|| कौस्तुभ जोशी

आपल्या व्यवसायासाठी उद्योगधंद्यात विविध मार्गाने पैसे उभे केले जातात. पैसे उभे करणाऱ्याप्रमाणेच पैसे कर्ज स्वरूपात देणाऱ्या संस्थेची भूमिकासुद्धा महत्त्वाची ठरते.

किंबहुना कर्ज मागणारा, कर्ज देणारा या दोघांमध्ये कर्ज देणाऱ्याने अधिक सावधानता बाळगायला हवी. या संदर्भात अधिक विचार करायचा झाल्यास पतजोखीम (क्रेडिट रिस्क) ही संकल्पना विचारात घ्यावी लागते.

कर्ज देणे ही प्रक्रिया थोडक्यात समजावून घेऊया. एखाद्या वित्तसंस्थेकडून ठरलेल्या मुदतीसाठी पैसे कर्जाऊ घ्यायचे आणि दरमहा ठरलेली रक्कम त्यांना परत करायची ही व्यवस्था असते. काही वेळा वित्तीय संस्था घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्याची संधी वेगवेगळ्या स्वरूपात देतात.

जर प्रकल्प प्रत्यक्ष कागदावरून वास्तवात आकारात यायला दीर्घकाळ लागणार असेल तर कर्ज परतफेड करण्याचा कालावधी तसा ठरवून दिला जातो. यामागील गणित म्हणजे पतजोखीम होय.

वित्तसंस्थांना कर्ज देताना सगळ्यात मोठी जोखीम असते ती म्हणजे दिलेले पैसे परत मिळतील का नाही याची! याचीच काळजीपूर्वक पडताळणी कर्ज देताना केली जाते.

एखादा कर्जदार कर्ज मागायला येतो त्या वेळी त्याच्या उद्योगधंद्याचा इतिहास कसा आहे? तो व्यवसाय करतो त्या व्यवसायाचे भविष्य कसे आहे? त्यातील स्पर्धात्मकता कशी आहे? तो ज्या व्यवसायामध्ये आहे त्या व्यवसायासंबंधी शासकीय धोरणांची अनुकूलता आहे का? एखाद्या शासनाने जाहीर केलेल्या धोरणामुळे त्याच्या उद्योगाला भविष्यात सुगीचे दिवस येतील अशी शक्यता वाटते का? या सगळ्याचा विचार कर्ज देताना केला जातो.

आपण ज्याला कर्ज देतो त्याच्या व्यवसायाचे गेल्या काही वर्षांतले आर्थिक उलाढालीचे आकडे (कॅश फ्लो स्टेटमेंट, ताळेबंद) तपासून पाहणे हा त्यावरील उत्तम उपाय असतो. जर एखादा कर्ज मागायला येणारा ग्राहक नवखा असेल तर त्याचं व्यवसायाबद्दल गणित किती पक्क आहे हे वित्त संस्थेला ठरवावं लागतं. कोणताही आगापिछा नसताना एखादा नवीन उद्योग सुरू करणे यामध्ये जोखीम अधिक असल्याने असे कर्ज देताना चढय़ा व्याजदराने दिले जाते व परतफेडीचे नियमसुद्धा काहीसे कठोर असतात.

वित्तसंस्थांनी कर्ज वाटप करताना काही र्निबध पाळले तर पतजोखीम थोडीशी कमी होऊ शकते. एकाच प्रकारच्या व्यावसायिकांना सढळ हस्ते कर्जपुरवठा करणे, निव्वळ अधिक व्याजदर भरायला तयार आहेत म्हणून सढळ हस्ते कर्जपुरवठा करणे, ज्यांचा भूतकाळ फारसा उत्साहवर्धक नाही अशांना निव्वळ आश्वासनांवर कर्ज देणे या गोष्टी टाळल्या तर पतजोखीम कमी होते.

गुंतवणूकदार म्हणून पतजोखीम हा मुद्दा कसा विचारात घ्यावा?

बाजारामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे कर्जरोखे गुंतवणुकीसाठी उपलब्ध असतात. कंपन्या त्यांना पाहिजे असलेले पैसे थेट खुल्या बाजारात सिक्युरिटी इश्यू करून उभे करतात. मात्र आपण गुंतवणूकदार म्हणून सर्वच कंपन्यांचे कर्जरोखे एक सारखे समजावेत का? याचे उत्तर नाही असे आहे. बहुतांश वेळा ज्यांची पतजोखीम अधिक असते त्यांचे व्याजदर चढे असतात आणि त्यामुळेच सर्वसामान्य गुंतवणूकदार त्यांच्याकडे आकर्षित होतो.
क्रेडिट रिस्क फंडाचे गणित गेल्या काही वर्षांत म्युच्युअल फंडांमधील गुंतवणुकीचा हा प्रकार कमालीचा लोकप्रिय होऊ लागला आहे. यामध्ये कमी पतमानांकन (क्रेडिट रेटिंग) असलेले रोखे निवडले जातात. यामध्ये जोखीम अधिक असते मात्र परताव्याची शक्यतासुद्धा अधिक असते. यामध्ये बाजारातील प्रस्थापित कंपन्यांपेक्षा थोडय़ा कमी पतमानांकन असलेल्या कंपन्यांचे रोखे घेतल्याने त्यातून दोन प्रकारचा फायदा होतो. पहिला फायदा म्हणजे मिळणारे व्याज आणि दुसरा फायदा जेव्हा त्या कमी क्रेडिट रेटिंग असलेल्या कंपनीचे रेटिंग सुधारते त्या वेळी कर्जरोख्यांच्या किमतीत वाढ होऊन भांडवली नफा मिळतो. अन्य रोखेसंलग्न (डेट) फंडांपेक्षा क्रेडिट रिस्क फंड जोखीम या मापदंडावर थोडेसे धोकादायक ठरतात.

लेखक सनदी लेखाकार व कर सल्लागार

pravin3966@rediffmail.com