अर्थसाक्षरतेचे मानसशास्त्र भाग-७
मागील भागात आर्थिक बाबी व पाल्याच्या विकासाच्या अवस्था, त्याची वैशिष्टय़े आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या पालकांच्या जबाबदाऱ्या आपण पाहिल्या. यामध्ये शैशवावस्था (शून्य ते ५ वर्षे) आणि किशोरावस्था (६ ते १२ वर्षे) यांचा आपण आढावा घेतला. या पुढची अवस्था म्हणजे कुमारावस्था (ळील्लंॠी – १३ ते १९ वर्षे) होय. किशोरावस्था आणि पौगंडावस्था दरम्यानच्या मुलांच्या विकासातील या सर्वात नाजूक अवस्थेची वैशिष्टय़े आणि पालकांची भूमिका काय असावी, याबद्दल आपण विस्ताराने पाहू.
कुमारावस्थेची वैशिष्टय़े
* या वयात मुलांना पालकांच्या मार्गदर्शनाशिवाय मिळणारे पैसे खर्च करता यावेत असे वाटते.
* पाल्य सर्वसाधारणपणे खर्च करण्यासाठी मिळणाऱ्या रकमेबाबत असमाधानी असतात.
* ते आपल्या गरजांसाठी मित्रांकडून उसने पैसे मागू शकतात.
* त्यांना किंमत ठरवणे व तुलना करून तपासणे या गोष्टी समजतात.
* इतरांच्या दृष्टिकोनातून आर्थिक बाबींचा विचार करायला शिकतात.
* बऱ्याचदा हट्टी व अवास्तव आर्थिक मागण्या करतात.
* त्यांना स्वतंत्रपणे निर्णय घ्यायला आवडतात, पण आर्थिक बाबींसाठी पालकांवर अवलंबून असतात.
* त्यांच्या शालेय व सामाजिक बाबतीत खर्चीक मागण्या वाढतात.
* मित्रपरिवाराचा आर्थिक बाबतीत बराच प्रभाव असतो.
* त्यांना कमावणे, बचत आणि गुंतवणूक याबाबतीत समाज असते.
* त्यांना नोकरी व्यवसाय आणि उत्पन्न या बाबी समजतात.
* स्वत:ला पैसा कमावता व वापरता यावा या विषयी विचार करतात.
* आर्थिक जबाबदाऱ्या मिळाव्यात असे वाटते.
पालक काय शिकवू शकतात?
* खर्च, बचत आणि गुंतवणूक याची जागरूकता आणण्यासाठी त्याना पैश्यांचा खर्च, त्या संबंधित हिशोब व पावत्या ठेवण्याचा नियम करावा (तुम्हीही पाळावा) आणि त्याची सवय लावावी. त्यामुळे त्यांची खर्चाविषयी जबाबदारी व त्याची जाणीव वाढण्यास मदत मिळेल.
* वस्तूंच्या किमतींविषयी चर्चा करावी : नोकरी करणारे आणि शिक्षकांचे असे मत आहे की, मुलांना वस्तूंच्या किमती माहीत नसतात. त्याचं कारण असं आहे की, घरातील किराणा खरेदी नेहमी पालक करतात. आपल्या मुलांना त्या जबाबदारीत समाविष्ट करीत नाहीत. पण या आर्थिक व्यक्तिमत्त्वासाठी महत्त्वाचा सराव असणाऱ्या गोष्टी आहेत. पूर्णपणे नाही तरी त्या त्या वेळेनुसार त्यांना अशा जबाबदाऱ्या दयाव्यात. त्यामुळे पैशाचे मूल्य समजायला मदत होते.
– त्याच्याशी चर्चा करा की एखादी वस्तू खरेदी करताना त्यासाठी किती तास काम केल्यावर ती वस्तू खरेदी करता येते. गरिबांसाठी, मध्यमवर्गीयांसाठी त्याचे मूल्य काय आहे.
* त्याला सामाजिक संस्थांना जसे अनाथाश्रम, वृद्धाश्रम यांना भेट देऊन त्याच्या हस्ते देणग्या दिल्या/ पाठवल्याने त्याला जीवन जगण्याचा संघर्ष, वायफळ खर्च आणि जबाबदारी कळण्यास मदत मिळू शकते .
* बँकांचे हप्ते, व्याजदर, फोन बिल, वीज बिल, दूध बिल, किराणा, शैक्षणिक खर्च, दवाखाना इतर खर्च याविषयी माहिती द्यावी. काही प्रमाणात जबाबदाऱ्याही द्याव्यात तसेच प्रत्येक बिलावरील तपशील वाचण्याची सवय लावावी.
* फक्त महत्त्वाच्या गोष्टींसाठीच पैसा आहे आणि अनावश्यक गोष्टींसाठी नाही त्यासाठी शिस्त लावावी. प्रसंगी कठोरही बनावे.
* त्याचे मित्र, त्याच्या सवयी पैसा कुठे खर्च होतो याकडे बारीक लक्ष ठेवावे आणि चातुर्याने त्यावर उपाय काढावे. उदाहरणार्थ, जिम, मैदानी खेळ, स्विमिंग, बुद्धिबळ, संगीत अशा गोष्टीत त्याला गुंतवावे.
* भावनिक भरात आणि मोह झाला म्हणून खरेदी करण्याची सवय मोडावी.
* खर्चाविषयी पूर्वकल्पना देणे आणि पाठपुरावा करणे या सवयी लावाव्या.
* बचतीचे महत्त्व कळावे म्हणून त्याच्या नावाने खाती असतील तर त्यालाच पैसे भरून त्याच्या भविष्यात होणाऱ्या फायद्याची प्रक्रिया त्याच्या नजरेसमोर ठेवावी.
* व्यक्तिमत्त्व घडणे ही प्रक्रिया एका दिवसात होत नाही आणि त्यात बदलही एका दिवसात होत नाही त्यामुळे अनुभवातून आणि चातुर्याने प्रशिक्षण देणे महत्त्वाचे असते.
* त्याची पैशांसंबंधी मते जाणून घ्यावीत व त्याला योग्य निर्णय घेण्याच्या संधी द्याव्यात.
* सहलींना किंवा प्रवासाला जाताना नियोजनाच्या जबाबदाऱ्या पाल्यांना द्याव्यात.
* आर्थिक गुंतवणुकीच्या विषयांसंबंधी खोल अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे.
* विविध विम्यांसंमंधी जागरूकता व ओळख करून द्यावी.
* पाल्याबरोबर त्याच्या भविष्यातील आर्थिक ध्येयांसंबंधी चर्चा कराव्यात.
* महत्त्वाचे आर्थिक व्यवहार करताना पाल्यांना सामील करावे त्यामुळे त्यांना अनुभव व आत्मविश्वास वाढण्यास मदत मिळते.
* महत्त्वाच्या आर्थिक कागदपत्रांची माहिती शिकवावी.
* पाल्याला स्वत:च्या अनुभवातून शिकण्याच्या संधी द्याव्यात व दुसऱ्यांच्या अनुभवातूनही कसे शिकावे याचे प्रशिक्षण द्यावे.
पुढील भागापासून आपण वेगवेगळ्या आर्थिक व्यक्तिमत्त्वांविषयी सविस्तर पाहू.
आपल्या अमूल्य प्रतिक्रिया जरूर कळवा़
किरण लाळसंगी kiranslalsangi @gmail.com
लेखक पुणेस्थित समुपदेशक आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Responsibilities and parents rights in development phase of teenagers
First published on: 04-07-2016 at 01:05 IST