमांनुसार केली आहे. या व्यक्ती म्हणजे  :

१. ज्या व्यक्तीने मागील दोन वर्षांचे विवरणपत्र दाखल केलेले नाही, आणि

२. विवरणपत्र भरण्याची मुदत संपली आहे, आणि

३. गोळा केला जाणारा कर आणि उद्गम कर असा एकूण प्रत्येक वर्षी ५०,००० किंवा त्यापेक्षा जास्त आहे.

ज्या करदात्यांना वरील व्याख्या लागू होते अशा करदात्यांचा गोळा करावयाचा कर किंवा उद्गम कर दुप्पट दराने गोळा केला जाईल किंवा कापला जाईल. या तरतुदीमुळे विवरणपत्र न भरणाऱ्या करदात्यांचा जास्त उद्गम कर कापला जाऊन त्याचा परिणाम रोकड सुलभतेवर होईल. करदात्याला या जास्त कापलेल्या उद्गम करासाठी विवरणपत्र भरूनच करपरताव्याचा दावा करावा लागेल.

ही तरतूद पगार, भविष्य निर्वाह निधी, लॉटरी, शब्दकोडे, घोडे शर्यत, बँकेतून पैसे काढण्यासाठीच्या उद्गम करासाठी लागू नाही. उदाहरणार्थ, पगारदार करदात्याने मागील दोन वर्षांचे विवरणपत्र दाखल केले नसले तरी त्याचा उद्गम कर दुप्पट दराने कापला जाणार नाही. तसेच अनिवासी व्यक्तींसाठी, ज्यांचे भारतामध्ये निश्चित ठिकाण नाही अशांनादेखील ही तरतूद लागू होत नाही. हा दुप्पट दराने उद्गम कर कापण्याची किंवा कर गोळा करण्याची जबाबदारी उद्गम कर कापणाऱ्याची किंवा गोळा करणाऱ्याची आहे. उद्गम कर कापण्यापूर्वी त्यांनी हे तपासून घेतले पाहिजे की ज्या व्यक्तीचा कर कापण्यात येणार आहे त्याने विवरणपत्र दाखल केले आहे का? या अतिरक्त जबाबदारीचा भार उद्गम कर कापणाऱ्यावर टाकण्यात आलेला आहे. हा भार कमी करण्यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने २१ जून २०२१ रोजी संकेतस्थळावर ‘कलम २०६ एबी’ आणि ‘कलम २०६ सीसीए’साठी लागणाऱ्या माहितीच्या वापरासंबंधी एक परिपत्रक जारी केले आहे.

ज्या व्यक्तीचा उद्गम कर कापण्यात येणार आहे किंवा गोळा करण्यात येणार आहे ती व्यक्ती निर्दिष्ट व्यक्ती आहे किंवा नाही हे तपासता येईल. किंवा ज्या व्यक्तींचा उद्गम कर कापण्यात येणार आहे त्यांच्याकडून विवरणपत्र दाखल केल्याचे घोषणापत्र घेण्याचादेखील पर्याय उपलब्ध आहे.  या तरतुदींमुळे विवरणपत्र भरणाऱ्या करदात्यांच्या संख्येत निश्चित वाढ होईल.

प्रश्न : मी अनिवासी भारतीय आहे. माझी पुण्यात १० वर्षांपूर्वी खरेदी केलेली एक सदनिका आहे. मी माझी सदनिका ज्या व्यक्तीला विकणार आहे त्याने मला संपूर्ण विक्री रकमेवर ३० टक्के उद्गम कर कापण्यास सांगितले आहे. ही पुण्यातील सदनिका विकून मुंबईत सदनिका घेणार असल्यामुळे मला कर भरावा लागणार नाही. हा उद्गम कर मला वाचविता येईल का?

– सदाशिव पंडित

उत्तर : निवासी भारतीयांकडून ५० लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीची स्थावर मालमत्ता खरेदी केल्यास त्यावर ‘कलम १९४ आयए’नुसार एक टक्का उद्गम कर कापण्याची तरतूद आहे. परंतु अनिवासी भारतीयांकडून स्थावर मालमत्ता खरेदी केल्यास ही ५० लाख रुपयांच्या रकमेची मर्यादा नाही आणि अनिवासी भारतीयाला विक्रीवर जेवढा कर देय आहे तेवढा कर कापण्याची तरतूद आहे. आपण ही सदनिका १० वर्षांपूर्वी खरेदी केली असल्यामुळे ही संपत्ती दीर्घमुदतीची आहे आणि होणारा नफा हा दीर्घ मुदतीचा आहे. मुंबईत भांडवली नफ्याएवढय़ा किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचे नवीन घर घेणार असल्यास आपल्याला पुण्याच्या घराच्या विक्रीवर होणाऱ्या भांडवली नफ्यावर कर भरावा लागणार नाही. यासाठी ‘कलम ५४’नुसार अटींची पूर्तता करावी लागेल. या व्यवहारात आपले करदायित्व नसल्यामुळे आपण प्राप्तिकर अधिकाऱ्याकडे ‘फॉर्म १३’मध्ये शून्य किंवा कमी दराने उद्गम कर कापण्यासाठी अर्ज करू शकता. अर्ज आणि आपण केलेल्या कागदपत्राच्या आधारावर प्राप्तिकर अधिकाऱ्याकडून मिळालेले शून्य किंवा कमी दराने उद्गम कर कापण्याचे प्रमाणपत्र घर खरेदी करणाऱ्या व्यक्तीला दिल्यास कर त्यानुसार कापला जाईल.

प्रश्न : मी ज्येष्ठ नागरिक आहे. माझे वय ७२ वर्षे आहे. २०२०-२१ या वर्षांत मला २ लाख रुपये निवृत्तिवेतन मिळाले आणि २.२५ लाख रुपयांचे व्याजाचे उत्पन्न मिळाले आहे. मला विवरणपत्र भरावे लागेल का?

– रमेश काळे

उत्तर : आपले वय विचारात घेता आपल्याला तीन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न करमुक्त आहे. आपले एकूण उत्पन्न तीन लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यामुळे आपल्याला विवरणपत्र दाखल करणे बंधनकारक आहे.

‘कलम ८७ अ’नुसार मिळणारी कर सवलत विचारात घेता आपल्याला कर भरावा लागणार नाही.

प्रश्न : माझा मुलगा ऑस्ट्रेलिया येथे राहतो. त्याचे भारतात काही उत्पन्न आहे. मी त्याचे विवरणपत्र ऑनलाइन दाखल करतो. विवरणपत्र दाखल केल्याची पावती सही करून बंगळूरु येथे पाठवावी लागते. त्याच्या या विवरणपत्राच्या पावतीवर मी सही करून पाठवू शकतो का?

– एक वाचक

उत्तर : आपल्याकडे आपल्या मुलाचे वैध मुखत्यार पत्र (पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी) असल्यास आपण त्याच्या विवरणपत्र पावतीवर सही करून ते १२० दिवसांत बंगळूरु येथे पाठवू शकता.

प्रश्न : नुकतेच माझे शिक्षण पूर्ण झाले आहे. मला पर्मनंट अकाऊंट नंबर (पॅन) घेणे गरजेचे आहे का?

– ओंकार सावंत

उत्तर : ज्या व्यक्तींचे उत्पन्न किमान करमुक्त उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा जास्त असेल तर पॅन घेणे बंधनकारक आहे.

किंवा धंदा-व्यवसाय करणाऱ्यांची वार्षिक उलाढाल पाच लाख रुपयांपेक्षा जास्त असेल किंवा होणार असेल तर पॅन घेणे बंधनकारक आहे.

* लेखक सनदी लेखाकार आणि कर सल्लागार आहेत.