वर्ष १९९९ मध्ये स्थापना झालेली पीएनसी इन्फ्राटेक ही उत्तर भारतातील एक आघाडीची पायाभूत क्षेत्रातील कंपनी असून ती मुख्यत्वे रस्ते आणि महामार्ग बांधणी, ईपीसी तसेच औद्योगिक क्षेत्रांचे विकसन अशा विविध प्रकल्पात कार्यान्वित आहे. कंपनीचे बहुतांश प्रकल्प उत्तर भारतात आहेत. ५,१०० कोटी रुपयांची ऑर्डर बुक असलेल्या पीएनसी इन्फ्राटेकला यंदाच्या आर्थिक वर्षांत १,४०० कोटी रुपयांच्या ऑर्डर मिळाल्या आहेत. एनएचएआयच्या ४८,१०० कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी ११ टक्के काम पीएनसीकडे आहे. एल अँड टीच्या (१२ टक्के) खालोखाल ही क्रमवारी आहे. आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर कंपनीने गेल्या पंधरा वर्षांत ३४ रस्ते प्रकल्प, १९ विमानतळ धावपट्टय़ांचे प्रकल्प तसेच सहा बीओटी प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण केले आहेत. जून २०१६ साठी संपलेल्या पहिल्या तिमाहीसाठी ५१५ कोटी रुपयांच्या उलाढालीवर कंपनीने ६४ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या तिमाहीच्या तुलनेत तो १४६ टक्क्यांनी  जास्त आहे. सरकारच्या महत्त्वाकांक्षी पायाभूत प्रकल्पांच्या योजनांमुळे आगामी काळात कंपनीकडून अजूनही सरस कामगिरी अपेक्षित आहे. यंदाच्या आर्थिक वर्षांत सुमारे ८,००० कोटी रुपयांचे प्रकल्प मार्गी लावण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. गेल्या आर्थिक वर्षांच्या तुलनेत ते ४४ टक्क्यांनी जास्त आहे. तसेच एनएचएआयला यंदा २५,००० किलोमीटर रस्ते बांधायचे कंत्राट सरकारकडून मिळण्याची शक्यता आहे. त्याचाही फायदा पीएनसीला मिळेल अशी अपेक्षा आहे. केवळ ११ पटींच्या आसपास किंमत उत्पन्न (पी/ई) गुणोत्तर असलेली आणि अत्यल्प कर्ज असलेली पीएनसी इन्फ्राटेक म्हणूनच खरेदीसाठी आकर्षक शेअर वाटतो. १८ महिन्यांच्या गुंतवणूक कालावधीवर ३० टक्के परतावा अपेक्षित आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pnc infratech limited portfolio
First published on: 10-10-2016 at 01:16 IST