गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात एस पी अपॅरल्सची प्रारंभिक खुली भागविक्री (आयपीओ) २५८ रुपये अधिमूल्याने झाली. त्यामुळे काही गुंतवणूकदारांना ही कंपनी कदाचित माहिती असेल. खरे तर १९८९ मध्ये स्थापन झालेली ही कंपनी भारतातील निटेड गारमेंट्स व्यवसायातील एक अग्रगण्य कंपनी आहे. एस पी अपॅरल्स लहान मुलांचे विणकाम केलेल्या तयार कपडय़ांचे केवळ उत्पादन नव्हे तर निर्यातही करते. किंबहुना कंपनीच्या एकूण उलाढालीपैकी सुमारे ८६ टक्के उत्पन्न निर्यातीचे आहे. सध्या युरोपमधील केवळ चार देशांत निर्यात करणारी ही कंपनी लवकरच अमेरिकेसह इतरही देशांत निर्यात करणार आहे. अमेरिका किंवा युरोपमध्ये बाजारपेठ काबीज करण्यासाठी उत्तम दर्जा आणि गुणवत्तेची आवश्यकता आहे. कंपनीच्या प्रमुख परदेशी ग्राहकांत प्रामुख्याने टेस्को, जॉर्ज, प्रायमार्क, मदर केअर आणि डय़ुन इ. कंपन्यांचा समावेश होतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लहान मुलांच्या तयार कपडय़ाचे उत्पादन करणारी एस पी अपॅरल्स ही जगातील चौथ्या क्रमांकाची मोठी कंपनी असून कंपनीची तामिळनाडूमध्ये २१ उत्पादन केंद्रे आहेत. यामध्ये १६,८७६ स्पिंडल्स, ४८७४ शिलाई मशीन्स, ७९ एम्ब्रॉयडरी मशीन्स, २२ डाइंग मशीन्स तर १७ प्रिंटिंग मशीन्स आहेत. सध्या कंपनी आपला विस्तारीकरणाचा कार्यक्रम राबवत आहे. येत्या दोन वर्षांत कंपनीच्या स्पिंडल्सची संख्या २२,२७२ तर शिलाई मशीन्स ५,२०० वर जातील. तसेच कंपनी ४० विणकाम करणारी मशीन्स बसवत असून, त्यामुळे कंपनीच्या उत्पादनात भरीव वाढ होईल आणि कंपनी आपल्या निर्यातीत वाढ करू शकेल. कंपनीकडे असलेला महत्त्वाचा ब्रॅण्ड ‘क्रोकोडाइल’च्या विस्तारीकरणासाठी कंपनीकडे ८५ वितरक तर ४,००० विक्री दालने आहेत. ऑनलाइन शॉपिंगमुळे तसेच उत्तम वितरण व्यवस्थेमुळे आता कंपनीकडे वाढती बाजारपेठ आहे. कंपनीचे आतापर्यंतचे आर्थिक निष्कर्ष अपेक्षेप्रमाणे आहेत. गेल्या तिमाहीसाठी कंपनीने १२८.८४ कोटी रुपयांच्या उलाढालीवर १४.०३ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. सध्या ४१० रुपयांच्या आसपास उपलब्ध असलेला हा समभाग तुम्हाला वर्षभरात २० टक्के परतावा देऊ  शकेल.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Company profile s p apparels ltd
First published on: 24-04-2017 at 01:05 IST