या सदरात काही वर्षांपूर्वी (२०१२ मध्ये) सुचविलेला हा शेअर पोर्टफोलियोच्या वाचक गुंतवणूकदारांना चांगलाच फायदा देऊन गेलाय. ज्या गुंतवणूकदारांनी हा शेअर अजून बाळगला आहे त्यांना गेल्या सहा वर्षांच्या गुंतवणुकीवर ८०५ टक्के फायदा झाला आहे. परंतु ज्यांचा हा शेअर खरेदी करायचा राहून गेला असेल त्यांना हा शेअर खरेदी करण्याची ही चांगली संधी आहे. बाळकृष्ण इंडस्ट्रिज आणि गोविंद रबर समूहाचे प्रवर्तक पोद्दार समूहाची सियाराम सिल्क मिल्स ही कंपनी. १९८० मध्ये स्थापना झाल्यापासून कंपनीने खूपच चांगली प्रगती केली आहे. महाराष्ट्रात एकीकडे वस्त्रोद्योग अडचणीत असताना सियाराम मात्र प्रगतिपथावर राहिली. तारापूर आणि सिल्व्हासा येथील प्रकल्पातून कंपनीची मुख्य उत्पादने होतात. ऑक्सेम्बर्ग हा कंपनीचा प्रमुख ब्रॅण्ड असून, कंपनीच्या इतर ब्रॅण्डमध्ये कॅडिनी, कासा मोडा, जे हॅम्पस्टेड आणि सिया यांचा समावेश होतो. यापैकी सिया हा महिलांकरिता विकसित केलेला ब्रॅण्ड आहे. गेल्या आर्थिक वर्षांत कंपनीच्या गारमेंट विभागाने प्रभावी कामगिरी करून दाखविली आहे. नव्याने विकसित केलेल्या ब्रॅण्डमध्ये कॅडिनी हा आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड उत्तमरीत्या सादर करण्यात कंपनीला यश आले आहे. मार्च २०१८ साठी संपलेल्या आर्थिक वर्षांकरिता कंपनीने १७३२.७६ कोटी रुपयांच्या उलाढालीवर १११.५९ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या आर्थिक वर्षांच्या तुलनेत तो २२.६ टक्क्यांनी अधिक आहे. वाढत्या मागणीचा पुरवठा करण्यासाठी आणि आपली उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी कंपनीने गेल्या आर्थिक वर्षांत १२० कोटी रुपयांचा भांडवली खर्च केला आहे. यंदाच्या आर्थिक वर्षांतही कंपनी साधारण ३०-४० कोटी रुपयांचा भांडवली खर्च करेल. इन हाऊस कापडनिर्मिती तसेच गारमेंट विभागातून तयार कपडे आणि विकसित होणारे ब्रॅण्ड यामुळे येत्या दोन-तीन वर्षांत सियारामकडून अधिक भरीव कामगिरीची अपेक्षा आहे. सध्या ५०० रुपयांच्या आसपास उपलब्ध असलेला हा शेअर तुम्हाला येत्या दोन वर्षांत ४० टक्के परतावा देऊ शकेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सियाराम सिल्क मिल्स लि.          (बीएसई कोड – ५०३८११)

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Company profile for siyaram silk mills ltd
First published on: 09-07-2018 at 00:54 IST