अनिकेत जोशी यांनी प्राप्तिकर सल्लागाराला सकाळीच फोन करून भेटीची वेळ ठरवली आणि ठरल्याप्रमाणे सकाळी १० वाजता ते प्राप्तिकर सल्लागाराच्या ऑफिसमध्ये पोचले.. प्राप्तिकर सल्लागाराच्या ऑफिसमधले हे संभाषण:
‘‘या जोशीसाहेब! बसा. इतके चिंतेत का दिसताय?’’- प्राप्तिकर सल्लागार.
‘‘सर, माझ्या जुन्या घराच्या विक्रीचा एक मोठा आíथक व्यवहार झाला आणि नवीन घराचा एक व्यवहार होणार आहे. त्याचंच टेन्शन आलंय.’’ – जोशी साहेब.
‘‘टेन्शन घेऊन चिंता दूर होणार असेल तर ते जरूर घ्या.’’ – प्राप्तिकर सल्लागार.
‘‘तसं नाही हो, पण लाखांचा व्यवहार, परत मोठय़ा रकमेचा प्राप्तिकर भरणे या सर्वाचं टेन्शन आलंय.’’ जोशीसाहेब.
‘‘मला जरा डिटेल्स दिलेत तर तुमची चिंता दूर करायचा प्रयत्न करेन, निदान प्राप्तिकराबाबत मी नक्कीच मदत करू शकेन.’’- प्राप्तिकर सल्लागार.
‘‘त्याचं असं आहे की, मी आणि माझ्या सौ.नी आमच्या गावी घर घेऊन तिथेच स्थायिक होण्याचं ठरवलं आहे. त्या दृष्टीने आमचे इथलं जून १९८१ साली ३ लाखाला घेतलेलं घर आम्ही २२ नोव्हेंबरला २०१५ ला ३८ लाखाला विकलं. साधारण त्याच किमतीत मला आमच्या गावी मोठ्ठं घर मिळतंय; पण माझ्या एका मित्राने मला अशी माहिती दिली की, मला या व्यवहारात झालेल्या ३५ लाखांच्या नफ्यावर २०% काय म्हणे तो भांडवली कर भरावा लागणार आहे. ती रक्कम होते आहे ७ लाख रुपये! मला असा काही कर असतो याविषयी काहीच माहिती नव्हती. घर विकून आलेल्या ३८ लाखांच्या किमतीत आमच्या गावाला साधारणपणे त्याच किमतीच्या आसपास मोठं घर घेण्याचा मी प्लॅन केला. आता हे ७ लाख रुपये भांडवली कररूपाने भरायचे असे मित्राकडून कळले. त्यामुळे ३८ लाखांचं गावी घर घेण्यासाठी ७ लाख रुपयांचा जो फरक पडतोय तो कसा उभा करायचा, हा मला प्रश्न पडला आहे आणि ७ लाख रुपये कर भरायचाय हे वास्तव स्वीकारणं कठीण जातंय. या सगळ्याचं एक प्रकारे टेन्शन आलंय.’’ – जोशीसाहेब.
‘‘जोशीसाहेब, पहिलं म्हणजे ७ लाखांचा कर भरण्याचं तुम्हाला जे टेन्शन आलंय ते दूर करतो. तुम्ही दिलेल्या माहितीच्या आधारे हा भांडवली कर ७ लाख नव्हे, तर १,११,४०० रुपये येतो आणि तोही भरण्याची गरज नाही.’’- जोशीसाहेबांनी दिलेल्या माहितीच्या आधारे मोजणी करून प्राप्तिकर सल्लागार उत्तरले.
‘‘म्हणजे? कर भरायचाच नाही? चक्क चुकवायचा?’’ – जोशीसाहेब.
‘‘नाही, कर चुकवायचा नाही, वाचवायचा! आणि तोही कायद्याच्या चौकटीत राहून. जोशीसाहेब, प्राप्तिकर कायदा जसा विविध कलमांद्वारे प्राप्तिकर आकारतो तसंच विविध कलमांद्वारे कर वाचवण्यासाठीसुद्धा वाव देतो. – प्राप्तिकर सल्लागार.
‘‘मला जरा नीट समजावून सांगा ना सर!’’ – जोशीसाहेब.
आणि मग प्राप्तिकर सल्लागाराने जोशीसाहेबांना एक घर विकून दुसरे घर घेताना नफ्याची मोजणी कशी करतात आणि कलम ५४ अंतर्गत कर कसा वाचतो हे समजावून सांगितलं..
‘‘एखादी भांडवली मालमत्ता ज्या वेळी विकली जाते (जसे की राहते घर) त्या वेळी त्याच्या विक्रीच्या किमतीतून खरेदीची किंमत वजा करताना कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्सचा आधार घेता येतो. १९८१-८२ वर्षांचा कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्स आहे १०० आणि आíथक वर्ष २०१५-१६ वर्षांचा कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्स आहे १०८१. याआधारे तुमच्या घराची खरेदीची किंमत ठरते ३२,४३,००० (बत्तीस लाख त्रेचाळीस हजार). त्यामुळे दीर्घकालीन भांडवली नफा होतो ५,५७,००० (पाच लाख सत्तावन हजार) [३८ लाख वजा ३२,४३,०००] आता या ५,५७,००० रुपयांच्या दीर्घकालीन भांडवली नफ्यावर २०% म्हणजे १,११,४०० रुपये भांडवली कर भरावा लागणार का? तर नाही. याचं कारण तुम्ही पहिलं घर विकून दुसरं घर घेताहात. त्याची किंमत झालेल्या दीर्घकालीन भांडवली नफ्यापेक्षा जास्त असल्यामुळे कलम ५४ अंतर्गत ५,५७,००० हा भांडवली नफा पूर्णपणे करमुक्त ठरतो. असे नवीन घर जुने घर विकण्याच्या आधी १ वर्ष किंवा जुने घर विकल्यानंतर दोन वर्षांच्या आत खरेदी करावे लागते किंवा तीन वर्षांच्या आत बांधावे लागते आणि हे नवीन घर तीन वर्षे विकता येत नाही. जुने घर विकून झालेला दीर्घकालीन भांडवली नफा किंवा नवीन घराची किंमत यापकी जी कमी रक्कम असेल ती कलम ५४ अंतर्गत करमुक्त मिळते.’’
अनिकेत जोशींनी या तरतुदी जाणून घेतल्या, त्यांचे टेन्शन दूर झाले आणि प्राप्तिकर सल्लागाराच्या ऑफिसमधून ते आनंदात बाहेर पडले.

लेखक मुंबईस्थित प्राप्तिकर नियोजन सल्लागार