श्रीकांत कुवळेकर ksrikant10@gmail.com

गेली दोन ते तीन वर्षे या स्तंभामधून कमॉडिटी मार्केट म्हणजे नक्की काय?, देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये त्याचे नेमके महत्व काय?, या बाजाराची उपयुक्तता कोणाकोणाला आणि कशी आहे?, तर निव्वळ गुंतवणूक म्हणूनही कमॉडिटी मार्केट कसे वापरता येईल? अशा अनेक पैलूंबाबत माहिती दिली गेली आहे. ही  माहिती अर्थशास्त्राप्रमाणे बोजड वाटून त्यातला रस निघून जाऊ नये म्हणून या सर्व गोष्टींना आपल्या दैनंदिन व्यवहारातील तसेच आजूबाजूला घडणाऱ्या घटनांशी त्याची सांगड घालून ती उलगडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. यामधून प्रबोधनाबरोबरच प्रत्यक्ष कृती अपेक्षित होती. एकंदरीत या काळात शेतकऱ्यांपासून ते कृषी विद्यापीठांमधील तज्ज्ञांपर्यंत सर्वाचा अतिशय उत्तम प्रतिसाद लेखांना लाभला. बरेचदा फोनवरून तर अनेकदा ई-मेलच्या माध्यमांमधून संवाद झाला.

Maharashtra Board Class 10th and 12th Result 2024 Date Time in Marathi
१०वी १२वीच्या निकालासंदर्भात मोठी बातमी! ‘या’ तारखेला निकाल लागण्याची शक्यता; कसा पाहाल? जाणून घ्या
stock market, 3 7 crore dmat accounts
सरलेल्या आर्थिक वर्षात ३.७ कोटी डिमॅट खात्यांची भर
Apple CERT-In Security Alert Marathi News
लाखो iOS – Android युजर्सचा डेटा चोरी होण्याचा धोका! फोनमध्ये ‘हे’ बदल करून घ्यायचा CERT-In चा इशारा
In redevelopment of flat holders Redevelopment Senior
पुनर्विकासातील ज्येष्ठ!

एवढय़ा प्रयत्नांनंतरही एक गोष्ट निश्चित सांगता येईल, ती म्हणजे अजूनही कुठेतरी प्रत्यक्ष कृती होत नसल्याचे जाणवतेय. म्हणजे शेतकऱ्यांना वायद्यामधून जोखीम व्यवस्थापन कसे करता येईल ते पूर्णपणे पटले आहे, तशा दृष्टीने मागील वर्षभरात अनेक शेतकऱ्यांनी अभ्यास केल्यानंतर केवळ प्रत्यक्ष कृतीच्या अभावामुळे अनेक संधी हातच्या गेल्याचे मान्य केले आहे. तीच गोष्ट कृषी खात्यांमधील काही अधिकाऱ्यांची आणि मूल्य साखळीमधील विविध घटकांची. तर कृतीच्या अभावामुळे पोल्ट्री उद्योगाला देखील मोठी किंमत मोजावी लागली आहे. अर्थात आपण वेळीच न केलेल्या कृतीमुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी थेट सोयाबीन वायदेबाजारच बंद करून टाकण्याइतपत वजनदार असलेल्या पोल्ट्री उद्योगाला जोखीम व्यवस्थापनाचे महत्त्व कधी कळणार कोण जाणे.  शिवाय सोयाबीन वायदा बंद करण्याची मोठी किंमत आपल्याच उद्योगातील लहान शेतकरी पुढील वर्षभर देत राहणार आहेत हे त्यांच्या लक्षातदेखील आलेले नसेल किंवा आलेच तर लहान शेतकऱ्याला किंमत कोण देतोय या देशात. हे हवेत केलेले विधान नसून सोयाबीन वायदे बंद केल्यावर जागतिक बाजारात झालेली भाववाढ आणि भारतातील सोयाबीनच्या किमती यामधील तफावत पाहिल्यास मुद्दा लक्षात यावा. सध्या अमेरिकेमध्ये सोयाबीन सात महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले आहे.

थोडक्यात सांगायचे, तर कृषीमाल मूल्य साखळीमधील बहुतेक घटक जोखीम व्यवस्थापनाचे महत्त्व कमी-अधिक प्रमाणात ओळखू लागले आहेत. करोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये तर याचे महत्त्व अधिकच जाणवेल अशी चिन्हे आहेत. म्हणजे प्रत्येक जण कमॉडिटी बाजाराच्या उंबरठय़ावर येऊन ठेपला आहे. नफा-नुकसान बाजूला ठेवून कमॉडिटी एक्सचेंजवर निदान मुहूर्ताचा सौदा करण्याची जी आवश्यकता आहे तीच होताना दिसत नाही. याला अनेक कारणे आहेत. तरीही अनेक जणांच्या मनात कमॉडिटी बाजाराबद्दल असलेली अढी हेच मुख्य कारण या मागे आहे हे कदाचित वाचकांना पटेल.

आता २०२२ हे नवीन वर्ष सुरू  झाले आहे. नवीन वर्षांबरोबरच मागील दोन वर्षांप्रमाणे करोना विषाणू नवीन रूपात अधिक मोठय़ा प्रमाणावर आपले स्वागत करायला सज्ज आहे. जगातील सर्वात प्रगत राष्ट्र अमेरिका येथे दर दिवशी दहा लाखांहून अधिक जणांना करोनाची लागण होत आहे. जगात सध्या ३० कोटींहून अधिक ज्ञात करोना रुग्ण आहेत. टाळेबंदी पुन्हा होईल अथवा नाही किंवा वेगळय़ा प्रकारचे निर्बंध येतील. बेफिकिरीबरोबरच अनिश्चिततादेखील वाढत आहे. ही वाढती अनिश्चितता कमॉडिटी बाजारात आणि आपल्या दैनंदिन जीवनात पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह घेऊन येणार आहे. 

तरीही नवीन वर्षांत नवीन संकल्प करणे कोणी सोडणार नाही. एकंदर परिस्थिती पाहता मागील वर्षांत भरपूर पैसे मिळवून देणारा भांडवली बाजार २०२२ मध्ये दोलायमान राहील का ही शंका अनेकांच्या मनात घर करू लागली आहे. अशा गुंतवणूकदारांसाठी जोखीम विभाजन म्हणून कमॉडिटी बाजाराकडे पाहण्याचा संकल्प फायदेशीर ठरेल. तर शेतमाल दर जाणून घेण्यासाठी आणि ऐन मोक्याच्या वेळी खरेदी-विक्री करता यावी म्हणून उत्पादकांनादेखील कमॉडिटी एक्सचेंजवर व्यवहार करण्यासाठी एक खाते काढून ठेवण्याचा संकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. शेतमाल आणि इतर अकृषी व्यापार करणाऱ्या लोकांना जोखीम व्यवस्थापन शिकवण्याची गरज नसली तरी ते करण्यासाठी कमॉडिटी बाजारात खाते उघडण्यासाठी संकल्पाची गरज आहे. परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे पोल्ट्री, खाद्यतेल किंवा धातू बाजार यासारख्या कृषी आणि अकृषी उद्योग संस्था यांनी प्रथम स्वत: याबद्दल प्रशिक्षण घेऊन नंतर सभासदांना जोखीम व्यवस्थापनासाठी संकल्प करण्यास प्रवृत्त केले पाहिजे. अर्थात भांडवली बाजारात रोजच्या रोज किंवा आठवडय़ातून निदान दोन-चार वेळा व्यवहार करणारा वर्ग मोठा आहे. अशा किरकोळ गुंतवणूकदार वर्गानेदेखील कमॉडिटी बाजारात आपले नशीब अजमावून पाहण्याचा संकल्प केला पाहिजे.

कमॉडिटी बाजाराच्या काठावर येऊनदेखील पाण्यात पायदेखील टाकून न पाहण्याची नक्की कोणती कारणे असावीत हे आणि त्यावर उपाय पाहू.

बहुतांश लोक असे म्हणतात की, आम्हाला शेती कळत नाही त्यामुळे कृषी वायदे खरेदी-विक्रीचा निर्णय घेता येत नाही. अशा लोकांनी सोन्या-चांदीचे व्यवहार करून पाहण्यास हरकत नाही. सोन्या-चांदीच्या किमतींचा अंदाज बऱ्याच प्रमाणात भांडवली बाजारातील घटकांवरून बांधता येतो. कमॉडिटी बाजारात केवळ वायदे असल्यामुळे लॉट साइझ मोठा असतो, असेही म्हटले जाते. कमॉडिटी वायदे बाजारात १ ग्रॅम सोन्याचे करार (कॉण्ट्रॅक्ट) केवळ ५०० रुपयांहून कमी मार्जिन देऊन खरेदी-विक्री करता येते, हे प्रत्येकाने लक्षात घेण्याची गरज आहे. तसेच ज्या गुंतवणूकदारांना कमॉडिटी बाजारात डिलिव्हरी घेण्याची भीती वाटते त्यांनी लक्षात ठेवावे सोने-चांदी डिलिव्हरीदेखील मुख्यत: डीमॅटमध्येच येते. तसेच सोन्या-चांदीचा वापरही सर्वच जण कधी ना कधी करत असतात. उलट एक्सचेंजवरून मिळणाऱ्या सोन्या-चांदीच्या शुद्धतेची खात्री इतर कुठेही मिळणार नाही.

कमॉडिटी वायद्यांच्या व्यवहारातील सहजतेची म्हणावी तशी जाहिरात होत नाहीच. शिवाय दलालाकडूनही (ब्रोकर) त्याबद्दल फारसा उत्साह दाखवला जात नाही. जेव्हा जेव्हा शेअर बाजारात मोठी घसरण येऊन मिडकॅप-स्मॉलकॅपद्वारे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होते, तेव्हाच कमॉडिटी बाजाराची आठवण अनेकांना होते. त्याऐवजी वेळीच सर्वानी या बाजाराचा उपयोग करणे शिकून घेण्याची गरज आहे. नव्हे तसा संकल्प करण्याची गरज आहे. परत टाळेबंदीची स्थिती उद्भवल्यास भांडववली बाजाराबरोबर ऑनलाइन कमॉडिटी व्यवहारांची उपयुक्तता वाढणार आहे.

कमॉडिटी एक्सचेंजवर खाते उघडायचे तर भांडवली बाजारातील ब्रोकरच ते उघडून देतील. ज्यांचे भांडवली बाजारात याआधीच खाते चालू आहे. त्यांनी फक्त ब्रोकरला कमॉडिटी खाते कार्यान्वित करण्यास सांगावे. भांडवली बाजारातील व्यवहारासाठी असलेल्या ट्रेडिंग खात्यातीलच पैसे कमॉडिटी बाजारातील व्यवहारासाठी वापरता येतात. वेगळे पैसे देण्याची गरज नसते. उलट अकृषी कमॉडिटीमध्ये व्यवहार सकाळी ९ वाजेपासून ते रात्री ११.३० वाजेपर्यंत आपल्या वेळेनुसार करणे शक्य असते. तर कृषी व्यवहार संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आणि सोयातेल, पामतेल किंवा कापसारख्या आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या वस्तूंमध्ये रात्री ९ वाजेपर्यंत व्यवहार चालतात. चला तर कमॉडिटी बाजाराचा अनुभव घेऊया.

करोनामुळे  कृषीमाल मूल्य साखळीमधील बहुतेक घटक जोखीम व्यवस्थापनाचे महत्त्व कमी अधिक प्रमाणात ओळखू लागले आहेत. कोरोनाच्या तिसरम्य़ा लाटेमध्ये तर याचे महत्त्व अधिकच जाणवेल अशी चिन्हे आहेत. म्हणजे प्रत्येक जण कमॉडिटी बाजाराच्या उंबरठय़ावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे आता प्रत्येकाने कमॉडिटी बाजाराविषयी अभ्यास करून सर्वांनी या बाजाराचा उपयोग करणे शिकून घेण्याची गरज आहे. नव्हे तसा संकल्प करणे काळाची गरज आहे.

लेखक वस्तू बाजार विश्लेषक

अस्वीकरण : कमॉडिटी बाजार हा मुख्यत: जोखीम व्यवस्थापनासाठी असून वरील लेख या गोष्टीचे महत्त्व आणि त्यातील गणित विशद करून सांगण्यासाठी आहे, लेखाला गुंतवणुकीचा सल्ला मानण्यात येऊ नये.