अजय वाळिंबे
डॉ. के. के. बिर्ला यांनी १९८५ मध्ये स्थापन केलेली ‘चंबल फर्टिलायझर्स अँड केमिकल्स लिमिटेड’ आज देशातील आघाडीची खत उत्पादक कंपनी असून भारतातील एकूण उत्पादित युरियाच्या सुमारे १३ टक्के वाटा कंपनीचा आहे. दोन दशकांहून अधिक काळापासून कंपनीने देशाच्या अन्न सुरक्षेसाठी जबाबदारीने योगदान दिले आहे. कंपनीचे तीन हायटेक नायट्रोजनयुक्त खत (युरिया) प्रकल्प राजस्थानच्या कोटा जिल्ह्य़ातील गाडेपन येथे आहेत. या तिन्ही प्रकल्पांची वार्षिक उत्पादन क्षमता सुमारे ३४ लाख मेट्रिक टन असून ती भारतातील आघाडीच्या कृषी राज्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या युरियाच्या मोठय़ा प्रमाणात योगदान देते. हे सर्व प्रकल्प डेन्मार्क, इटली, अमेरिका आणि जपानमधील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतात.

कंपनीचा अलीकडेच सुरू झालेला गाडेपन हा प्रकल्प एक अत्याधुनिक खत प्रकल्प असून तो जगातील सर्वात कार्यक्षम प्रकल्प समजला जातो. या प्रकल्पाची वार्षिक उत्पादन क्षमता १३.४ लाख टन युरिया आहे.

चंबल फर्टिलायझर्स भारताच्या उत्तर, पूर्व, मध्य आणि पश्चिम भागातील दहा राज्यांमधील शेतकऱ्यांच्या प्रमुख गरजा पूर्ण करते तसेच कंपनी राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब आणि हरियाणा राज्यातील प्रमुख खत पुरवठादार आहे. कंपनीची १९ क्षेत्रीय कार्यालये, २,८०० डीलर्स आणि ५०,००० किरकोळ विक्रेत्यांचे विपणन नेटवर्क आहे. देशातील खासगी क्षेत्रातील युरिया उत्पादकांमध्ये कंपनीचा सर्वाधिक बाजार हिस्सा आहे.

कंपनीने सर्व कृषी उत्पादने ‘सिंगल विंडो’द्वारे पुरविण्याचा प्रयत्न केला आहे जेणेकरून शेतकरी सर्व स्रोतांकडून सर्व उत्पादने खरेदी करू शकतील. कंपनीचे डिलर्स युरिया आणि इतर कृषी-निविष्ठा जसे डीएपी (डी-अमोनियम फॉस्फेट), एमओपी (म्युरेट ऑफ पोटॅश), एसएसपी (सिंगल सुपर फॉस्फेट) आणि कीटकनाशके पुरवतात. यापैकी बहुतेक उत्पादने नामांकित पुरवठादारांकडून घेतली जातात आणि ‘उत्तम’ या प्रसिद्ध ब्रँड अंतर्गत विकली जातात. कंपनीचे उत्तर भारतात कीटकनाशक व्यवसायात नेतृत्व आहे.

मार्च २०२१ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षांकरिता कंपनीने १२,७१९ कोटी रुपयांच्या उलाढालीवर १,३४७ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला होता, तर नुकत्याच संपलेल्या जून २०२१ अखेर समाप्त तिमाहीसाठी कंपनीने गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत १० टक्के वाढ दाखवून ३,५४० कोटी रुपयांच्या उलाढालीवर ३४२.१७ कोटींचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या काही वर्षांत कंपनीने कर्जाचा भार कमी केला असून कंपनीचे गेल्या तीन वर्षांचे रिटर्न ऑन इक्विटीदेखील (सरासरी २८.६१ टक्के) उत्तम आहे. केवळ ०.५ बिटा असलेली ही कंपनी तुम्हाला मध्यम कालावधीत उत्तम परतावा देऊ  शकेल.

चंबल फर्टिलायझर्स अँड केमिकल्स लिमिटेड

(बीएसई कोड – ५०००८५)

शुक्रवारचा बंद भाव : रु. ३२०

उच्चांक/ नीचांक : रु. ३२६/१३३

बाजार भांडवल : रु. १३,३११ कोटी

भरणा झालेले भागभांडवल :  रु. ४१६.२१ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक  :                  ६०.३८

परदेशी गुंतवणूकदार            ८.४२

बँक/ म्यु. फंड / सरकार        १५.०३

इतर / जनता                १६.१७

संक्षिप्त विवरण

* शेअर गट          : मिड कॅप

* प्रवर्तक             : के के बिर्ला समूह

* व्यवसाय क्षेत्र        : खते / रसायने

* पुस्तकी मूल्य        : रु. १२६.१०

* दर्शनी मूल्य        : रु. १०/-

* गतवर्षीचा लाभांश       : ७५%

शेअर शिफारसीचे निकष

*  प्रति समभाग उत्पन्न: रु. ३३.०४

*  पी/ई गुणोत्तर :      ९.६८

*  समग्र पी/ई गुणोत्तर :       १३

* डेट इक्विटी गुणोत्तर :        ०.६

* इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर :     ११.१

* रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड : २०.९

* बीटा :       ०.५

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.