News Flash

करावे कर-समाधान : नवीन आर्थिक वर्षारंभीचे नियोजन

करदात्याने आपला विकल्प मालकाला न कळविल्यास मालक, कररचनेच्या जुन्या (गुंतवणूक आणि खर्चाच्या वजावटी घेऊन) पद्धतीने उद्गम कर कापेल.

||  प्रवीण देशपांडे

आपले उत्पन्न, अग्रिम कर, गुंतवणूक, खर्च यांचे अनुमान काढून कर बचत करणे शक्य होईल अशा गुंतवणुकांचे नियोजन एप्रिल महिन्यातच करणे, तसेच ‘टीडीएस’ कापला न जावा यासाठी फॉर्म १५ जी किंवा फॉर्म १५ एच सादर करणे आवश्यक आहे…

एप्रिल १, २०२१ पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले. आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला काही तरतुदींचे अनुपालन करणे आणि योग्य ते नियोजन करणे आवश्यक आहे. यामुळे अनावश्यक उद्गम कर (टीडीएस) कापला जाणार नाही, आपले उत्पन्न, अग्रिम कर, गुंतवणूक, खर्च यांचे अनुमान काढून कर बचत करणे शक्य होईल. उद्गम कर (टीडीएस) कापला न जावा यासाठी फॉर्म १५ जी किंवा फॉर्म १५ एच कर कापणाऱ्याला सादर करणे आवश्यक आहे. हा फॉर्म करदात्याने वेळेत सादर न केल्यास आपल्या उत्पन्नावर कर कापला जातो आणि कर कापणाऱ्याने कर सरकारकडे जमा केल्यास तो त्याला परत देताही येत नाही, करदात्याला विवरणपत्र भरूनच करपरताव्याचा दावा करता येतो. त्यामुळे आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे एप्रिल महिन्यात हा फॉर्म सादर करणे हितावह आहे. फॉर्म १५ एच हा ज्येष्ठ नागरिकांना (ज्यांचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त आहे) देता येतो आणि फॉर्म १५ जी हा इतर नागरिकांना (ज्यांचे वय ६० वर्षांपेक्षा कमी आहे) देता येतो. नोकरदारांनी मागील वर्षापासून एप्रिल महिन्यात कररचनेचा विकल्प निवडावयाचा असतो आणि हा विकल्प मालकाला कळवावा लागतो. मालक यानुसार पगारावरील उद्गम कर एप्रिलपासून कापतो. हा विकल्प करदाता विवरणपत्र भरताना बदलू शकतो. करदात्याने आपला विकल्प मालकाला न कळविल्यास मालक, कररचनेच्या जुन्या (गुंतवणूक आणि खर्चाच्या वजावटी घेऊन) पद्धतीने उद्गम कर कापेल. करदात्याने जुना विकल्प निवडल्यास त्या आर्थिक वर्षात करण्यात येणाऱ्या गुंतवणुका आणि खर्च याचे घोषणापत्र मालकाला सादर केल्यास त्याप्रमाणे पगाराच्या उत्पन्नावरील उद्गम कर कापला जाईल.

 

’ प्रश्न : मी ज्येष्ठ नागरिक आहे. १८ मार्च २०२१ रोजी माझे घर ७५ लाख रुपयांना मी विकले. आता कर वाचविण्यासाठी नवीन घरात किंवा बाँडमध्ये पैसे गुंतवू इच्छित नाही. मला झालेल्या भांडवली नफ्यावरील देय कर कधी व कसा भरावा लागेल? – शेखर सावे

उत्तर : आपल्या उत्पन्नात धंदा-व्यवसायाच्या उत्पन्नाचा समावेश नसेल तर विवरणपत्र भरण्याच्या मुदतीपूर्वी म्हणजे ३१ जुलै २०२१ पूर्वी कर भरावा लागेल हा कर ऑनलाइन किंवा आपल्या बँकेत २८० क्रमांकाच्या चलनाद्वारे भरता येईल. आपल्या उत्पन्नात धंदा-व्यवसायाच्या उत्पन्नाचा समावेश असेल तर आपल्याला ३१ मार्च २०२१ पूर्वी संपूर्ण कर अग्रिम कराच्या स्वरूपात भरणे अपेक्षित होते, आता व्याज भरून आपल्याला कर भरावा लागेल.

 

’ प्रश्न : मी गृहकर्ज घेतले आहे. या वर्षी काही कारणाने फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यांचे हप्ते भरू शकलो नाही. हे हप्ते मी पुढील आर्थिक वर्षात भरले तर त्याची वजावट मला पुढील वर्षी घेता येईल का? – प्रकाश कुलकर्णी     

उत्तर : गृहकर्जाच्या हप्त्यामध्ये व्याज आणि मुद्दल यांचा समावेश असतो. व्याजाची वजावट ‘कलम २४’नुसार घेता येते आणि मुद्दल परतफेडीची वजावट ‘कलम ८० सी’नुसार घेता येते. गृहकर्जावरील ‘देय व्याजाची’ वजावट उत्पन्नातून घेता येते ते प्रत्यक्षात त्या आर्थिक वर्षात दिले नसले तरी त्याची वजावट घेता येते. ‘कलम ८० सी’ मुद्दल परतफेडीची रक्कम प्रत्यक्ष दिली असल्यासच उत्पन्नातून वजावट घेता येते. त्यामुळे २०२०-२१ या आर्थिक वर्षात एकूण व्याजाची वजावट (न दिलेल्या व्याजाचीसुद्धा) घेता येईल आणि जी मुद्दल २०२०-२१ या वर्षात प्रत्यक्ष फेडली आहे त्याचीच वजावट या वर्षात घेता येईल, पुढील वर्षात फेडल्यास त्याची वजावट पुढील वर्षी घेता येईल.

 

’ प्रश्न : मला २०२०-२१ या आर्थिक वर्षात शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपनीच्या समभागाच्या विक्रीवर दीर्घ मुदतीचा भांडवली तोटा झाला हा तोटा मला इतर उत्पन्नातून वजा करता येईल का? – प्रशांत जोशी

उत्तर : दीर्घ मुदतीचा भांडवली तोटा हा फक्त दीर्घ मुदतीच्या नफ्यातूनच वजा करता येतो. आपल्याला या वर्षात इतर व्यवहारात दीर्घ मुदतीचा भांडवली नफा झाला असल्यास या नफ्यातून समभागाच्या विक्रीवरील दीर्घ मुदतीचा तोटा वजा करता येईल. हा तोटा पूर्णपणे वजा होत नसल्यास तो पुढील वर्षासाठी कॅरी फॉरवर्ड करता येईल आणि पुढील आठ वर्षांत तो फक्त दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यातूनच वजा करता येईल. परंतु हा तोटा पुढील वर्षासाठी कॅरी फॉरवर्ड करण्यासाठी या वर्षीचे विवरणपत्र मुदतीत दाखल करणे बंधनकारक आहे.

 

’ प्रश्न : मी नोव्हेंबर २०२० मध्ये एक सदनिका खरेदी केली होती आणि त्यासाठी मे २०२० मध्ये गृहकर्ज मंजूर झाले होते. मला गृहकर्जाच्या व्याजाची ‘कलम ८० ईईए’नुसार घेता येईल का? आणि ‘कलम २४’नुसारसुद्धा वजावट घेता येईल का?   – एक वाचक

उत्तर : ‘कलम ८० ईईए’ हे कलम काही वर्षांपूर्वी छोट्या घराच्या खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने अमलात आणले. ही वजावट १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० या काळात गृहकर्ज मंजूर झाले असेल तर लागू होती, हा कालावधी वेळोवेळी वाढविण्यात येऊन आता ३१ मार्च २०२२ पर्यंत मंजूर झालेल्या गृहकर्जासाठी लागू आहे. याशिवाय अजून काही अटींची पूर्तता केल्यास या कलमानुसार वजावट घेता येईल. करदात्याकडे, गृहकर्ज मंजूर होण्याच्या तारखेला, कोणत्याही घराची मालकी नसली पाहिजे, मुद्रांक शुल्काच्या मूल्यांकनानुसार घराचे मूल्य ४५ लाख रुपयांपेक्षा जास्त नसले पाहिजे आणि गृहकर्ज बँक आणि वितीय संस्थेकडूनच घेतले असले पाहिजे. या अटींची पूर्तता केल्यास ‘कलम ८० ईईए’नुसार १,५०,००० रुपयांची वजावट घेण्यास करदाता पात्र ठरेल. एकाच रकमेची वजावट दोन कलमानुसार घेता येत नाही. ‘कलम २४’नुसार २ लाख रुपयांपर्यंतची वजावट घेता येते. करदात्याने गृहकर्जावर २ लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज दिलेले असल्यास २ लाख रुपयांची वजावट ‘कलम २४’नुसार घेऊन, २ लाख रुपयांपेक्षा अतिरिक्त व्याजाची (दीड लाख रुपयांपर्यंत) ‘कलम ८० ईईए’नुसार (वरील अटींची पूर्तता केल्यास) वजावट घेता येईल.

लेखक सनदी लेखाकार आणि

कर सल्लागार आहेत.

pravin3966@rediffmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2021 12:05 am

Web Title: your income advance tax investment expenses akp 94
Next Stories
1 माझा पोर्टफोलियो : नव्या डिजिटल युगाची पायाभरणी
2 विमा… सहज, सुलभ : पॉलिसीवर ‘बोनस’
3 फंडाचा ‘फंडा’… : ‘सचिन’ गतवैभव मिळवून देईल?
Just Now!
X