महिन्यातून एकदा प्रसिद्ध होणाऱ्या या सदरातून कुटुंबाच्या अर्थ नियोजनासंबंधाने प्रत्येक मुद्दय़ाचे सखोल चिंतन केले जाणार आहे.

आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या निर्णयांपैकी एक म्हणजे कुटुंबासाठी आर्थिक नियोजन करणे होय. वित्तीय नियोजनाबद्दल लोकांची एकंदर उदासीनता बघता, रवींद्र, रचना आणि त्यांची कन्या रिद्धी यांना भेटण्याचा योग परत इतक्या लवकर येईल असे वाटले नव्हते. परंतु दुसऱ्याच भेटीत हे जोशी कुटुंब अतिशय जागरूक आणि नवनवीन आर्थिक बाबी जाणून घेण्याच्या मानसिकतेचे आहे असे वाटले. कारण आमच्या भेटीदरम्यान त्यांनी त्यांच्या मनांतील अनेक प्रश्न समोर ठेवले जसे – काय गरज आहे वित्तीय नियोजनाची? इतक्या जाहिराती येतात मग कशाला हवे कोणी तज्ज्ञ वित्तीय सल्लागार? गुंतवणुकीसाठी कमीतकमी किती बचत करावी लागते? एवढय़ाशा बचतीची काय गुंतवणूक करणार? असे एक न अनेक प्रश्न..

Bombay high court, verdict, Compensation, acid attack victims
अ‍ॅसिड हल्ल्यातील जुन्या पीडितांना नवीन योजनेचा लाभ मिळणार
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : भारतीय राज्यव्यवस्था – मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये
cashew farmer marathi news, konkan farmer marathi news
काजू वायदे : कोकणातील उत्पादकांना वरदान

जमा-खर्चाचा ताळमेळ घालणे जमत नाही; जे बचत करू शकत नाहीत, अशा लोकांनाच तर खरी गरज असते – योग्य वित्तीय नियोजन करण्याची! वित्तीय नियोजन करणे गुंतागुंतीचे जरी असले तरी थोडय़ाशा अभ्यासाने, जागरूकतेने आणि वित्तीय सल्लागाराच्या मदतीने ते सहज शक्य आहे. पण इथे खरा कस लागतो तो गुंतवणूकदाराच्या जागरूकतेचा. त्याने वित्तीय सल्लागार कसा निवडावा तर तो कसा?

वित्तीय नियोजन करायचे एकदा ठरविले तर त्यासाठी योग्य वित्तीय सल्लागार निवडणे अतिशय महत्त्वाचे असून बदलत्या काळात आपला वित्तीय सल्लागार कसा असावा याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे तपासले गेले पाहिजेत. (सोबतची चौकट पाहावी.)

खरे तर आपण पैशाची बचत करतो तर ते भविष्यातल्या मोठय़ा जबाबदारीच्या पूर्ततेसाठी आणि ध्येयपूर्तीसाठी बचत केलेल्या पैशाला आपल्याही पेक्षा जास्त परिश्रम करायला लावणे म्हणजेच त्या बचतीची योग्य गुंतवणूक. योग्य गुंतवणुकीसाठी लागते ते योग्य वित्तीय नियोजन. आणि म्हणूनच वित्तीय नियोजनाचा मूळ हेतू हा प्रत्येक व्यक्तीची आर्थिक उद्दिष्ट ओळखण्यास मदत करून ती उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योजना आखणे हा आहे. यासाठी आपल्या वित्तीय सल्लागाराने त्याची सर्व क्षमता, अनुभव आणि ज्ञान – आपली आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी वापरणे अत्यंत गरजेचे ठरते. एकूणच पुरेशी दक्षता आणि नियम लक्षात घेऊन गुंतवणूक केल्यास आपल्या पैशाने पैसा वाढत जाणे हे पाहण्याइतके दुसरे आर्थिक समाधान नाही.

सुयोग्य वित्तीय सल्लागार कसा असावा?

१. वित्तीय नियोजनतील तज्ज्ञ आणि व्यवसायात उपक्रमशील : वित्तीय नियोजन खरे तर एक विशिष्ट असे शास्त्र आहे. हे क्षेत्र रोज नवनवीन सुधारित घटक समोर घेऊन येते. त्याचा नियमित अभ्यास करणे अतिशय आवश्यक असून त्यात सातत्याने काम करीत असलेली व्यक्ती त्या क्षेत्रातील तज्ज्ञ असते.

२. गुंतवणुकीच्या विविध पर्यायांची माहिती : वित्तीय सल्लागार सातत्याने गुंतवणुकीबाबत उपक्रमशील असावा. म्हणजे त्याला गुंतवणुकीच्या विविध पर्यायांची अचूक आणि सुधारित माहिती त्याला असते. एखाद्या व्यक्तीचे वित्तीय नियोजन करीत असताना, गुंतवणुकीच्या विविध पर्यायांची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे आणि अशा उपक्रमशील वित्तीय सल्लागाराची आपल्या वित्तीय नियोजनाला जोड मिळणे म्हणजे दुधात साखर!

३. गुंतवणूकदाराच्या आर्थिक उद्दिष्टांचा सखोल अभ्यास : योग्य वित्तीय सल्लागार ओळखण्याचा हा सर्वात उत्कृष्ट असा सोपा मार्ग आहे. वित्तीय नियोजनाची पहिली पायरी आहे – गुंतवणुकीची उद्दिष्टे. गुंतवणूकदाराला कशासाठी गुंतवणूक करावयाची आहे, हे जोपर्यंत स्पष्ट असणार नाही तोपर्यंत योग्य असे गुंतवणुकीचे पर्याय ठरूच शकत नाहीत. तज्ज्ञ वित्तीय सल्लागार गुंतवणुकीची उद्दिष्टे, कौटुंबिक परिस्थिती, कुटुंबाचे राहणीमान, वय, बचत करण्याची मानसिकता, जबाबदारी, जोखीम घेण्याची क्षमता, इ. घटकांवर विस्तृत चर्चा वा सखोल अभ्यास केल्याशिवाय योग्य वित्तीय सल्ला देत नाहीत.

४. निष्पक्षपाती सल्ला : गुंतवणूकदारांच्या आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेचा हेतू लक्षात घेऊन वित्तीय सल्लागाराने नियोजन करावयाचे असते, म्हणून वित्तीय सल्लागाराचा हेतू निष्पक्षपाती असणे आवश्यक आहे. आपण खात्री करणे आवश्यक असते की वित्तीय सल्लागाराचा दुसरा कुठलाही हेतू नसावा. उदाहरणार्थ, फक्त स्वत:च्या उत्पन्नाला वाढविण्याच्या हेतूखातर जास्त कमिशन मिळेल आणि गुंतवणूकदाराच्या उद्दिष्टय़पूर्तीसाठी योग्य नसलेले पर्याय त्याने सुचविता कामा नये. अशा वेळी शुल्काधारित वित्तीय नियोजनकार योग्य सल्ला देऊ शकतात. कारण त्यांचे मोबदला म्हणून शुल्क आधीच ठरलेले असते. म्हणजे त्यांचा मोबदला गुंतवणुकीसाठी निवडलेल्या पर्यायांवर अवलंबून नसतो.

दीपाली चांडक arthasanvad@gmail.com

लेखिका नाशिकस्थित अर्थ-अभ्यासक असून त्या ‘सेबी’, मुंबईतर्फे अर्थसाक्षरतेसाठी उपक्रमशील आहेत.