19 April 2019

News Flash

शूर योद्धय़ांसाठी आर्थिक नियोजन

यशोदाताई आज सकाळपासून खुशीत होत्या! कारणच तसं होतं.

|| तृप्ती राणे

यशोदाताई आज सकाळपासून खुशीत होत्या! कारणच तसं होतं. बऱ्याच दिवसांनी त्यांचं सगळं कुटुंब एकत्र येणार होतं. राखी पौर्णिमेसाठी मधुरा पुण्याहून यायला निघाली होती. मधुरा ही त्यांची मोठी मुलगी. तिचा संसार थाटून तीन वर्षे झाली होती. लांब असली तरी रोज फोनवर आईची खुशाली नक्की घ्यायची. आज तिच्याबरोबर चिमुकला आरोहसुद्धा येणार होता. यशोदाताईंना कधी एकदा त्याचा गालगुच्चा घेते असं झालं होतं. आज महत्त्वाचं म्हणजे भाई सुट्टीवर घरी येणार होता. पाच वर्षे झाली होती त्याला मिलिटरीत लागून. तेव्हापासून तो जो घराबाहेर पडला तो ईदचा चांद झाला. एक वेळ ईदचा चांद कधी दिसणार हे सांगता येईल, पण भाई कधी येईल याचा कुणालाच अंदाज नसे. गेल्या वर्षी त्याचं लग्न लावून यशोदाताई एका कर्तव्यातून मोकळ्या झाल्या होत्या. लग्नानंतर जो तो गेला तो आता घरी येणार होता. पूर्वा, भाईची बायको, तशी सर्वसाधारण कुटुंबात वाढलेली, पण अतिशय हुशार. भाई लांब असताना सगळ्या कुटुंबाची छान काळजी घेत होती. घर, नोकरी आणि नातेवाईक सगळ्यांना हसतमुखाने सांभाळत ती स्वत:चा एकटेपणा मागे टाकायची. आज नवरा येणार म्हणून ती जणू हवेत तरंगल्यासारखी वावरत होती. एकूणच काय तर सगळीकडे आनंदीआनंद वाहत होता.

साधारण दहाच्या सुमारास आरोहचे बोबडे बोल यशोदाताईंच्या कानावर पडले, आणि त्या आपले गुडघेदुखी विसरून धावत दरवाजापाशी गेल्या. आरोहने उडीच मारली आजीच्या अंगावर.

‘अरे थांब थांब! आजीला त्रास होईल,’ असं म्हणत पाठोपाठ मधुरा आलीच.

तशी मधुरा खूप शिस्तीची. त्यामुळे पूर्वा तिचा खूप आदर करायची. भाईजवळ नसताना काही निर्णय घेताना मधुराचा तिला खूप आधार होता. म्हणून जेव्हा जेव्हा मधुरा यायची तेव्हा तेव्हा पूर्वा तिची छान सरबराई करायची.

दोघेही फ्रे श झाले तसं मधुराने यशोदाताई आणि पूर्वाला काही महत्त्वाचं सांगायचं म्हणत गोळा केलं. आरोहला कार्टून लावून दिलं आणि तिघी डायनिंग टेबलजवळ बसल्या. चहाचे घोट घेत मधुरा म्हणाली – ‘आई, आज भाई येणार आहे. तर तो यायच्या आधी मला काही गोष्टी तुमच्याबरोबर बोलायच्या आहेत. मी बरेच दिवस सांगेन सांगेन म्हणत होते, पण फोनवर या गोष्टी नाही बोलाव्याशा वाटल्या.’

यशोदाताई हे ऐकून जरा गंभीर झाल्या. पूर्वालाही कळेना की वन्सं नक्की कशाच्या संदर्भात बोलत आहेत.

दोघींच्या चेहऱ्यावर जे प्रश्न उठले त्यांचं निरसन करत मधुरा बोलली -‘पूर्वा, बाबांना जाऊन जवळजवळ २० वर्षे झाली. ते गेले तेव्हा मी सहा वर्षांची आणि भाई तीन वर्षांचा होता. बाबा मिलिटरीत होते आणि कारगिलच्या युद्धात ते शहीद झाले. त्यांच्यानंतर आमच्या कुटुंबाने कोणते दिवस पहिले हे फक्त आम्हा तिघांनाच माहीत आहेत. सरकारकडून जे काही मिळायचं होतं ते सर्व अगदी व्यवस्थित मिळालं. पण मुंबईसारख्या शहरात ते अपुरं होतं. शिवाय आजी आणि आजोबांची जबाबदारीसुद्धा होती. पण आमच्या आईने धीर न सोडता आम्हा दोघांनाही जमेल तितकं चांगलं शिक्षण देऊन मोठं केलं. खूप कष्ट घेत तिने स्वत:चा आनंद विसरून आम्हाला मार्गी लावलं. भाईला बाबांची साथ तितकी नाही मिळाली, पण त्यांचे देशप्रेमाचे गुण घेऊन आल्यामुळे तोसुद्धा मिलिटरीत जाणार याची आम्हाला खात्री होती. पाच वर्षांपूर्वी जेव्हा तो गेला तेव्हा तो एकटाच होता, पण आज त्याच्या आयुष्यात तू आहेस. पुढे तुमचं कुटुंबही वाढेल. पण देशासाठी प्राणांची आहुती द्यायच्या तयारीने भाई गेलाय. तिथे त्याला दुसरं काही दिसणार नाही, कुटुंब काय हे लक्षात राहणार नाही. पण तुला मात्र याबाबतीत पॅ्रक्टिकल व्हावं लागेल. तेव्हा मला असं खूप वाटलं की जे आमच्या कुटुंबाने भोगलं, त्यांतून शिकून, तुझं कुटुंब तू सक्षम कर. काय गं आई? बरोबर ना?’

एवढा वेळ शांत असलेल्या यशोदाताई एक मोठा श्वास सोडत उठल्या. पूर्वाकडे मायेच्या नजरेने पाहत त्या बोलल्या – ‘मधुरा, अगदी योग्य वेळेवर हा महत्त्वाचा मुद्दा तू आज मांडलास. तुझ्या शिस्तीमुळे आजवर आपल्या कुटुंबाला खूप फायदा झालेला आहे. तुझ्या दूरदृष्टीने तू आजवरचे घेतलेले सगळे निर्णय योग्य ठरलेले आहेत. तेव्हा पूर्वा, आज मधुरा जे सांगतेय ते भावनावश न होता नीट समजून घे. आम्ही तुझ्याबरोबर नेहमीच असू, पण उद्याचं कोणी पाहिलंय का? तू मुळातच हुशार आहेस, म्हणून हे सर्व तुलाच सांगणं गरजेचं आहे. भाईसाठी पहिला देश आणि मग आपण. म्हणून घरची आर्थिक जबाबदारी ही तुझ्यावर. मधुरा, सांग पुढे.’

आईच्या बोलण्याचा आधार घेत मधुरा म्हणाली – ‘पूर्वा, सगळ्यात पहिली गोष्ट ही समजून घे की तुझ्या कुटुंबाचा आर्थिक पाया तूच भक्कम करू शकतेस. भाईकडून तू याच्यात काही सहभाग मिळेल याची अपेक्षाच करू नकोस. तेव्हा तुझ्या कुटुंबाचं गणित आणि त्यासाठी लागणारी गुंतवणूक हे नीट समजून घे. मी तुला ढोबळ माहिती देतेय, पण एका विश्वासपात्र आर्थिक नियोजनकाराची मदत घेऊन पुढच्या कामाला लाग.’

पूर्वाला दिलेल्या काही टिप्स या अशा :

१. भाईला विमा संरक्षण खूप महत्त्वाचे आहे. सरकारसुद्धा देते, परंतु त्याहून जास्त कवच मिळविणे गरजेचे आहे.

२. सुदैवाने तुम्हाला सरकारी आरोग्य विमा आहे. तरीही स्वत:चा आणि पुढे जाऊन मुलांचा आरोग्य विमा काढायला हवा.

३. भाईने पाठवलेल्या आणि तुझ्या पगारातून बाजूला काढलेल्या पैशांची योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे.

४. पुढे होणाऱ्या खर्चाचा नीट आढावा घे. महागाई आला दिवस वाढत आहे. तेव्हा आजच्या आकडय़ांना या पुढच्या महागाईने वाढवून घे.

५. पुढे स्वत:चे घर घेणार असाल तर कर्जाचा हप्ता आणि त्यामुळे होणारी कमी गुंतवणूक हेसुद्धा ध्यानात ठेव.

‘पूर्वा, सरतेशेवटी एवढंच सांगेन की भाईकडे लढताना नेहमीच प्लान बी असतो. तसा तुझा प्लान बी तयार कर. अगं, त्याच्यासारखे अनेक वीर आला दिवस मृत्यूबरोबर खेळतात. आणि जवानच का? पोलीस आणि अग्निशमन दलातील वीरसुद्धा त्यात सामील आहेत. आणि त्यांना या कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये पडता येत नाही. तेव्हा यांचे आर्थिक नियोजन हे कुटुंबातील इतर मंडळींनीच करावे. मला पूर्ण विश्वास आहे की तू ही जबाबदारी नक्कीच फत्ते करशील.’

पूर्वाला खूप भरून आले. किती समजूतदार कुटुंबात ती आली आहे याचा तिला अभिमान वाटला. ती काही सांगणार तेवढय़ात भाईची टॅक्सी खाली आली. ‘वन्सं, थँक्स! मी नक्कीच हे करेन’, एवढं बोलून ती नवऱ्याच्या स्वागतासाठी सज्ज झाली.

trupti_vrane@yahoo.com

(लेखिका सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार)

First Published on August 27, 2018 12:01 am

Web Title: what is financial planning