राजा विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. तलवार उपसून पुन्हा तो झाडावर चढला अन् फांदीवर लटकणाऱ्या प्रेताला खांद्यावर घेऊन मौनात चालू लागला. त्यासरशी प्रेतामधला वेताळ प्रश्न विचारू लागला – ‘राजा, तू मागे ‘एल अ‍ॅण्ड टी इन्फोटेक’बाबतीत वर्तविलेले भविष्य खरे ठरले. एका बाजूला निर्देशांक वरती कूच करीत असताना एल अ‍ॅण्ड टी इन्फोटेकने मागील आठवडय़ात ६३८ रुपयांचा नीचांक गाठला. याच मातृ कंपनीची ‘एल अ‍ॅण्ड टी टेक्नोलॉजी सव्‍‌र्हिसेस’ ही दुसरी एक उपकंपनी. तिची खुली समभाग विक्री पुढील सोमवारी खुली होत आहे. या कंपनीबाबत तुझे काय मत आहे हे जाणून घेण्यास गुंतवणूकदार उत्सुक आहेत. या कंपनीला अर्ज करावा का या प्रश्नाचे उत्तर ते तू सांगितले नाहीस तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्याच पायावर लोळू लागतील,’ वेताळाने राजाला सांगितले.

‘आरबीएल बँकेच्या खुल्या भागविक्रीला मिळालेल्या प्रतिसादामुळे व बाजारात समभागांच्या पदार्पणातच गुंतवणूकदारांना भरघोस नफा मिळाल्यामुळे अनेक वैयक्तिक गुंतवणूकदार ‘आयपीओ’कडे आशाळभूतपणे वळलेले दिसत आहेत. त्यामुळे साहजिकच तुझ्यामार्फत त्यांनी मला हा प्रश्न विचारला असे वाटते. ‘एल अ‍ॅण्ड टी टेक्नोलॉजी सव्‍‌र्हिसेस’च्या समभाग विक्रीच्या प्रस्ताव दस्तऐवजाला १ सप्टेंबर रोजी मान्यता मिळाली. समभाग विक्रीला पुढील सोमवारी प्रारंभ होत आहे. ही कंपनी अभियांत्रिकी उत्पादन संशोधन व विकास उद्योगात असून प्रामुख्याने दळणवळण, औद्योगिक उत्पादने, उच्च तंत्रज्ञानावर आधारित प्रक्रिया उद्योग, वैद्यकीय उत्पादने व टेलिकॉम या पाच प्रकारच्या सेवा पुरवठादार कंपनी असून औद्योगिक उत्पादने, उच्च तंत्रज्ञानावर आधारित प्रक्रिया उद्योग, वैद्यकीय निदानासाठी वापरली जाणारी उत्पादने या सेवा गटातून कंपनीची ५०.३ टक्के विक्री होते,’ राजा म्हणाला.

‘या कंपनीचे ग्राहक मुख्यत्वेकरून दूरसंचार कंपन्या औद्योगिक उत्पादननिर्मितीच्या व्यवसायात असणाऱ्या कंपन्या, रसायन व तेल शुद्धीकरण कारखान्यासाठी प्रक्रिया यंत्रसामग्री तयार करणारे उद्योग आहेत. कंपनीच्या महसुलाचा मोठा वाटा भारताबाहेरील ग्राहकांकडून येतो. युरोप व उत्तर अमेरिका खंडातील ग्राहकांचा ८०.२५ टक्के वाटा असल्याचे कंपनीने माहिती पत्रकात म्हटले आहे. कंपनीने विशिष्ट उद्योगांसाठी विकास केंद्रे व चाचणीसाठी प्रयोगशाळांची स्थापना केली असून कंपनी उत्पादन विकास क्षेत्रात एक नामांकित कंपनी समजली जाते. रेल्वे, जहाज बांधणी, ऊर्जा संवर्धन या क्षेत्रात कंपनी एखादे उत्पादन विकसित करण्यासाठी आवश्यक त्या सर्व टप्प्यांवर सेवा पुरवठादार आहे.’

‘१० रुपये दर्शनी मूल्य असलेल्या आपल्या समभागांच्या विक्रीसाठी कंपनीने ८५० ते ८६० रुपये हा किंमत पट्टा ठेवला असून वैयक्तिक गुंतवणूकदारांना ८६० रुपये भावाने आपला अर्ज दाखल करावा लागेल. कंपनीने मागील आर्थिक वर्षांत ३१,७५७ कोटींच्या विक्रीवर ४,१६६ कोटी नफा कमावला आहे. ३० जून रोजी संपलेल्या तिमाहीचे उत्सर्जन १२.७५ रुपये, तर मागील संपूर्ण वर्षांचे उत्सर्जन ४३.५२ रुपये होते. विक्रीपश्चात वाढीव भांडवलावर कंपनीचे उत्सर्जन ३२.१० रुपये असून ८६० रुपयांच्या भावात कंपनीचा ‘पी/ई’ २६.७६ आहे. कंपनीचा व्यवसाय आर्थिक आवर्तनाशी निगडित असल्याने आगामी ४-६ वर्षे कंपनीसाठी भरभराटीची जातील. कंपनीचा व्यवसाय बौद्धिक कौशल्याशी जवळचा संबंध असलेला असल्याने व या विषयातील अपुऱ्या मनुष्यबळामुळे असाच व्यवसाय स्पर्धकाला उभा करणे कठीण आहे. कंपनीने समभाग विक्रीसाठी ठरविलेली किंमत रास्त असून हा एक ‘स्मार्ट आयपीओ’ असून गुंतवणूकदारांना समभागाची नोंदणी झाल्यानंतर १०-२० टक्क्य़ांदरम्यान भांडवली लाभ मिळणे शक्य होईल,’ राजा म्हणाला. अशा तऱ्हेने राजाचे मौन भंगल्यामुळे वेताळ शवासहित गायब झाला आणि झाडावर जाऊन बसला.

पुंगीवाला  gajrachipungi @gmail.com