माझा पोर्टफोलियो : गुंतवणूकदारांशी ‘मधुर’ स्नेहबंध

कंपनीचे संपूर्ण भारतभरात सर्वसमावेशक वितरण जाळे असून त्यांत २३ विक्री डेपो,  २,१०० स्टॉकिस्ट आणि संपूर्ण भारतातील पाच लाख केमिस्ट्सचा समावेश आहे.

|| अजय वाळिंबे

भारताच्या औषध निर्माण क्षेत्रात १४ वर्षांपूर्वी स्थापन झालेली एरिस लाइफ सायन्सेस लिमिटेड ही एक ब्रँडेड फॉम्र्युलेशन कंपनी आहे. कंपनी उपचारात्मक क्षेत्रांच्या विस्तृत श्रेणीमध्ये उत्पादने प्रस्तुत करते. तिची मुख्य थेरपी क्षेत्रे म्हणजे ओरल डायबेटिस केअर (३२%), कार्डियाक केअर (२६%), जीवनसत्त्वे, खनिजे आणि पोषक (२०%) आणि इतर (२२%).

कंपनीकडे उत्पादनांचे लक्ष्य केंद्रित पोर्टफोलिओ आहे, ज्यामध्ये तिच्या १५ मदर-ब्रँड्सचा महसूल आर्थिक वर्ष २०२१ नुसार तिच्या एकूण महसुलाच्या ८० टक्के आहे. ग्लिमिसेव, ग्लुक्सिट, एरिटेल, टेंडिया, टे, झोमेलीस, राबोलीन, ओल्मीन इ. महत्वाचे ब्रॅंड कंपनीच्या पोर्टफोलियोत आहेत. कंपनीच्या पहिल्या १५ पैकी ९ ब्रँड त्यांच्यात संबंधित विभागातील टॉप- ५ ब्रॅंड मध्ये मोडणारी आहेत. कंपनी मायक्रोलाइफ कॉर्पोरेशन या बहुराष्ट्रीय कंपनीच्या परवाना भागीदारीद्वारे भारतात जागतिक दर्जाच्या वैद्यकीय उपकरणांच्या श्रेणीचे वितरणदेखील करते. या उत्पादनांमध्ये ब्लड प्रेशर मॉनिटर्स, ब्लड ग्लुकोज मॉनिटर्स आणि इन्फ्रा-रेड थर्मामीटर्सचा समावेश आहे. कंपनीचे संपूर्ण भारतभरात सर्वसमावेशक वितरण जाळे असून त्यांत २३ विक्री डेपो,  २,१०० स्टॉकिस्ट आणि संपूर्ण भारतातील पाच लाख केमिस्ट्सचा समावेश आहे.

सध्या, कंपनीचा ‘डब्ल्यूएचओ’नुसार प्रस्थापित उत्पादन प्रकल्प गुवाहाटी, आसाम येथे असून, तेथून ३४५ हून अधिक उत्पादने तयार होतात. कंपनीचा नवीन अद्ययावत प्रकल्प गुजरात राज्यात २०२३ पर्यंत कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे आणि त्यात ओरल सॉलिड डोस, निर्जंतुकीकरण इंजेक्शन, ओरल लिक्विड्स आणि फार्मा आर अँड डी ब्लॉक यांचा समावेश असेल. सध्याच्या गुवाहाटी प्रकल्पाच्या १२ पटीने मोठय़ा आगामी सुविधेची योजना कंपनीने आखली आहे.

आगामी विस्तारीकरणाकरता कंपनीने पाच वर्षांपूर्वी स्ट्राइड्स शासूनचा देशांतर्गत फॉम्र्युलेशन व्यवसाय ५०० कोटी रुपयांना विकत घेतला. या व्यवसायामध्ये न्यूरोलॉजी, मानसोपचार, न्यूट्रास्युटिकल्स आणि महिला आरोग्य सेवा थेरपी क्षेत्रातील १३० हून अधिक ब्रँड्स असून भारतामध्ये विपणन आणि वितरण अधिकारांचा समावेश आहे. तसेच २०१९ मध्ये, कंपनीने केवळ भारतीय बाजारपेठेसाठी नोव्हार्टिस एजीकडून मधुमेह प्रतिबंधक- झोमेलीस हा ट्रेडमार्क विकत घेतला. ‘झोमेलिस’ हे मधुमेह प्रतिबंधातील प्रमुख ब्रॅंड आहे. गेल्याच महिन्यात कंपनीने एमजे बायो फार्माबरोबर बायोफार्मा उत्पादनांसाठी १० वर्षांचा संयुक्त उत्पादन करार (जेव्ही) केला असून त्यामध्ये एरिसचा ७० टक्के सहभाग आहे. 

कंपनीचे डिसेंबर २०२१ अखेर संपलेल्या तिमाहीचे निकाल लवकरच जाहीर होतील. अर्थात हे निकाल कसेही असले तरीही मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी एरिस लाइफ सायन्सेस ही कर्ज मुक्त कंपनी तुमच्या पोर्टफोलियोची झळाळी वाढवेल यात शंका नाही.

एरिस लाइफ सायन्सेस लिमिटेड

(बीएसई कोड – ५४०५९६)

शुक्रवारचा बंद भाव : रु. ७४५/-

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक :

रु. ८६३/४७४

भरणा झालेले भागभांडवल :

रु. १३.५९ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक  ५२.६८  

परदेशी गुंतवणूकदार      १३.६०    

बँक/ म्यु. फंड/ सरकार   ९.९४     

इतर/ जनता     २३.७८

शेअर शिफारसीचे निकष

*  प्रति समभाग उत्पन्न :      रु. २८.५३

*  पी/ई गुणोत्तर :       २६.४

*  समग्र पी/ई गुणोत्तर : २७.२

*  डेट इक्विटी गुणोत्तर : ०.०३

*  इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर :     १५६

*  रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड :       २७.४

*  बीटा :      ०.४

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त ( Arthvrutant ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Eris lifescience company history information akp

Next Story
करावे कर-समाधान: नवीन घरातील गुंतवणूक कधी करावी?
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी