scorecardresearch

लक्ष्मीची पाऊले..: पैसा व्हावा मोठा ; बँकिंग आणि फायनान्स फंड

भारतीय गुंतवणूकदारांना आपल्या देशाच्या ‘विकसनशील ते विकसित’ या महामार्गावरील संक्रमणामध्ये, संपत्तीनिर्मितीच्या असंख्य वाटा दिसत राहणार आहेत.

( संग्रहित छायचित्र )

समीर नेसरीकर
भारतीय गुंतवणूकदारांना आपल्या देशाच्या ‘विकसनशील ते विकसित’ या महामार्गावरील संक्रमणामध्ये, संपत्तीनिर्मितीच्या असंख्य वाटा दिसत राहणार आहेत. ‘बँकिंग आणि फायनान्स’ ही त्यापैकी एक अति-महत्त्वाची वाट..

माझी बँकेशी पहिली भेट साधारण तिसरीत असतानाची असावी. बाबा महिन्यातून एकदा बँकेत जायचे, मलाही घेऊन जायचे. एका जाळीच्या केबिनमधून एक हात नोटा घेऊन वर येत असायचा, मला कुतूहल वाटायचं. कधी तरी असाच गेलो असताना बाबांनी मला उचललं आणि नोटा मोजायला सांगितल्या. आज ‘बँकिंग आणि फायनान्स’ या क्षेत्रावर लिहिताना ही बँकेशी, पैशांशी झालेली पहिली भेट अंधूकशी आठवते.

त्या पहिल्या भेटीनंतर आज मागोवा घेताना असं दिसतंय की, गेल्या वीस वर्षांत आमूलाग्र परिवर्तन घडलंय या क्षेत्रात. काय आहे हे ‘बँकिंग आणि फायनान्स’ क्षेत्र? या क्षेत्राची व्याप्ती खूपच मोठी आहे. यात सरकारी बँका, खासगी बँका, आरोग्य आणि साधारण विमा कंपन्या, एनबीएफसी, गृह वित्त कंपन्या, म्युच्युअल फंड अशा सर्वच शाखांमधील कंपन्यांचा समावेश आहे. ‘निफ्टी ५०’ निर्देशांकातील जवळजवळ ३५ टक्के हिस्सा ‘फायनान्शिअल सव्‍‌र्हिसेस’ या क्षेत्रातील कंपन्यांमधून येतो. यावरून या क्षेत्राच्या व्याप्तीचा आपल्याला अंदाज येऊ शकतो. भारताच्या आर्थिक प्रगतीचा आधारस्तंभ असलेले हे क्षेत्र आहे.

आपल्या देशाच्या लोकसंख्येचा विचार केला तर वरील नमूद केलेल्या सर्वच उपशाखांना वाढीसाठी प्रचंड वाव आहे. सरकारच्या धोरणांमुळे गेल्या काही वर्षांत ‘बँक खाती’ मोठय़ा प्रमाणात जरी उघडली गेली असली तरी यात अजून वाढ अपेक्षित आहे. पूर्वी कोणत्याही बँकेतून वस्तू खरेदीच्या कर्जासाठी लेखी अर्ज करायला लागायचा. मग आठवडय़ाने त्यावर निर्णय व्हायचा. आता ‘डिजिटल’ व्यवहारांमुळे काही मिनिटांमध्येच तुमची कर्ज परतफेड करण्याची क्षमता (सिबिल स्कोर) तपासली जाते आणि तात्काळ कर्जवितरण होते. आता बहुतांश बँकेचे व्यवहार ‘मोबाइल’मधूनच होतात (‘यूपीआय’वर आधारित), हे ‘फिझिकल टू डिजिटल’ परिवर्तन आता मोठय़ा वेगाने पुढे सरकते आहे. बँकांच्या कर्ज वितरणात हळूहळू वाढ होतेय, वाढलेल्या व्याजदरांमुळेसुद्धा बँकांना फायदा होईल. तसेच बँकांचे ‘ताळेबंद’ कोविडपूर्व काळापेक्षा भांडवल पर्याप्तता, तरतुदींबाबत अधिक मजबूत आहेत.

कोविडच्या अनुभवांनंतर विमा घेणाऱ्यांची संख्या वाढली असली तरी प्रगत देशांतील प्रमाण गाठण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. तसेच ज्यांचा विमा आहे त्यांनी ‘पर्याप्त’ विमा घेतला आहे का, याचा आकडासुद्धा या क्षेत्राच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करतोय. पुढील दशकात विमा क्षेत्र तंत्रज्ञानाच्या मदतीने एक वेगळीच उंची गाठेल यात शंकाच नाही.

मागील काळात व्याजदर कमी असण्याचा फायदा गृह वित्त कंपन्यांना झाला आणि कर्ज मागणी वाढली. सध्या व्याजदर वाढलेले असले तरी कोविडनंतर वैयक्तिक आयुष्यात घरांना असलेल्या प्राधान्यामुळे कर्जाची मागणी यापुढील काळातही टिकून राहील.या सर्वासोबतच या लेखमालेतून ज्याविषयी आपण वाचतो त्या ‘म्युच्युअल फंड’ व्यवस्थापन कंपन्यासुद्धा या ‘बँकिंग आणि फायनान्स’ क्षेत्रात येतात. निप्पॉन, बिर्ला, एचडीएफसी, यूटीआयसारख्या फंड व्यवस्थापन कंपन्या भांडवल बाजारात सूचिबद्ध आहेत. भारतात म्युच्युअल फंड ‘एयूएम टू जीडीपी’ प्रमाण (साधारण १५ टक्के) हे जागतिक प्रमाणापेक्षा खूपच कमी आहे. पुढील काळात जसा म्युच्युअल फंडांचा प्रसार निमशहरी, गाव-खेडय़ात होईल, तशी फंड व्यवस्थापन कंपन्यांच्या नफ्यात अधिक वाढ होईल.

देशातील ‘यंग पॉप्युलेशन’चा हे क्षेत्र मोठं करण्यामध्ये मोठा सहभाग आहे आणि पुढेही असणार आहे. हेच बघा ना, आपल्यापैकी ‘हाफ सेंच्युरी’च्या अवतीभवतीची बहुतांश मंडळी ‘अंथरूण पाहून पाय पसरावे’ या शिकवणीला धरून आयुष्य जगली. पण आजच्या तरुण पिढीचा दृष्टिकोन हा वेगळा आहे, तो महत्त्वाकांक्षी आहे. ‘बाय टुडे, पे लेटर’ या मंत्रानुसार आयुष्य मुक्तहस्ते जगावे याला प्राधान्य आहे. कोणत्याही अर्थव्यवस्था या अशाच मागणीच्या आणि क्रयशक्तीच्या जोरावर चालतात. आपल्या देशातील कामकरी लोकसंख्या वाढते आहे. त्यांच्या हातातील पैसा वाढतो आहे. त्यामुळे त्यांच्याकडून बँकिंग, विमा, गृह कर्ज, क्रेडिट कार्डस, वस्तू कर्ज यांना मागणी वाढत जाईल.

आता फंडांविषयी बोलू या. ‘बँकिंग आणि फायनान्स’ या क्षेत्रात साधारणत: सर्वच समभागसंलग्न फंडांची गुंतवणूक असते; पण या क्षेत्रावर आधारित काही विशिष्ट क्षेत्रीय फंड (‘सेबी’ नियमानुसार, ८० टक्क्यांपेक्षा जास्त एका क्षेत्रामध्ये गुंतवणूक असणारे) आहेत, त्यांनी कशी कामगिरी केली आहे ते बघू या.

दीर्घकालीन वार्षिक वृद्धिदराचा (१० वर्षे) विचार करता, मे २०२२ अखेरीस आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल बँकिंग अँड फायनान्शिअल सव्‍‌र्हिसेस, निप्पॉन इंडिया बँकिंग अँड फायनान्शिअल सव्‍‌र्हिसेस, यूटीआय बँकिंग अँड फायनान्शिअल सव्‍‌र्हिसेस या फंडांनी अनुक्रमे १७.२४ टक्के, १४.४४ टक्के आणि ११.५० टक्के असा परतावा दिला आहे. या फंडांच्या पोर्टफोलिओमध्ये एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक, एसबीआय, बजाज फायनान्स, एचडीएफसी (गृह वित्त कंपनी), एसबीआय कार्डस, आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स, एचडीएफसी अॅासेट मॅनेजमेंट अशा या क्षेत्रातील दादा कंपन्यांचा भरणा आहे. ज्यांना या क्षेत्रीय फंडात गुंतवणूक करायची आहे ते ‘एसआयपी’मार्फत या श्रेणीतील फंडात सुरुवात करू शकतात.

जागतिक भांडवली बाजारातील उलाढालीचा आणि जागतिक कंपन्यांच्या आकाराचा विचार करता, भारतीय गुंतवणूकदारांना आपल्या देशाच्या ‘विकसनशील ते विकसित’ या महामार्गावर चालताना, संपत्तीनिर्मितीच्या असंख्य वाटा दिसत राहणार आहेत. ‘बँकिंग आणि फायनान्स’ ही त्यापैकी एक अति-महत्त्वाची वाट. या वाटेवर चालताना एक गुंतवणूकदार म्हणून आपल्या गाठीचा पैसा अधिक मोठा व्हावा, हीच अपेक्षा आहे.

(लेखक मुंबईस्थित गुंतवणूकविषयक अभ्यासक)
sameernesarikar@gmail. com
(म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजार जोखमींच्या अधीन असते. गुंतवणूक करण्यापूर्वी फंडाचे माहितीपत्रक कृपया सखोल अभ्यासा.)

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त ( Arthvrutant ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Banking and finance fund indian investors developing to evolving amy