सध्या तंत्रज्ञान इतके प्रगत झाले आहे की, लहानपणी विचार केलेल्या उडत्या गाडीचे स्वप्न आता सत्यात उतरू लागले आहे. मात्र, यापेक्षाही अजून एक भन्नाट गाडीचा शोध एका ‘अति’हुशार व्यक्तीने लावल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पठ्ठ्याने चक्क समुद्राच्या पाण्यात आपली दुचाकी घातली आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरीदेखील चांगलेच अवाक आणि हैराण झाले आहेत. या व्हिडीओमध्ये नेमके काय आहे पाहू.

इन्स्टाग्रामवरील marathi_autoguru नावाच्या अकाउंटने शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती डोक्यावर हेल्मेट घालून, गडद निळ्या रंगाची ‘ओला स्कूटर’ चालवीत चक्क समुद्रात घेऊन गेलेला आपण पाहू शकतो. बरे आता तुम्ही म्हणाल यात काय विशेष आहे? असे अनेकांनी केल्याचे व्हिडीओ आम्ही पाहिले आहेत.

हेही वाचा : पट्ठ्याने Blinkit चा वापर चक्क नोकरी मिळवण्यासाठी केला! सोशल मीडियावर ‘हा’ Photo होतोय व्हायरल…

मात्र, या पठ्ठ्याने संपूर्ण गाडी बुडेल इतक्या खोल पाण्यात ही इलेक्ट्रिक दुचाकी घातली होती. मोठमोठ्या लाटांनी गाडी आणि दुचाकी चालविणारी व्यक्ती संपूर्ण भिजल्याचे दृश्य व्हायरल व्हिडीओत आपण पाहू शकतो. आता इलेक्ट्रिक गाडी पाण्यात गेल्यावर ती बंद पडली असेल, असा अनेकांचा समज होऊ शकते; मात्र तसे मुळीच झालेले नाही. लाटांचा जोर वाढू लागल्यानंतर, गाडी चालविणाऱ्या व्यक्तीने अथक प्रयत्न करून ती गाडी वळवली. दुचाकी वळविल्यावर तिचे हेडलाईट्स चालू असल्याचे आपल्याला दिसते. यावरूनच समुद्राच्या इतक्या खोल पाण्यात जाऊनही ओलाची ती इलेक्ट्रॉनिक स्कूटर काम करीत आहे, असे आपण समजू शकतो.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये “भाऊ ओला इलेक्ट्रिक स्कुटर घेऊन गेला समुद्रात! नेक्स्ट लेव्हल टेस्टिंग’ असा मजकूर लिहिला आहे. म्हणजेच हा व्हिडीओ मजेसाठी नसून, गाडीच्या टेस्टिंगसाठी तयार केल्याचे आपण समजू शकतो. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या भन्नाट ‘टेस्टिंग’ व्हिडीओवर नेटकरी काय म्हणतात ते पाहू.

“पण हेल्मेट घालून का गेला ते नाही समजलं?”, असे एकाने लिहिले आहे.
“भाऊपण ओला, स्कूटरपण ओला!”, अशी मजेशीर प्रतिक्रिया दुसऱ्याने दिली आहे.
“अच्छा! म्हणजे ही गाडी फक्त रस्त्यावर त्रास देते..”, असे तिसऱ्याने म्हटले आहे.
“थोडा अजून आतमध्ये गेला असता, तर मजा आली असती टेस्टिंगची”, असे चौथ्याने लिहिले आहे.
तर शेवटी पाचव्याने, “तसेच अजून पुढे जायचे होते ना! म्हणजे नवीन शोध लागला असता. बोटीतून न जाता, आम्हीपण ओला नेल्या असत्या….” असे म्हटले आहे.

हेही वाचा : Video : अमेरिकन यूट्युबरला पडली भारतीय ‘मसाज’ची भुरळ! “याला कामावर घ्या…” चक्क इलॉन मस्ककडे केली मागणी

इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @marathi_autoguru नावाच्या अकाउंटने शेअर केलेल्या या व्हायरल व्हिडीओला आतापर्यंत ८७१K इतके व्ह्युज मिळाले आहेत.