सुधीर जोशी sudhirjoshi23@gmail.com

सेन्सेक्स आणि निफ्टी या निर्देशांकांसाठी गेला आठवडा आणखी नवे उच्चांक गाठणारा ठरला. रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरण आढाव्यात व्याजदर कायम ठेवून महागाईचा दर सहनशील मर्यादेत वाढण्याची आणि विकास दरातील वाढ साडेनऊ टक्के राहण्याची शक्यता वर्तविली गेली. बाजाराला यापेक्षा वेगळे काही अपेक्षित नसल्यामुळे बाजारावर पतधोरणाचा फारसा परिणाम दिसला नाही. घरभाडे कायद्यातील सुधारणांना केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली ज्यामुळे घर बांधणी व्यवसायातील व गृह कर्ज देणाऱ्या कंपन्यांना नवी ऊर्जा मिळाली. सरकारी बँकांच्या समभागांना मागणी कायम राहिली व धातू क्षेत्रातील कंपन्या पुन्हा एकदा तेजीत आल्या. सप्ताहअखेर थोडय़ा नफावसुलीनंतर बाजाराचे प्रमुख निर्देशांक साधारण दीड टक्क्यांच्या कमाईने बंद झाले.

एनसीसी लिमिटेडने (पूर्वीची नागार्जुन कन्स्ट्रक्शन्स) २०२१ च्या वर्षअखेरच्या कामगिरीवर करोनाकाळाचा परिणाम दिसत असला तरी नव्याने मिळविलेल्या कंत्राटांमध्ये वाढ होऊन नव्या वर्षांच्या सुरुवातीस कंपनीकडे ३७,९०० कोटींची कामे आहेत जी गेल्या वर्षीच्या मिळकतीपेक्षा पाचपट अधिक आहेत. पायाभूत विकासाची बांधकामे करणाऱ्या या कंपनीतील कर्जाचे प्रमाणही आता कमी झाले आहे. करोनानंतर कामांमध्ये प्रगती होऊन कंपनी चांगला फायदा देऊ शकेल. सध्या ८० रुपयांच्या आसपास गुंतवणुकीची चांगली संधी आहे.

आयटीसीने मिळकतीत २४ टक्के वाढ जाहीर केली पण नफ्याचे प्रमाण कमी राहिले. कारण कंपनीचा हॉटेल व पेपर व्यवसायावर करोनामुळे झालेल्या टाळेबंदीचा जास्त परिणाम झाला. टाळेबंदी शिथिल होईल तसा नफ्यावरील या व्यवसायांचा भार कमी होईल तसेच जास्त नफा मिळवून देणारा सिगारेट व्यवसायही चांगले उत्पन्न मिळवून देईल. कंपनीकडून मोठय़ा भांडवली लाभाची नजीकच्या काळात शक्यता नसली तरी सध्याच्या भावावर डिव्हिडंड रूपाने मिळणारा ५ टक्के परतावा दीर्घ मुदतीसाठी समभाग राखून ठेवण्यासाठी आकर्षक आहे.

ऑरबिंदो फार्माच्या मार्चअखेरच्या तिमाही मिळकतीत व नफ्यात अपेक्षेपेक्षा थोडी कमतरता भासली तरी वार्षिक तुलनेत प्रति समभाग मिळकतीत २० टक्के वाढ झाली आहे. कंपनीच्या ‘यूबी-६१२’ व्हॅक्सिनच्या भारतातील तिसऱ्या टप्प्यांतील चाचणीला परवानगी अपेक्षित आहे. करोनावरील व्हॅक्सिनमधील संधी व भविष्यात सादर होणाऱ्या नव्या औषध मालिका व अमेरिका व युरोपमधील व्यवहार पूर्ववत होण्याची शक्यता विचारात घेता सध्याचा भाव वर्षभराच्या गुंतवणुकीसाठी योग्य वाटतो.

पीव्हीआर या चित्रपटगृह चालविणाऱ्या कंपनीचा तोटा अपेक्षेप्रमाणे ७४ कोटींवरून २८९ कोटींवर गेला आहे तर संपूर्ण वर्षांसाठी तो ७४८ कोटी झाला आहे. कंपनीने वर्षभरात १,६०० कोटींचे नवीन भांडवल उभारून रोकडतरलता कायम ठेवली आहे. चीन, अमेरिका, फ्रान्ससारख्या देशात करोनाचे निर्बंध कमी झाल्यावर चित्रपटगृहांना मिळालेली पसंती पाहता करोनाचे निर्बंध कमी होताच कंपनी दमदार पुनरागमन करेल. जोखीम घेऊ शकणाऱ्या गुंतवणूकदारांना यात संधी आहे.

आदित्य बिर्ला फॅशनला मार्चअखेरच्या तिमाहीत १३५ कोटी तोटा झाला. कंपनी अनेक प्रसिद्ध नाममुद्रांच्या तयार कपडय़ांची निर्मिती व विक्री करते तसेच पँटालुन्स या नावाची दुकानांची साखळी चालविते. करोनाचा फटका बसलेली ही आणखी एक कंपनी. कंपनीच्या घाऊक विक्रीवर परिणाम झाला असला तरी ई-कॉमर्सद्वारे विक्रीत वाढ झाली आहे. घरातून काम करणाऱ्यांसाठी आरामदायी कपडय़ांची श्रेणी कंपनीने सादर केली आहे. चांगले व्यवस्थापन असलेली ही कंपनी दोन ते तीन वर्षांसाठी गुंतवणुकीस उत्तम.

सोने तारण घेऊन वित्तपुरवठा करणारी मुत्थुट फायनान्स कंपनीने मागील वर्षी चांगली कामगिरी केली आहे. कंपनीच्या प्रति समभाग नफ्यात ५० टक्के वाढ झाली. अर्थव्यवस्था व्यवहार पूर्ववत झाल्यावर लहान व्यापारी, शेतकरी व मध्यमवर्गीय ग्राहकांकडून कर्जाची मागणी वाढण्याची शक्यता आहे. सोन्याचे वाढणारे भावही या कंपनीच्या व्यवसायाला पूरक ठरतील. गेल्या सप्ताहात या कंपनीच्या समभागात आलेली तेजी कंपनीच्या भवितव्याबाबत हाच विश्वास दाखविते. थोडी घसरण होण्याची वाट पाहून या कंपनीमधील गुंतवणूक वर्षभरात चांगला फायदा मिळवून देईल.

बाजारात येणारी थोडीशी घसरणही सध्या खरेदीला आमंत्रित करते आहे. मध्यम व लहान कंपन्यांचे निकाल अजूनही येत आहेत ज्यामुळे निवडक मिडकॅप व स्मॉलकॅप कंपन्यांमध्ये गुंतवणुकीचा उत्साह दिसत आहे. एप्रिल व मेमधील १८ हजार कोटींच्या विक्रीनंतर परदेशी गुंतवणूकदारांनी जून महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात परत नक्त खरेदी केली आहे. करोनाच्या नव्या लागणीचे आकडे रोजच घसरत आहेत. ज्यामुळे बाजार जास्त आशावादी होत आहे. नजीकच्या काळात राज्य सरकारे टाळेबंदीमध्ये किती शिथिलता आणतात व लसीकरणाचा वेग कसा राहतो याकडे लक्ष ठेवून बाजार शिखरावर अढळ आहे.